७ लाख शेतकऱ्यांचे भूकबळी घेणारा जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित दुष्काळ !!!

सातवी आठवीत असताना भूगोलाच्या पुस्तकात युक्रेन हे जगातलं सर्वात मोठं गव्हाचं कोठार आहे असं तुम्ही वाचलं आठवत असेलच. मात्र ब्रेड बास्केट ऑफ युरोप अशी ख्याती असलेल्या या समृद्ध युक्रेनमध्ये एकेकाळी असा महाभयानक दुष्काळ पडला होता की लाखो लोक भुकेने मरण पावले होते. हा दुष्काळ इतका भयानक होता की उपासमारीने व्याकुळ झालेल्या लोकांनी मिळेल ते... म्हणजे कुत्री, मांजरं, उंदीर मारुन खाल्ले होते आणि ते ही मिळेनासे झाल्यावर माणसांनी माणसं पण खाल्ली होती. एकूण ७ लाख शेतकरी आणि शेतमजूर या दुष्काळात अन्नाविना तडफडून मेले. युक्रेनच्या हा दुष्काळ "होलोडोमोर" म्हणतात. होलोड म्हणजे भूक आणि मोर म्हणजे मृत्यू!!

हे वाचून धक्का बसला ना? आता जरा सावरून बसा.  कारण आता आम्ही तुम्हांला सांगणार आहोत हे सर्व का आणि कसं झालं याचं रामायण-महाभारत!!

लेनिन आणि स्टॅलिन (स्रोत)

थोडक्यातच सांगायचं झालं तर हा दुष्काळ ही निसर्गाची अवकृपा नव्हती,  तर रशियाच्या स्टॅलिननं युक्रेनच्या जनतेला धडा शिकवण्यासाठी  लादलेला मानवनिर्मित कृत्रिम दुष्काळ होता.  पण स्टॅलिनचा युक्रेनवर इतका राग का होता हे समजण्यासाठी आधी थोडा युक्रेनचा इतिहास समजून घेऊया.

युक्रेन आधी २०० वर्षं रशियन झारच्या अंमलाखाली होता. तर, या झारविरुद्ध उठाव झाला आणि  १९१७ च्या दरम्यान लेनिनच्या रेड आर्मीनं झारशाही संपुष्टात आणली. त्यानंतर याच आर्मीनं युक्रेनही नव्या सोव्हीएत संघराज्याला जोडून घेतला. त्यामुळं झालं काय,  त्यानंतर युक्रेनमध्ये पिकलेलं सर्व धान्य रशियाच्या इतर राज्यात जायला लागलं आणि शेती कसणाऱ्या युक्रेनमध्ये अन्नाचा तुटवडा जाणवायला लागला. यामुळे बंडाळी माजण्याच्या धाकानं लेनिननं युक्रेनवर कसलेली पकड ढिली केली. मात्र १९२४मध्ये लेनिनचं निधन झालं आणि रशियाचा अध्यक्ष झाला जोसेफ स्टॅलिन नावाचा क्रूरकर्मा!

स्रोत

लेनिनच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा आपण स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभे राहू अशी युक्रेनला आशा वाटत होती. स्टॅलिनला युक्रेनची स्वातंत्र्य मिळवण्याची मनिषा डाचायला लागली. यासाठी इतर हुकुमशहा जे करतात तेच त्यानं करायला सुरुवात केली. १९२९ नंतर युक्रेनमधल्या पाच हजारांहून अधिक विचारवंत, शास्त्रज्ञ, कलाकार, धर्मप्रचारकांना उचलून  त्यानं तुरुंगात डांबून टाकलं.  त्यातल्या काहींना गोळ्या घातल्या तर काहींना सैबेरीयाच्या तुरुंगात रवाना केलं.  त्यावेळी युक्रेनमधली ८०% जनता शेतीवर अवलंबून होती. शेतजमीनीची मालकी मोठमोठ्या जमीनदारांकडे होती. चोवीस एकरापेक्षा जास्त शेती ज्याच्याकडे असेल त्यांना कुलक म्हटलं जायचं. कुलक हा दर्जा नाहीसा केला तर  स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा निर्माणच होणार नाही या विचारानं पछाडलेल्या स्टॅलिननं कुलकांच्या जमिनी-घरं -गुरंढोरं, भांडीकुंडी जप्त करण्याचा सपाटा लावला आणि त्यांना देशोधडीला लावलं. एक कोटी कुलकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सैबेरीयाच्या छावण्यांत हलवण्यात आलं. सैबेरियाच्या कडक थंडीत अर्ध्याहून अधिक माणसं मरण पावली आणि उरलेली खाणीत-कारखान्यात मजूरी करायला लागली.  

स्रोत

आता युक्रेनमध्ये उरले फक्त अल्पभूधारक आणि शेतमजूर!! त्यांचा उरलेला आवाज बंद करण्यासाठी युक्रेनची सर्व शेती आणि घरं collectivization म्हणजेच एकत्रीकरणाच्या नावाखाली सरकारजमा झाली. आता आधी जे शेतकरी होते ते निव्वळ शेतमजूर झाले. कम्युनिझमचा प्रसार करण्यासाठी काही प्रचारक युक्रेनमध्ये नेमण्यात आले. असा कोंडमारा झाल्यावर शेतकरी चवताळले. घरं  सरकारजमा करण्याऐवजी त्यांनी  जाळून टाकायला सुरुवात केली. सरकारी अधिकार्‍यांना मारायला सुरुवात केली. पण या शेतकर्‍यांना स्टॅलिनच्या निर्दयी वृत्तीची ओळख नव्हती.

स्टॅलिनची क्रूर राजवट...

स्रोत

स्टॅलिनने युक्रेनमध्ये एक लाख सैनिक पाठवून दिले. त्यांनी सुरुवातीला धाकदपटशा दाखवून धान्याचे साठे जप्त केले. जनतेचा विरोध वाढायला लागल्यावर हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. जनता जुमानत नाही हे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांना सरळ मारूनच टाकायला लागले. 

स्रोत

याच दरम्यान स्टॅलिनची पहिली पंचवार्षिक योजना आखली गेली.  या योजनेला अंमलात आणायला मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची गरज होती. हे चलन मिळवायला युक्रेनकडून येणारा गहू-मका-ओट शेतकऱ्यांच्या घरात न जाता बाहेर रवाना व्हायला लागला. एखादं मक्याचं कणीस जरी घरी नेताना कोणी दिसलं तरी ताबडतोब बंदूकीची गोळीने त्याची शिकार व्हायला लागली.  काही महिन्यांतच दुष्काळाची छाया युक्रेनवर पसरली. हातापायाच्या काड्या झालेली मुलं रस्त्यावर फिरायला लागली. काही लोकांनी आपली मुलं मॉस्कोकडे जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात सोडून दिली. 

स्रोत

यादरम्यान या दुष्काळाची बातमी कॅनडा,अमेरिकेत पसरली आणि काही संस्थांनी धान्याची मदत पाठवायला सुरुवात केली.  पण दुष्काळ ही केवळ अफवा आहे असे सरकारतर्फे सांगण्यात आले आणि मदत परत पाठवली गेली.

स्रोत

स्रोत

स्रोत

अशा रीतीने १९३२ साली सुरू झालेला दुष्काळ १९३३ च्या मध्यापर्यंत कळसाला गेला. लोकांनी ससा, कुत्रे ,खार, उंदीर, बेडूक जे मिळेल ते मारून खायला सुरवात केली. भुकेने वेड्या झालेल्या काही लोकांनी आपली अर्भकं खाल्ली. लोकं रस्त्यांनी चालता चालता मरून पडायला लागली. दर दिवशी २५००० लोकं मरु लागली तेव्हाही सरकारचे डोळे उघडले नाहीत. हे सगळं होताना सरकारनं दुर्भिक्ष्य, दुष्काळ हे शब्द वर्तमानपत्रात वापरण्याची मनाई केली. युक्रेनबद्दल लिहिणाऱ्या काही परदेशी पत्रकारांना तुरुंगात टाकून वर्तमानपत्रांची गळचेपी केली. केवळ देखावा म्हणून उभे केलेल्या शेतांचे फोटो जगभर पाठवून दुष्काळ नसल्याची ग्वाही दिली गेली. ही बतावणी इतक्या हुशारीने उभी केली होती की बर्नार्ड शॉ सारखा लेखक पण देखाव्याला भुलला आणि रशियाहून परत आल्यावर रशियन सरकारचे गोडवे गायला लागला.

स्रोत

स्रोत

हे कुणाला टाळता आलं नसतं का? कदाचित अमेरिकेसारखा बलाढ्य आणि तितकाच तुल्यबळ देश  हस्तक्षेप करू शकला असता. पण रशियाच्या पंचवार्षिक कार्यक्रमात जास्तीतजास्त खरेदी अमेरिकेतून होणार होती. या कारणानं अमेरिकेनं फारसा गवगवा तर केला नाहीच, उलट स्टॅलिनच्या सरकारला मान्यता देऊन दोस्तीचा हात पुढे केला. यानंतर युक्रेनमध्ये विरोध करण्याची ताकदच संपली.  पण दुर्भाग्याचा फेरा काही संपला नाही. कालांतरानं रशियन सरकारची पकड ढिली पडली.  पण तोपर्यन्त दुसरे महायुद्ध सुरू झालं आणि पुन्हा एकदा जनता त्यात नाडली गेली. 

होलोडोमोरच्या आठवणीत उभारलेलं युक्रेन येथील स्मारक (स्रोत)

आज युक्रेनची स्थिती काय आहे? तर, सोव्हिएत रशियाचं विघटन झालंय आणि बरेच देश स्वतंत्र झाले आहेत. १९९१मध्ये  युक्रेनलाही स्वातंत्र्य मिळालंय. मात्र त्यांची अर्थव्यवस्था तितकीशी मजबूत नाहीय आणि युरोपातल्या सगळ्यांत गरीब देशांत त्याची गणना होतेय.   आणि हो,  रशियासोबत युक्रेनच्या कुरबुरी अजूनही चालूच आहेत. या कुरबुरींबद्दल आता पुन्हा कधीतरी सांगूच..

 

आणखी वाचा :

या १० मानवी चुकांनी जगाचा आधुनिक इतिहास पारच बदलून टाकला...

खुन्नस काढावी तर अशी!! बघा काय केलं या रशियातील माणसाने

या रशियन माणसाला भारतात भिक मागावी लागली, पण.....वाचा पुढे काय झाले !!!

सबस्क्राईब करा

* indicates required