computer

६० लाख ज्यूंची कत्तल करणाऱ्या आइकमनच्या मुसक्या कशा बांधल्या ?? भाग - १

तुम्हांला हिटलर तर माहित असेलच. महित नसला तरी माहितीतला कुणी आपलंच ते खरं करणारा  आणि हटवादी माणूस असेल तर त्याला आपण हिटलर म्हणतोच. तर, या हिटलरला  ज्यू म्हणजेच यहूदी लोकांबद्दल अतिशय तिटकारा होता. तो इतक्या टोकाचा ज्यूंचा तिरस्कार करत असे की त्याने चक्क ६० लाख ज्यूंना हालहाल करुन मारुन टाकले. याचा काही प्रमाणात ज्यू बहुल असलेल्या इस्रायलने बदला घेतला. हो, इस्रायल म्हणजे तोच तो मोसाद या गुप्तचर संस्थेचा देश. त्यांनी या हत्याकांडात सामील असलेल्या एकेकाला कसे शोधले हे खरंच वाचण्यासारखं आहे. आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत अशीच एक शोधाची आणि शिक्षेची रोमहर्षक कहाणी. 

ही गोष्ट आहे ॲडॉल्फ आईकमन या हिटलरच्या एका अधिकाऱ्याची. या जगातून ज्यू म्हणजेच यहुद्यांचा निर्वंश करावा अशा वेड्या विचाराने पछाडलेल्या अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या दु:स्वप्नाला साकार करण्यासाठी ६० लाख यहुद्यांना मारणारा अ‍ॅडॉल्फ आइकमन!! या मारेकर्‍याला अज्ञातवासातून शोधून, त्याची अर्जेंटीनातून उचलबांगडी करून, कोर्टासमोर उभा करून, सरतेशेवटी फाशी देणार्‍या इस्राएलच्या चित्तथरारक प्रयत्नांची ही कथा आहे.

पण कथेला सुरुवात करण्यापूर्वी अ‍ॅडॉल्फ आइकमन कोण होता हे जाणून घेऊ या ?

जर्मनीच्या विकासाआड येणारी देशद्रोही जमात म्हणजे यहूदी अशी हिटलरची धारणा होती. त्याप्रमाणे १९४१ पर्यंत यहूद्यांची जर्मनीतून हकालपट्टी हे एकच धोरण  त्यानी अंमलात आणले होते होते. १९४१ साली मात्र त्याने कहर केला. त्याने होलोकॉस्ट म्हणजे यहुद्यांचा संपूर्ण निर्वंश  हे नवीन धोरण अस्तित्वात आणले. जर्मनी आणि जर्मनीच्या अधिकारातील राष्ट्रांतून ज्यूंना एकत्र करून, जनावरासारखे धरून बांधून, छळछावण्यांमध्ये डांबून, त्यांची सामूहीक हत्या करणे म्हणजे होलोकॉस्ट!! आधी बंदूकीच्या फैरी झाडून, त्यानंतर बंदूकीच्या गोळ्या वाया जाऊ नयेत म्हणून त्या लोकांना विषारी गॅस चेंबरमध्ये टाकून, किंवा जे शक्य असतील ते अमानवी प्रयोग करून साठ लाख ज्यूंची हत्या करणं म्हणजे होलोकॉस्ट!! 

अ‍ॅडॉल्फ आइकमन या छळछावण्यांचा प्रमुख होता. वेगवेगळ्या देशातील ज्यूंची आकडेवारी शोधून,  त्यांची रवानगी ऑशविट्झच्या छळछावणीत करणे, त्यांची सामूहिक हत्या करणे हा त्याचा एक कलमी कार्यक्रम होता. दुसरे महायुध्द संपले तेव्हा ज्या युध्द गुन्हेगारांवर खटला चालवला गेला तो खटला न्यूरेन्बर्ग खटला म्हणून प्रसिध्द आहे. या खटल्यातल्या एक युध्द गुन्हेगार डाएटर वेस्लिसेनी यानी त्याच्या कबुली जबाबात आइकमनचे एक वक्तव्य सांगीतले होते. आईकमन म्हणाला होता-  "पन्नास लाख यहूद्यांना मारून जे आत्मिक समाधान मला मिळाले आहे,  त्या आनंदात मी हसतहसत कबरीत उडी मारायला तयार आहे". 

पण न्यूरेन्बर्ग खटल्याच्या दरम्यान आइकमन कुठे गायब झाला होता ?

(न्यूरेन्बर्ग खटला)

युध्द संपल्यावर आइकमन इतर नाझी अधिकार्‍यांसोबत तुरुंगात होता. आपली ओळख त्याने 'ऑटो आईकमन’ अशी सांगितली होती. हे बिंग फुटले तेव्हा तो तुरुंगातून पळाला. त्यानंतर तो 'ऑटो हेनिंगर' या नावाने १९५० सालापर्यंत लपत छपत फिरत राहीला. या कालखंडातही  नाझींचे समर्थकांच्या  मदतीने त्याने 'रीकार्डॉ क्लेमेंट' या नावाने खोटा पासपोर्ट बनवला आणि दक्षिण अमेरिकेत पळून गेला. यानंतर लहानसहान कामे करत तो ‘मर्सिडीझ बेंझ’च्या कारखान्यात नोकरीला लागला. १९४५ साली युध्द संपले, पण आइकमन हाती लागायला १९६० साल उजाडावे लागले. १९६० साली पण त्याचा पत्त्ता लागलाच नसता, पण दोन तरुण जीवांच्या एका 'डेट' मधून या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले.

नक्की काय घडलं हे प्रकरण?

नाझींच्या छळछावणीतून बचावलेल्या लोकांनी त्यांची एक संघटना बनवली आणि त्याद्वारे त्यांनी युरोपभर पसरलेल्या नाझी अधिकार्‍यांचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न चालूच ठेवले होते. 'नाझी हंटर्स' या टोपण नावाने या संघटना ओळखल्या जायच्या. टुव्हिआ फ्रीडमन या 'नाझी हंटरने 'आइकमनचा शोध लावण्यासाठी दहा हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. या बक्षीसाची घोषणा झाली आणि लोथार हर्मन नावाच्या एका आंधळ्या माणसाने त्यांना पत्र पाठवून अ‍ॅडॉल्फ आइकमनचा छडा लागल्याचे सांगीतले. एका आंधळ्या माणसाला आइकमनचा पत्ता कसा लागला हा एक योगायोगच होता. 

(लोथार हर्मन)

लोथार हर्मन हा पण एकेकाळी नाझी छळछवणीतला बंदी होता. या बंदिवासात असताना झालेल्या मारहाणीमुळे त्याची दृष्टी गेली होती. युध्दानंतर तो अर्जेंटीनात  राहायला गेला. तिथे त्याची मुलगी सिल्वीया आणि क्लॉस आइकमन नावाचा मुलगा नियमित डेटींग करत होते. या निमित्ताने लोथारच्या घरी त्याचे येणेजाणे होते. हे इथपर्यंत ठीकच होते, पण त्या मुलाच्या बोलण्यात यहुद्यांबद्दल तिरस्कार जाणवायला लागल्यावर आणि त्याचे वडील जर्मन लष्करी असल्याचे कळल्यावर  लोथारला मुलीच्या बॉयफ्रेंडचा संशय आला.  १९५७ साली नाझी युध्दकैद्यांवर फ्रँकफुर्ट येथे एक खटला सुरु झाला आंणि आपल्या मुलीच्या मित्राचा बाप म्हणजेच क्रूरकर्मा ॲडॉल्फ आइकमन याची लोथारला खात्री  पटली. 

(आइकमनचा खोटा पासपोर्ट)

लोथारने  ताबडतोब फ्रँकफुर्ट खटल्याच्या सरकारी वकीलाला ही माहिती पुरवली. ही माहिती जर्मन सरकारला दिली तर कारवाई कधी होईल याची खात्री नसल्याने त्या वकीलाने माहिती 'मोसाद' या इस्रायली गुप्तचर संस्थेला पुरवली. मोसादने सुरुवातीला रस दाखवून काही गुप्तहेरांना आईकमनला शोधायला पाठवले.  पण त्यां गुप्तहेरांचा अहवाल फारसा उत्साहजनक नव्हता. त्यामुळे ते प्रकरण मागे पडले. या दिरंगाईला कंटाळून लोथारने त्या बक्षीस जाहिर केलेल्या नाझी हंटर फ्रीडमनसोबत पत्रव्यवहार सुरु केला. फ्रीडमनचा उद्देश चांगला होता. पण अंदरकी बात अशी होती की त्याच्याकडे बक्षीस देण्यासाठी पैसेच नव्हते. शेवटी एक दिवस त्याने नाईलाजाने ही माहिती मोसादला पुरवली. या वेळी मोसादने जलद पावले उचलली आणि १४-गॅरीबाल्डी स्ट्रीटवर राहणारा-मर्सिडीझ बेंझ या कंपनीत काम करणारा इसम अ‍ॅडॉल्फ आइकमनच आहे हे निश्चित झाले.

आईकमनचा ठावठिकाणा कळाला, पण अर्जेंटिनामधून त्याला इस्रायलमध्ये आणणं सोपं काम नव्हतं. या कथेचा पूर्वाध जितका रंजक, उत्तरार्ध तितकाच उत्कंठावर्धक आहे. आईकमनला आपल्या देशात आणण्याचं मोसादने नक्की कसं केलं हे लवकरच वाचा या कथेच्या दुसऱ्या भागात.. तोवर मोसादच्या कोणत्या कामगिरीबद्दल तुम्हांला आपल्या मायमराठीत वाचायला आवडेल हे आम्हांला सांगायला विसरु नका..

सबस्क्राईब करा

* indicates required