computer

व्हाट्सअॅपला पर्याय म्हणून सिग्नल आलाय...इंस्टॉल करण्यापूर्वी फायदे आणि तोटे जाणून घ्या !!

व्हाट्सअॅपमध्ये बदल होणार अशी बातमी फिरत आहे. लोकांच्या प्रायव्हसीला या बदलांमुळे धक्का बसू शकतो असे हे बदल आहेत. यामुळे लोकांना व्हाट्सअॅपला नवा पर्याय असावा असे वाटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांना टेलिग्रामची आठवण आली. तितक्यात एलन मस्कचे एक ट्विट येऊन धडकले ‘युज सिग्नल!’

आता हा एलनभाऊ साधा सुधा माणूस नाही जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती! थेट मंगळावर नवी सृष्टी निर्माण करण्यासाठी धडपडणारा अवलिया. त्याने सांगितले म्हटल्यावर सिग्नल ऍपवर लोकांनी उड्या मारायला सुरुवात केली.

पण आमच्या वाचकांना हे ऍप नेमके आहे काय आणि कसे चालते हे सांगणे आमचे कर्तव्य ठरते. म्हणून आज आम्ही सिग्नल ऍपबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

सिग्नल हे ios, अँड्रॉईड आणि विंडोजवर उपलब्ध आहे. व्हाट्सअॅपवर जसे फोटो, विडिओ, मॅसेज सगळे पाठवता येते तसे इथे देखील तुम्हाला पाठवता येणार आहे. हे ऍप असे सॉफ्टवेअर आहे जे एन्ड टू एन्ड एनक्रिप्शनचा वापर करते एनक्रिप्शन म्हणजे एखाद्या डाटाला कोडमध्ये रूपांतरीत करणे.

सिग्नलचं वैशिष्ट्य म्हणजे यात तुमचा डाटा साठवून ठेवला जात नाही. म्हणजेच तुमची प्रायव्हसी जपली जाऊ शकते. सिग्नल हे ऍप पूर्णपणे फ्री आहे. मोबाईल डाटाचा वापर करून तुम्ही सिग्नलचा वापर करू शकता.यात एमएमएसची देखील सुविधा आहे. तुमचा जसा रिचार्ज असेल त्यानुसार तुम्ही एसएमएस करू शकता. सिग्नलवर ग्रुप कॉल करता येतो, तब्बल 150 लोकांसोबत तुम्ही ग्रुप कॉलवर बोलू शकता.

सिग्नलवर असलेले प्रायव्हसी फीचर्स

सिग्नलवर स्क्रीनलॉक सारख्या पर्यायांबरोबरच मेसेज अपोआप डिलीट करण्याचाही पर्याय आहे. म्हणजे तुम्ही मेसेज सोबत एक एक्सपायरी डेट ठरवू शकता. अमुक एका तारखेपर्यंतच तो मेसेज समोरच्या व्यक्तीला दिसेल, त्यानंतर तो अपोआप डिलीट केला जाईल. याखेरीज मेसेजमध्ये येणाऱ्या लिनक्सच्या प्रिव्ह्यूज बंद करता येणं शक्य आहे. तसेच तुम्ही मेसेज कधी वाचला याची वेळ लपवता येऊ शकते. यात रिले कॉल्स नावाचे एक फिचर आहे, ज्यामुळे जेव्हा तुम्ही रिले कॉल ऑप्शन निवडता तेव्हा तुम्ही केलेल्या कॉलचा आयपी ऍड्रेस ट्रेस होऊ शकणार नाही. पण यामुळे तुमच्या कॉलची क्वालिटी मात्र कमी होऊ शकणार आहे.

तुम्ही टायपिंग करत आहात हे समोरच्याला दिसावं किंवा नाही हे देखील तुम्हाला ठरवता येणार आहे. तुमचे ऍप सुरक्षित राहावे यासाठी तुम्ही पिन सेट करू शकता. पण एकदा का पिन विसरले तर त्याला रिकव्हर करता येणार नाही. यात स्क्रीन लॉकची पण सोय देण्यात आली आहे. सिग्नल तुमचा फोन नंबर आणि इतर आवश्यक माहिती सोडून तुमची कुठलीही प्रायव्हेट माहीती जमा करत नाही. एवढेच नाहीतर तुम्ही चॅट्सचे बॅकऍप देखील करू शकत नाही. म्हणजेच फोन गेला तर चॅट देखील गेली असे समजून चालायचे.

तर ही होती सध्या धुमाकूळ घालत असलेल्या सिग्नल ऍपची सगळी माहिती. यावरून व्हाट्सअप ऐवजी हे ऍप वापरावे की नाही याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता.

 

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required