computer

२० लाखांपेक्षा जास्त लोकांनी वापरलेलं ॲप चक्क नांदेड जिल्हातल्या देगलूरच्या पोराने तयार केलंय !!

तुम्ही खाताबुक ह्या ऍपबद्दल ऐकलंय का? त्याची जाहिरात तरी नक्की पाहिली असेल. नसलं यारी हरकत नाही. हे दुकानदारांना आणि छोट्या व्यावसायिकांना हिशोब ठेवायला मदत करणारं ॲप आहे. त्यातल्यात्यात उधारी वसूल करण्यासाठी याचा खासच वापर होतो. आज आम्ही खाताबुकच्या जन्माची कहाणी तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. कहाणी भव्यदिव्य नाही पण अविश्वसनीय आणि प्रेरणादायी नक्कीच आहे. बरेचदा लोक आपल्या नाकर्तेपणासाठी परिस्थिती, भवताल आणि कितीतरी गोष्टींना दोष देतात, पण ही खाताबुकची गोष्ट वाचून तुम्हांला कळेल की इच्छा असेल, तर मार्ग नक्कीच निघतो. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरला. 

महाराष्ट्र-तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेजवळ वसलेलं देगलूर हे मुख्यतः शेती व्यवसाय असलेलं शहर आहे. पण त्याचसोबत ते आजूबाजूच्या वस्तीसाठी व्यापाराचंही केंद्र आहे. आपल्या आजच्या कथेचे मूळ हे इथल्या एका इलेक्ट्रिक सामानाच्या दुकानात आहे. या कथेचा नायक आहे वैभव कल्पे. वैभवचे वडील एक इलेक्ट्रिक सामानाचे दुकान चालवायचे. त्यांना साधा हिशोब ठेवताना होणारा त्रास, त्यातही लोकांकडून पैसे वसुली करताना होणारा मनस्ताप वैभव जवळून बघत होता आणि त्यावर त्याने उपाय काढायचे ठरवले. 

आपल्या वडिलांना दुकानात मदत करत असतानाच त्यानं इंटरनेटवरून अँड्रॉइड ऍप कसे बनवायचे हे शिकायला सूरवात केली. त्याने या प्रयोगातून आपल्या वडिलांसाठी एक हिशोब ठेवणारे ऍप तयार केले. या ऍपचा डेटा मोबाईलमध्येच ठेवला जायचा. याला साधा सर्व्हरही नव्हता. त्याचं रुपडं अगदी साधारण होतं. पण साधं असलं तरी हे ऍप आपलं काम चोख करत होतं. २०१६ ऑक्टोबरमध्ये हे ऍप प्ले स्टोरवर टाकण्यात आलं. पुढे दोन वर्षांत म्हणजे ऑक्टोबर २०१८ पर्यंत तब्बल ६०,००० दुकानदार हे ऍप वापरत होते आणि इथेच आपल्या कहाणीचा ट्विस्ट येतो.

(वरून डाव्या बाजूने - रवीश नरेश, धनेश कुमार, आशिष सोनोने आणि खाली - वैभव कल्पे, जयदीप पूनिया)

आपल्याला आता देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत यावं लागेल. आपल्या स्टोरीतला दुसरा हिरो आहे रवीश नरेश.  पूर्वी Hosuing.com चा को-फाऊंडर असलेला रवीश मुंबईत kyte.ai नावाची स्टार्टअप चालवत होता.  त्याची नजर खाताबुकवर पडली. त्यांच्या लक्षात आलं हे ऍप एखाद्या कंपनीने नाही, तर एका व्यक्तीने बनवलं आहे. त्यांने वैभवला ई-मेल पाठवला. 

या काळात वैभव आपल्या आयुष्यात खूष होता. त्यानं वडिलांचे दुकान पुढे चालवायचं ठरवलं होतं. त्याच्या लग्नची बोलणीही चालू होती. त्याला खाताबुकसाठी अनेक ईमेल येत असत. त्यात lightspeed ventures मोठ्या वेंचर कॅपिटल कंपनीनेही त्याला संपर्क केला होता. रवीश नरेश यांनी वारंवार त्याला संपर्क केला आणि मुंबईमध्ये पहिल्या भेटीसाठी त्याला तयार केलं. 

वैभवमधल्या जिद्द आणि चिकाटीचा रवीश यांना चांगला अंदाज होता. म्हणूनच तर फक्त ऍप विकत न घेता त्यांनी वैभवला मुंबईला येऊन रवीश यांची टीम जॉईन करण्यास भाग पाडले. रविशच्या टीमने खातबुक पुन्हा एकदा सुरवातीपासून तयार केलं आणि  बाजारात आणलं. त्या पहिल्या ६०,००० वापरकर्त्यांची खाताबुकला व्हायरल होण्यास फार मदत झाली. 

आजच्या घडीला खाताबुक भारतात साधारण २० लाख दुकानदार वापरतात. ५० लाखापेक्षा अधिक लोकांनी हे ऍप डाऊनलोड केलं आहे. भारतातल्या असंघटित क्षेत्राला डिजिटल बनविण्यात यांचा वाटा नाकारता येणार नाही.  अजूनही खाताबुकसमोर अनेक आव्हानं आहेत. पण त्यांचा आजवरचा प्रवास हा नक्कीच रंजक आहे.

आज वैभव हा खाताबुकच्या मध्यवर्ती टीमचा भाग आहे. त्याच्यामधल्या जिद्दीचं खाताबुक हे उत्तम उदाहरण आहे. देगलूरसारख्या छोट्या शहरात राहून, इंटरनेटवर अँड्रॉइड प्रोग्रामिंग शिकवून बनवलेलं ऍप ते २० लाख दुकानदार वापरणारे ऍप हा प्रवास आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required