शो स्टॉपर, लॉंजरी ते कमर्शियल...जाणून घ्या मॉडेलिंगचे दहा प्रकार!!

'मॉडेलिंग'हा एक जादूई शब्द आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना प्रत्येकाला एकदा ना एकदा तरी या करिअरची भुरळ पडतेच! हो, आहे काय त्यात? सुंदर दिसायचं, सुंदर कपडे घालायचे आणि कॅमेरासमोर उभं रहायचं! वरवर विचार केला तर अगदी सहज सोपं दिसणारं हे करिअर अत्यंत कठीण आहे. पण फिकर नॉट, कठीण विषय सोपा करून समजवायला बोभाटा आहे ना! चला तर, आजच्या पहिल्या भागात बघू या 'मॉडेलिंग' नेमकं काय असतंय ते!
आधी आपण जाणून घेऊ या की मॉडेलिंगचे प्रकार तरी किती आहेत? सरसकट विचार केला तरी मॉडेलिंगचे तब्बल दहा प्रकार पाडले जाऊ शकतात.
१. फॅशन मॉडेलिंग -
ही मॉडेलिंगची टॉप कॅटेगरी आहे. व्होग किंवा जीएफक्यू सारख्या नियतकालिकांसाठी काम करणार्या सर्व मॉडेलची नावं या कॅटेगरीत येतील. तुमच्या ओळखीची नावं सांगायची झाली तर मधू सप्रे, बिपाशा बसू, शितल मल्लार आणि ऐश्वर्या राय!!
इंडस्ट्रीत फॅशन मॉडेलला सगळ्यात जास्त बिदागी मिळते. पण या स्तरावर पोहचण्यासाठी या मॉडेल अपरंपार मेहनत घेतात. आपल्याला मॉडेलिंग करायचं आहे हे त्यांना किशोर वयातच कळलेलं असतं. घरून आर्थिक आणि मानसिक पाठींबा पण मजबूत असतो. फॅशनमधली (शक्यतो) परदेशी विद्यापिठाची डिग्री, एखादा ग्रुमिंग डिप्लोमा, झालंच तर कॉस्मेटिक्स आणि डाएटवर खर्च करण्याची तयारी.
हे सगळं करूनही इथे पोहचण्याची स्पर्धा जीवघेणी असते. बरं, हा सगळा खर्च करून जर वयाच्या २०/२१ वर्षांपर्यंत संधी नाही मिळाली तर पुढे काय.....? एकच उपाय- घरी जाणे. कारण हे वय गेलं की या कॅटेगरीत उरलेल्या आयुष्यात प्रवेश मिळणार नाही. पण यश मिळालं तर दुनिया तुमचीच आहे!
२. रन वे मॉडेलिंग -
फॅशन शोमध्ये स्टेजवर एखाद्या फॅशन डिझाइनरचे कपडे घालून रॅम्पवॉक करणारे मॉडेल म्हणजे रनवे मॉडेल्स!! या मॉडेलिंगची सुरुवात अर्थतच १६ /१७ व्या वर्षी करावी लागते. शरीर लवंगलतिका म्हणतात तसे नाजूक, पण शरीराची इतर मापे अत्यंत योग्य असावी लागतात. तुमची उंची ५ फूट ९ इंचापेक्षा कमी असेल तर या मॉडेलिंगचा विचारही करू नका. या व्यवसायात आवक भरपूर चांगली असते, पण बरेच ड्राय पिरीयड म्हणजे काहीही काम हातात नसण्याचे दिवस येऊ शकतात. या कोरड्या दिवसात पण कोणत्याही क्षणी सज्ज अशी तब्येत ठेवणे आणि नैराश्याला बळी न पडणे हे फार मोठे आव्हान असते.
३. स्विमसूट आणि लाँजरी मॉडेल -
कमनीय बांध्याचे प्रत्येक वळण दाखवण्यासाठी तयार असलेल्या आणि मनाने धीट असलेल्या मुली या क्षेत्रात काम करतात. हे मराठी संस्कृतीत वाढलेल्या मुलींचे काम नाही. अंतर्वस्त्राच्या जाहीरातीत बरेच अंगप्रदर्शन असते. ज्या घरांमध्ये बिनबाह्यांचे ब्लाउज घालायला आईवडलांची परवानगी घ्यावी लागते, त्या मुलींसाठी हे क्षेत्र पूर्णपणे वर्ज्य आहे.
४. फिटनेस मॉडेलिंग -
हे एक वेगळेच क्षेत्र आहे. इथे मॉडेल दिसण्याच्या सर्व अटी लागू होतातच आणि सोबत शरीरयष्टी कमावलेली आहे त्या मुलामुलींसाठी हे अत्यंत आकर्षक क्षेत्र आहे. मॅचो बनियनच्या जाहिरातीतला टायगर श्रॉफ हे फिटनेस मॉडेलिंगचे उत्तम उदाहरण आहे. पण हे मॉडेलींग वर्षानुवर्षं कमाई देऊ शकत नाही.
५ पार्ट मॉडेलिंग -
बर्याच वेळा असे होते की एखाद्याचा लूक मॉडेलच्या परिभाषेत बसत नसेल, पण शरीर आणि अवयव प्रमाणबध्द असतील तर अशा व्यक्तींनाही 'पार्ट मॉडेल' मध्ये संधी मिळू शकते. उदाहरणार्थ - नेल पॉलीश किंवा हँड क्रिमची जाहिरात करायची असेल तर ज्यांचा हात प्रमाणबध्द असेल त्यांना संधी मिळेल. हाताच्या पंजाचा आकार, लांबसडक बोटे, निरोगी नखे हा पण मॉडेलिंगचा विषय होऊ शकतो. खाली दिलेली काही चित्रे बघितल्यावर तुम्हाला या प्रकारच्या मॉडेलिंगची कल्पना येईल. स्कोप अर्थातच मर्यादीत आहे.
६. प्रमोशन मॉडेलिंग -
प्रदर्शने - ट्रेड शो अशा कार्यक्रमात कंपनीच्या प्रॉडक्टची माहिती देण्यासाठी अशा मॉडेलची गरज असते. प्रसन्न व्यक्तिमत्व, संभाषण चातुर्य आणि कंपनीच्या प्रॉडक्टची योग्य माहिती इतकेच या मॉडेलचे काम असते. या मॉडेलना मासिक उत्पन्न कमी असते, पण जोडउद्योग म्हणून हे काम करता येते. त्याखेरीज ट्रेड शो मधून काही वेगळ्या संधी पण मिळण्याची शक्यता असते. शहरात आलेल्या नव्या मुलामुलींसाठी हे मॉडेलींग उपयुक्त असते.
७. फिट मॉडेलिंग -
या प्रकारात मॉडेल पडद्याआड काम करत असतात. सर्वसाधारणपणे फॅशन गारमेंटसाठी योग्य अशा व्यक्तींची मापे घेऊन त्याप्रमाणे कपडे बनवून घेण्यासाठी या मॉडेलिंगचा उपयोग होत असतो.
८. प्रिंट मॉडेलिंग -
बर्याच वेळा असे असू शकते की एखाद्या मॉडेलचे व्यक्तिमत्व थ्री डायमेन्शनल माध्यमात म्हणजे स्टेजवर किंवा रॅम्पवर उठून दिसू शकत नाही. गर्दीच्या समोर व्यक्त होण्याच्या कलेचा अभाव हे त्यातील महत्वाचे कारण असू शकते. अशावेळी प्रिंट मॉडेल म्हणजे वर्तमानपत्रातील जाहिराती, बॅनर्स, प्रचारपत्रके, यात त्यांचा उपयोग होऊ शकतो. या क्षेत्रात अनेक संधी मिळू शकतात. केवळ मोहक चेहरादेखील अनेक कामे मिळवून देऊ शकतो. प्रमोशन मॉडेल आणि प्रिंट मॉडेल या दोन्ही कॅटेगरीतील उमेदवारांना अमुक वय झाल्यावर पब्लिक रिलेशन या क्षेत्रात स्थायी स्वरुपाचे काम मिळू शकते.
९. लहान बाळांचे मॉडेलिंग -
सर्वसाधारणपणे सहा महिने ते दोन वर्षांपर्यतच्या बाळांना या क्षेत्रात संधी मिळू शकते. टिव्हीवरच्या लहान बाळांना उपयुक्त अशा वस्तूंच्या जाहिराती बघितल्यावर बर्याच पालकांना आपले बाळ पण हे मॉडेलींग करण्यास एकदम फीट आहे असे वाटते. असे वाटणे काही वावगे नाही. पण ही शूटींगची सेशन बर्याचवेळा लांबलचक म्हणजे आठ ते दहा तासांची असतात. बाळ आजारी पडू शकते. इन्फेक्शन होऊ शकतात. बाळाची तब्येत सांभाळणे हा त्यातील महत्वाचा मुद्दा आहे. आई आणि वडील दोघेही बाळाची काळजी घेण्यास पुरेसा वेळ देऊ शकत असतील तरच या वाटेला जावे. यामध्ये उत्पन्नापेक्षा बाळाच्या कौतुकाचे महत्व आईबाबांना जास्त असते.
१०. आता अपण बघू या कमर्शिअल मॉडेलींग म्हणजे काय?
हा मॉडेलिंगचा सर्वात थोर प्रकार आहे. या मॉडेलिंगच्या प्रकारात वय, सौंदर्य, याचा काहीही संबंध नसतो. वय वर्षे सात ते पंचाहत्तर कोणीही हे मॉडेलिंग करू शकते. याप्रकारात अभिनयाला जास्त महत्व असते. बघा एमडीएचचे संस्थापक किंवा पंचाहत्तरीला पोहचलेले बच्चनसाहेब या वयातही मॉडेलिंग करतात. या क्षेत्रात अनेक वर्षं भरपूर पैसे कमावता येतात. इथे अभिनय आणि आत्मविश्वास अत्यंत आवश्यक गुण आहेत. त्याहूनही महत्वाचे कसब म्हणजे माणसे जोडण्याची कला (नेटवर्कींग स्किल) असली तर बरीच वर्षे काम करता येते.
तर या भागात आपण या क्षेत्राची अत्यावश्यक ढोबळ माहीती पाहिली. या पुढची पायरी बरीच कठीण असते. पण 'बोभाटा'आहे ना तुमच्या मदतीला!!