computer

पँटची चैन आयत्यावेळी दगा देते तेव्हा काय कराल? हे ५ उपाय करून पाहा !!

प्रत्येक क्षणाला जग बदलत आहे ! बदलाला सामोरे जा ! बदल म्हणजेच जीवन ! अशा सतत कानावर पडणार्‍या सुविचारांना विसरायला लावणार्‍या काही वस्तू आपण रोज वापरतो. अगदी शंभर वर्षं  उलटल्यावरही न बदलता ज्या गोष्टी वापरतो त्यापैकी एक गोष्ट म्हणजे चेन आणि चेनचे रनर !

१८५१ साली इलियास होवे या माणसानी पहिला झिपर बनवला, ४० वर्षांनी व्हाइट्कोंब ज्यूडसन या माणसाने झिपरच्या डिझाइनमध्ये सुधार करून त्याचा प्रचार केला, पण लोकांना काही ती कल्पना जमली नाही. आपण आज वापरतो ती चेन अस्तित्वात आली १९१३ साली! मागच्या कितीतरी वर्षांपासून कुठलाही बदल न होता आपल्या आजच्या पिढीकडे आहे अशी आलेली गोष्ट म्हणजे चेन. आज जाकेट, पॅन्टस, शूज, बॅग्स, तंबू अगदी कुठे कुठे या चेनचा वापर केला जातो.

आता याला झिपर म्हणजे मराठीत झिप्पर म्हणतात किंवा चेन म्हणजे मराठीत चैन असं म्हणतात ! ही चेन नको तेव्हा दगा देते आणि काय पंचाईत होते ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे ! अशा अडचणीच्या वेळी काय करायचं ते आज बघू या.

सोबत काही ट्रिक्स देत आहोत त्या वापरून पहा आणि आपली चेन घरच्या घरी दुरुस्त करा.

जेव्हा चेन ओढायला जड जाते -

काही वेळेला आपल्याकडे असलेल्या वस्तूची चेन ही जड होते आणि ती ओढताना अडकते तेव्हा काय करायचं, तर एखादी साधी पेन्सिल घ्या आणि तिच्या टोकाला चेनच्या दातरे असलेल्या ट्रॅकवर घासा, यातून काय होईल तर पेन्सिलमध्ये असलेले ग्राफाईड कोरडे वंगण म्हणून काम करेल व तुम्हाला चेन ओढायला हलकी होईल, आणि जर पेन्सिल नसेल किंवा पेन्सिल तुमच्या चेनवर काम करणार नाही तेव्हा मेणबत्तीची कांडी घासून सुद्धा तुम्ही हा प्रयोग करू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता. हे करण्यासोबतच एकदा आपल्या चेनचे दातरे सुद्धा तपासा जेणेकरून ते वाकडे झाले असल्यास सुईने किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने ते सरळ करता येतील.

अडकलेली चेन -

ही समस्या बऱ्याचदा कापड्यांसोबत उद्भवते, काही वेळेला जॅकेट किंवा जीन्स वगैरे घातलेली असताना त्याची चेन मध्येच अडकते आणि चेनला पुढे जाण्यास अडथळा येतो अशा वेळेला चेनच्या सोबत असलेली कापडाची पट्टी ही चेनचे रनर आणि दातेऱ्यांच्या मध्ये अडकलेली असते. यावर उपाय म्हणजे चेनला अलगद पुढे ओढण्याचा प्रयत्न करा आणि मागे सुई किंवा टोकदार वस्तू घालून अडकलेलं कापड सोडवण्याचा प्रयत्न करा. चेन पुढे ढकलताना मागे असलेलं अडकलेलं कापड हातात व्यवस्थित पकडून ठेवा जेणेकरून ते चेन सोबत पुढे जाणार नाही आणि त्याने चेनचे रनर तुटणार नाही.

खालीवर झालेली चेन -

बहुतांश वेळा घाईगडबडीत चेन ओढताना ती एका बाजूने जास्त ओढली जाते तर एका बाजूने कमी ओढली जाते याने काय होतं तर पॅन्टची चेन पूर्ण बंद होऊ शकत नाही आणि तिला घड्या पडतात. अशा वेळेला काय कराल तर चेनच्या ट्रॅकचे खालच्या टोकाचे ३ ते ४ दातरे कापून टाका आणि चेनच्या रनरला खाली ओढा म्हणजे तो रनर समांतर होईल आणि तुम्ही चेन पुर्णपणे बंद करू शकाल. याचबरोबर तुम्ही पक्कडचा वापर करून सुद्धा अडकलेल्या कपड्यापासून चेन सोडवू शकता, पण त्यावेळेला चेनचे रनर तुटणार नाही याची दक्षता घेणे अतिशय महत्वाचे आहे. हे करून सुद्धा जर चेन पुढे जात नसेल किंवा हे सगळं करणं शक्य नसेल, तर लहानशा चाकूने किंवा घरातल्या कात्रीने मागे अडकलेले कापड कापून मोकळे करता येईल.

बंद न होणारी चेन -

कधीकधी आपण चेन ओढतो तेव्हा ती पुढे सुद्धा येते पण ट्रॅक बंद झालेला नसतो. अशा वेळी आपण चेन स्लिप झाली आहे असं म्हणतो. बऱ्याचदा ही समस्या उद्भवते. गंमत म्हणजे चेन सुद्धा व्यवस्थित असते आणि चेनच्या ट्रॅकचे दातरे सुद्धा व्यवस्थित असतात. मग नेमकी अडचण काय होते? तर नरच्या पुढच्या किंवा मागच्या तोंडाचा आकार बदलतो आणि त्यामुळे चेनचे रनर दात्र्यांना एकत्र आणू शकत नाही व आपली चेन निकामी होते. अशा वेळेला काय करायचं तर घरात असलेली पक्कड घ्या, पकडीच्या साह्याने एकदम अलगद चेनच्या रनरचे तोंड दाबा जेणेकरून रनर त्याच्या मूळ रुपात परत येईल आणि तुमची चेन पूर्ववत होईल. पण हा उपाय करताना अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे कारण हे करताना जर तुम्ही जास्त जोर लावला तर रनर नाजूक असल्याने तो तुटून जाऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो.

पॅन्टची चेन बंद होत नाही किंवा ती सारखी खाली जाते -

या समस्येवर सर्वात सोपा मार्ग असतो तो म्हणजे ही संपूर्ण चेन बदलून टाकणे, कारण पॅन्टची चेन ही अतिशय बारीक असल्याने तिला दुरुस्त करणे शक्य नसते पण तरी सुद्धा तुम्ही एक ट्रिक वापरून पॅन्टची चेन तात्पुरती बंद करू शकता. ही ट्रिक म्हणजे चेनच्या रनरला असलेल्या छिद्रात किचेनला असते ती रिंग अडकवा आणि मग हळूच रनर वर खेचा. रनर वर आल्याच्यानंतर तुम्ही अडकवलेली रिंग आता पॅन्टला असलेल्या बटन मध्ये अडकवून टाका हे केलं की तुम्हाला तुमच्या पॅन्टच्या चेनचा प्रॉब्लेम तात्पुरता का होईल सोडवता येईल.

तर या काही चेन दुरुस्त करणाऱ्या अगदी सोप्या आणि सहज करता येतील अशा गोष्टी आम्ही आपल्याला सांगितल्या यांच्या मदतीने तुम्ही नक्कीच घरच्या घरी चेन दुरुस्त करू शकता.

 

लेखक: श्रीपाद कुलकर्णी

 

आणखी वाचा: 

आपल्या पँटच्या झिपरवर YKK का लिहिलेलं असतं?

सबस्क्राईब करा

* indicates required