computer

अमेरिकेच्या CIA ने ५० वर्षे भारत आणि इतर १०० देशांवर अशी पाळत ठेवली!!

एन्क्रिप्शन म्हणजे एखादी माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवताना तिला सांकेतिक भाषेत बदलणे. म्हणजेच कोणी तिसऱ्या व्यक्तीने ही माहिती चोरण्याचा प्रयत्न केला, तर तिला ती माहिती वाचताच येणार नाही.

भारत, पाकिस्तान, बांगलादेश सहित जगभरातील १०० देशांनी आपली माहितीची देवाणघेवाण गुप्त ठेवण्यासाठी एका स्विस कंपनीची यंत्रणा विकत घेतली होती. पण या सर्व देशांना हे माहित नव्हतं की ज्या कंपनीची यंत्रणा ते वापरत आहेत ती स्वित्झर्लंडची नसून अमेरिकेच्या  Central Intelligence Agency म्हणजे CIA सारख्या गुप्तचर संघटनेच्या मालकीची आहे. गेली ५० वर्ष CIA ने या कंपनीच्या आडून १०० देशांवर पाळत ठेवली. ही गोष्ट आता उघड झाली आहे.

CIA ने हे काम गुप्तपणे कसं पार पाडलं?

या कंपनीचं नाव आहे क्रिप्टो एजी. या कंपनीने १९५१ साली CIA शी हातमिळवणी केली आणि १९७१ साली CIA ने कंपनी पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतली. या भानगडीत फक्त CIA च नव्हती, तर तिला जर्मन गुप्तहेर संघटना BND intelligence service पण सामील होती.

क्रिप्टो एजी ही कंपनी ‘एन्क्रिप्शन उपकरणे’ विकण्याचं काम करते. या कंपनीने आजवर जवळजवळ १०० देशांना एन्क्रिप्शन उपकरणे विकली आहेत.  एन्क्रिप्शन उपकरणे ही माहिती सुरक्षित ठेवण्याचं काम करतात, पण ‘क्रिप्टो एजी’ने विकलेल्या उपकरणांमधून CIA आणि जर्मन गुप्तहेर संघटना या सर्व गुप्त गोष्टी ऐकत होत्या. 
ही बाब वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने उघड केली आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या हाती CIA ची कागदपत्रे लागली आहेत. या कागदपत्रांमधून जी माहिती मिळाली ती त्यांनी जगासमोर आणली.

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार CIA ने या संपूर्ण मोहिमेला 'ऱ्यूबिकन' असं नाव दिलं होतं. ऱ्यूबिकन हा या गुप्तचर संघटनांचा या शतकातला सर्वात मोठा हल्ला होता. ऱ्यूबिकनच्या अंतर्गत  CIA आणि अमेरिकेच्याच नॅशनल सिक्युरिटी एजेन्सी यांनी जर्मन गुप्तहेर संघटनेसोबत मिळून १९७० पासून क्रिप्टो एजी कंपनीला नियंत्रित केलं आहे. कंपनीचा कार्यभाग पाहण्यापासून ते कंपनीचं तंत्रज्ञान  तयार करणे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचं काम या गुप्तहेर संघटनांनी केलं आहे.

ज्या देशांवर अमेरिकेने पाळत ठेवली त्यात रशिया आणि चीन या दोन देशांचा समावेश होत नाही. क्रिप्टो एजी कंपनीचे अमेरिकेशी आणि पाश्चिमात्य देशांशी असलेले संबंध बघता हे दोन्ही  देश त्यापासून दूर राहिले, पण  इतर देशांकडून मिळालेल्या माहितीवरून अमेरिकेला या दोन देशांबद्दल बरीच महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

असं म्हणतात CIA आणि जर्मन गुप्तहेर संघटनेखेरीज या मोहिमेत इतर पाश्चिमात्य देशांचाही समावेश होता. अमेरिका आणि जर्मनीसोबत इस्रायल, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंगडम हे देशही या ऑपरेशनमध्ये सामील होते असं म्हटलं जात आहे.

CIA संपूर्ण जगावर करडी नजर ठेवून असते हे तर जगाला माहित होतंच,  पण आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required