computer

आपल्या पँटच्या झिपरवर YKK का लिहिलेलं असतं?

दिवसातून चार पाच वेळा आवश्यकतेनुसार वरखाली करण्यापलीकडे आपल्या पँटच्या झिपकडे किंवा चेनकडे किंवा चैनीकडे आपण फारसं लक्ष देत नाही. या पँटच्या झिपच्या टोकाकडे जर निरखून पाहिलंत तर  त्यावर YKK ही अक्षरं दिसतील. आता तुमच्या सगळ्या पँट एकदा चेक करा, सगळ्याच झिपवर YKK हीच अक्षरं दिसतील.  YKK हे कंपनीच्या नावाशी संबंधीत आहे हे नक्की पण सगळ्याच झिपवर YKK हे काय गौडबंगाल आहे?
 

आजच्या लेखातून या YKK बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

YKK ही पॅटच्या झिप बनवणारी जगातील सगळ्यता मोठी कंपनी आहे. दरवर्षी ही कंपनी ७०० कोटीहून अधिक झिपर बनवते. म्हणजे संपूर्ण जगातल्या ५०% अधिक झिपर फक्त  YKK बनवते. एकूण ७१ वेगवेगळ्या देशात YKK च्या फॅक्टर्‍या आहेत. त्यांच्या जॉर्जीयातल्या फॅक्टरीत तर दिवसाला १५०० वेगवेगळ्या स्टाइलच्या, ४२७ वेगवेगळ्या रंगात ७ लाखाहून अधिक चेन बनवल्या जातात. 

आता बघू या  YKK म्हणजे नक्की काय ?

योशीदा कोग्यो नावाच्या उद्योजकाने ही कंपनी सुरु केली म्हणून या नावात YK ही दोन अक्षरे आली. तिसरे अक्षर Kabushiki म्हणजे आपल्याकडे जसे कंपनीच्या नावासमोर 'लिमिटेड' लिहिले जाते त्या सारखे नाव आहे. या कारणाने झिपच्या टोकावर YKK ही अक्षरे असतात.

आता याला काही अपवाद पण आहेत. रेमंड वुलनसारख्या मोठ्या कंपन्या स्वतःच्या नावाने वेगळ्या झिप बनवून घेतात. जर्मनी आणि ब्रोटन मधल्या प्रीम आणि कोट्स या कंपन्यादेखील झिप बनवतात. 

काल तुम्ही बोभाटाचा 'कार्टेल'  या विषयावरचा लेख वाचला असेलच. सांगायची गोष्ट अशी की संपूर्ण जगाला कोट्यावधी झिप रोज लागतात. त्यामुळे आपल्या पँटच्या झिपच्या किमती पण YKK आणि इतर दोन कंपन्या कार्टेलिंग करून ठरवत होत्या. हे प्रकरण उघडकीस आल्यावर युरोपियन कमिशनने YKK ला २७ लाख युरोचा दंड ठोठावला होता. १ युरो म्हणजे ९० रुपये तर २७ लाख युरो म्हणजे किती रुपये हे गणित आता तुम्हीच मांडा !!!

तर, पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही पँटची झिप वरखाली कराल तेव्हा तुम्हाला बोभाटाचा हा लेख नक्की आठवेल.

सबस्क्राईब करा

* indicates required