computer

चांगले रस्ते बांधण्याची प्रक्रिया अशी असते. भारतात हे सगळं केलं जातं असं तुम्हांला वाटतं का?

सध्या रस्ते आणि रस्त्यांवरच्या खड्ड्यांची चर्चा सुरु आहे हे तुम्हाला माहित असेलच. वर्षानुवर्षे आपल्याकडे हीच परिस्थिती आहे. नवीन रस्ता बनवला जातो आणि त्या रस्त्याला दर पावसाळ्यात खड्डे पडतात. याला अर्थातच कारण आहे निकृष्ट दर्जाचं काम. मग चांगलं काम कसं करतात ? हा प्रश्न आम्ही गुगलला विचारल्यावर गुगलने जे उत्तर दिलं ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
चला तर जाणून घेऊया ‘चांगले’ रस्ते बांधण्याची प्रक्रिया काय असते...

नियोजन

रस्ते बांधणीचा पहिला टप्पा हा नियोजनाचा असतो. इंजिनियर्स आणि रस्ते बांधकाम तज्ञ नियोजनाच्या प्रक्रियेत सामील असतात. नियोजनाची सुरुवात होते ती रस्ता कोणत्या प्रकारातील बनवला जावा हे समजण्यापासून. रस्त्यावरची वाहतूक आणि तो रस्ता शहराच्या/गावाच्या कोणत्या भागात आहे, त्या रस्त्यावरून किती प्रमाणात वाहनं जाणार आहेत यावर रस्त्याची बांधणी ठरते. याखेरीज हवामानाचा  रस्त्यावर होणारा परिणाम, लागणारा पैसा, उपलब्ध सामग्री आणि सुरक्षितता या बाबी लक्षात घेतल्या जातात.
नियोजनात मोठा काळ जाऊ शकतो. काहीवेळा तर वर्षानुवर्ष नियोजनात जातात. रस्ता ज्या भागातून जाणार आहे त्या भागातल्या लोकांना याची माहिती दिली जाते. त्यांच्या बैठका होतात. सरकारी यंत्रणा वेगवेगळ्या कंत्राटदारांना बोली लावायला सांगतात. त्यातून जो आर्थिकदृष्ट्या चांगलं काम करेल त्याची निवड केली जाते. एकदा का सगळं ठरलं की मग खऱ्या बांधकामाला सुरुवात होते. रस्त्याचा आकार, लांबीनुसार रस्ता किती दिवसात पूर्ण होईल हे ठरतं.

 

भक्कम पायाभरणी

बांधकामाचा पहिला टप्पा असतो भक्कम पायाभरणीचा. भक्कम पायाशिवाय रस्ते लवकरच खचून जाण्याची शक्यता असते. रस्त्याची जमीन भक्कम बनवण्यासाठी मोठ्याप्रमाणात माती-दगडांचा भरणा घातला जातो. भर घातल्यानंतर खड्यांचे थर घातले जातात. त्यावरून मशीन फिरवून सर्व बाजू समांतर केल्या जातात. या सुरुवातीच्या टप्प्यावरच नाले, गटारे बांधली जातात.

 

पायाभरणी झाल्यानंतर फरसबंदीचं काम सुरु होतं. यासाठी सर्वसाधारणपणे डांबर आणि कॉंक्रीटला पसंती दिली जाते. नियोजनाच्यावेळी कोणत्या प्रकारची वाहनं रस्त्यावरून जाणार आहेत याचा केलेला विचार यावेळी उपयोगी पडतो. ज्या प्रकारची वाहनं जाणार आहेत त्यावरून कोणती सामग्री वापरली जाईल हे ठरवलं जातं.
डांबरमध्ये असलेला बिटुमन पदार्थ खडी आणि मातीला घट्ट बांधून ठेवण्याचं काम करतो. यासाठी डांबर ३०० डिग्रीवर तापवून रस्त्यावर ओतलं जातं. हे काम फारच जलदगतीने करावं लागतं. त्यामुळे डांबर रस्त्यावरच गरम केला जातं.
 

शेवटची प्रक्रिया

शेवटच्या प्रक्रियेत रस्ते बांधणीसाठी तयार केलेले पोलादी साचे लावले जातात. त्यावर  खडी, वाळू, सिमेंट यांचे मिश्रण घातले जाते. हे मिश्रण कोरडे झाल्यानंतर त्यावरून बुलडोझर फिरवून जागा सपाट केली जाते. वाहतुकीने रस्त्यांवर भेगा पडू नयेत म्हणून कॉंक्रीटच्या थराचे चौकोनी भाग केले जातात. हवामानामुळे किंवा वाहतुकीमुळे येणाऱ्या दबावाला सामोरं जाण्यासाठी ही व्यवस्था असते.
 
तर मंडळी, हा आहे रस्ते बांधणीचा आदर्श नमुना. हे आपल्या भारतीयांना स्वप्नवत वाटत असलं तरी इतर देशांमध्ये याच प्रकारे रस्ते बांधले जातात. एवढंच काय आपल्या देशातही अशाच पद्धतीने रस्ते बांधले जावे असे नियम आहेत, पण खरे रस्ते भलत्याच पद्धतीने बांधले जातात. असो...
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required