समोश्याच्या पोटात दडलाय इतका मोठा इतिहास...वाचा समोसा भारतात आला तरी कसा !!

चहा भारतात आला तो चीन मार्गे. चहा जरी भारतीय नसला तरी तो भारतीयांच्या इतका जवळचा झाला की तो आपला नाही हेच माणसं विसरली. तसेच अनेक पदार्थ आहेत जे आज चवीने खाल्ले जातात पण त्यांचं मूळ हे भारता बाहेर आहे. यातलाच एक पदार्थ म्हणजे ‘समोसा'.


(स्रोत)

वडापावच्या बरोबरीने समोसा नेहमीच आवडीचा पदार्थ राहिला आहे. १२ व्या शतकापासून ते आत्ता पर्यंत समोसा वेगवेगळ्या पद्धतीने आकार घेत गेला. मंडळी, आज जो आपण समोसा बघतो तो अनेक वर्षाच्या प्रवासानंतर तयार झालेला आहे.

तर, मंडळी आज आपण आपल्या स्वादिष्ट समोश्याबद्दल मजेशीर माहिती वाचणार आहोत.  चला तर बघूया समोसा भारतात आला कसा !!

समोसा हा मुळचा इराणचा. काही इतिहासकारांच्या मते समोसा हा मूळचा इजिप्तचा आहे आणि तिथून लिबिया मार्गे मध्य आशिया पर्यंत पोहोचून तो भारतात पोहोचला. एक मात्र नक्की की समोसा हा मध्य आशियातूनच भारतात आला आहे. समोसा हा शब्द फारसी शब्द ‘संबुश्क:’ पासून तयार झाला. ११ व्या शतकातील फारसी इतिहासकार ‘अबुल-फजल बेहाकी’ यांच्या पुस्तकात समोश्याचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. याकाळातील सामोश्यात खिमा किंवा सुका मेवा घालण्याची पद्धत होती.

(स्रोत)

समोसा भारतात पोहोचला तो प्रवाश्यांच्या तांड्यांवरून. मध्य आशियातून भारतात येणाऱ्या प्रवाशांनी अफगाणिस्तान मार्गे हा पदार्थ भारतात आणला. भारतात आल्यानंतर समोश्यचं रूप बदललं. याला शेतकऱ्यांचं खाणं म्हणून ओळख मिळाली. मंडळी या सगळ्या प्रवासात हा समोसा आजच्या सारखा त्रिकोणी नव्हता बरं का. याचा आकार त्याकाळात गोलाकार सुद्धा होता. 

भारतात समोश्याचा उल्लेख १३ व्या शतकातील कवी ‘अमीर खुस्रो’ यांच्या कवितेत आढळून येतो, प्रवासी इब्न बतूताच्या प्रवास वर्णनात सुद्धा समोश्याचा उल्लेख आहे, आईने-अकबरी या अकबराच्या चरित्रात सुद्धा समोसा आहे. त्याकाळातील शाही मेजवान्यात समोसा खाल्ला जायचा. 


(स्रोत)

समोसा आणि बटाटा यांची जोडी जुळण्याआधी समोश्याचं रूप वेगळंच  होतं. ताजिकिस्तान, उजबेकिस्तान मध्ये समोश्यात सारण म्हणून बकरा किंवा मेंढीचं मटण भरण्याची पद्धत होती. त्याआधी यात सुखा मेवा किंवा फळं सुद्धा भरली जायची. एकेकाळी हा ठेल्याचा समोसा शाही पक्वानात सामील होतं.

आकार स्वादाबरोबरच समोश्याला 'समोसा' हे नाव देखील आता आता मिळालेलं नाव आहे. अरब लोक याला 'संबुसाक' किंवा 'संबुसाज' म्हणायचे, फारसी आणि उर्दू मध्ये  'सम्बोसा', ताजिकिस्तान आणि इथिओपिया मध्ये 'सम्बुसा', उझबेकिस्तान मध्ये 'सामसा' आणि पोर्तुगाल मध्ये 'चमूका' म्हणून समोसा ओळखला जायचा. 


सम्बुसा (स्रोत)

मंडळी आजचा समोसा ज्यात सारण म्हणून बटाटा भरला जातो तो बटाटा देखील भारतात १६ व्या शतकात पोर्तुगीजांकडून आणला गेला. हा बटाटा जेव्हा भारतात रुजला तेव्हा समोश्यात बटाटा भरण्याची पद्धती सुरु झाली. अश्या पद्धतीने समोसा सर्व स्थरातील माणसात प्रसिद्ध झाला.

असा हा समोसा अनेक मैलांचा प्रवास करत आजच्या रूपात आला आहे. मंडळी समोसा जरी परका असला तरी भारतीयांनी त्याला अस्सल भारतीय टच दिलाय त्यामुळे त्याला परकीय म्हणणं बरोबर नाही !!

सबस्क्राईब करा

* indicates required