स्वीमिंग पूल आणि हेलिपॅड असणारी जगातली सर्वात लांबलचक २६ चाकी कार!! कुणी आणि कुठे केलेत हे उद्योग?
जगातली सर्वात लांबलचक कार म्हणलं की आठवते ती शानदार लिमोझीन. बहुतांश हॉलिवुड सिनेमात पाहिलेली ही कार पाहिल्यावर खूप भारी वाटतं. याच कारमध्ये आणखी बदल करून जगातली सर्वात लांबलचक कार अमेरिकेत बनवली गेली आहे. 'द अमेरिकन ड्रीम' असं तिचं नाव आहे आणि तिचे नाव नुकतेच सर्वात लांबलचक कार म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. या गाडीने स्वतःचाच जुना रेकॉर्ड मोडला आहे. आज द अमेरिकन ड्रीम कारबद्दल आणखी माहिती करून घेऊयात.
१०० फूट लांबीची ही खास लिमोझिन ९०च्या दशकाच्या सुरुवातीला जे. ऑरबर्ग यांनी डिझाइन केली होती. ऑरबर्ग हे कार शौकीन होते. यांना सर्व प्रकारच्या कार खरेदी करायच्या होत्या. ते स्वतः कार डिझाईन देखील करत. ऑरबर्गने कारच्या डिझाइनवर दोन वर्ष काम केले आणि जेव्हा ही कार प्रत्यक्षात साकारली तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले.
या कारला एकूण २६(!) चाके आहेत आणि ती दोन्ही बाजूंनी चालवता येते. या कारमध्ये V8 इंजिनची जोडी वापरण्यात आली आहे. एक इंजिन पुढच्या आणि दुसरे मागील बाजूस आहे. या कारमधून एकावेळी ७० पेक्षा जास्त लोक प्रवास करू शकतात. मग काय, इतक्या लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून इथे टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि एक टेलिफोन, स्विमिंग पूल, गोल्फ कोर्ससह हेलिपॅड देखील आहे. तसेच यात जकूझी, बाथटब आणि लहान गोल्फ कोर्सही आहे.
१९८६ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्यानंतर ती खूप लोकप्रिय झाली. अनेक कार्यक्रमात आणि सिनेमात ती दाखवण्यात आली. या कारच्या वापरासाठी तासाला ५० ते २०० डॉलर्स इतक भाडंही ठेवण्यात आलं. पण नंतर काही वर्षं ती कार देखभालीचा खर्च परवडत नसल्याने तशीच पडून राहिली.
३ वर्षांपूर्वी कारची दुरुस्ती करण्यात आली आणि त्यावर आणखी काम करण्यात आले. यावर २,५०,००० डॉलर्स इतका खर्च झाला. आता कारची लांबी ३०.५ मीटरने वाढविण्यात आली. त्यामुळे हा नवा गिनीज रेकॉर्ड पुन्हा 'द अमेरिकन ड्रीम' च्या नावे झाला. इतकी लांबलचक कार रस्त्यावर तर चालवणं आणि वळवणं तर शक्य नाही. त्यामुळेच ही गाडी रस्त्यावर धावणार नाही. पण डेझरलँड पार्क येथे म्युझियममध्ये पाहण्यास मिळेल.
तुम्हाला द अमेरिकन ड्रीम प्रत्यक्षात पहायला आवडेल का?
शीतल दरंदळे




