बीड जिल्ह्यातल्या गावात नव्या जावयासोबत होळी कशी साजरी करतात हे वाचलंत का?
जावई या व्यक्तीचे आपल्या समाजात एक वेगळे मानाचे स्थान आहे. ते इतके आहे की त्यात थोडी जरी चूक झाली तर जावई रुसून बसतो. सासुरवाडीला गेलेल्या जावयाचा थाट बघावा आणि बघतच राहावा. एखादा व्यक्ती जर खूप भाव खात असेल तर साहजिकच म्हणतात, "हा तर जावयापेक्षा जास्त भाव खातो". मागे जावयाला ५६ पदार्थांची मेजवानी मिळालेल्या जावयाची गोष्ट तुम्ही बोभाटावर वाचली असेल.
आपला बीड जिल्हा मात्र थोडा वेगळा आहे. इथे होळीला जावयासोबत जे होते ते कोणालाच अपेक्षित नसेल. होळी सण हा अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द आहे. रंगांची आणि आनंदाची उधळण या काळात केली जाते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात विडा नावाचे गाव आहे. या गावातली होळी साजरा करण्याची पद्धत वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
या गावात नविन लग्न झालेला जावई चक्क गाढवावर बसून फिरवला जातो. त्याला फुल्ल इज्जत म्हणून त्याच्या आवडीचे नवे कपडे घालण्यात येतात हे ही विशेष. जवळपास शतकभरपासून ही प्रथा सुरू असल्याचे सांगितले जाते. या प्रथेसाठी मोठी पूर्वतयारी केली जात असते.
सुरुवातीला काही दिवस सर्व्हे सुरू असतो तो म्हणजे सर्वात नविन जावई कोण आहे. मग त्यावर टेहळणी सुरू होते, कारण या काळात तो कुठे गायब व्हायला नको आणि मग सुरू होते गाढवावरून मिरवणूक. या प्रथेमागे पण एक वेगळी गोष्ट आहे.
जवळपास ९० वर्षांपूर्वी आनंदराव देशमुख या प्रतिष्ठित व्यक्तीने आपल्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे. गावाच्या बरोबर मधोमध ही मिरवणूक सुरू होते आणि गावातीलच हनुमान मंदिरजवळ संपते.
अशा पध्दतीने जावईबापूंचा आगळावेगळा सत्कार या गावात पार पडत असतो.
उदय पाटील




