१५० वर्ष चाललेली आतिषबाजी...नासाने नव्या वर्षानिमित्त शेअर केलेला फोटो काय सांगतो पाहा !!

अनेकदा आकाशात आपण फटाक्यांची आतिषबाजी बघतो. ही आतिषबाजी अवघ्या काही क्षणांत संपुष्टात येते. पण, नासा या अवकाश संशोधन संस्थेने आपल्या सोशल मिडिया साईटवर १५० वर्षापासून अवकाशात निसर्गतःच सुरु असलेल्या आतिषबाजीचा फोटो पोस्ट केला आहे.
अवकाशातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असणारी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था अनेकदा याबाबतचे फोटो आपल्या सोशल मिडियास साईटवर पोस्ट करत असते. सध्या नासाची ही पोस्ट खूप चर्चेत आहे. पृथ्वीपासून साडे सात हजार प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या इटा करिनी या ताऱ्यावर होणाऱ्या महाविस्फोटाचे हे दृश्य कुठल्याही आकर्षक आतिषबाजीला मागे टाकेल असे आहे.
नासाने २ जानेवारी रोजी केलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे. “गुड बाय २०२०. हॅलो, २०२१. दीडशे वर्षापासून चालत असलेली अशी स्लोमोशन मधील आतिषबाजी तुम्ही कधी पहिली आहे का? मग इटा करिनीकडे एकदा पहाच.”
नासाच्या हबल दुर्बिणीने हे दृश्य टिपले आहे. १८३८ साली पहिल्यांदा या महास्फोटाकडे शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले. १८४४ सालापासून हा तारा आकाशातील एक अत्यंत तेजस्वी तारा दिसू लागला. हा तारा इतका तेजस्वी दिसतो की दक्षिणी समुद्रातून प्रवास करणारे खलाशी या ताऱ्यालाच आपला दिशादर्शक मानून प्रवास करतात.
नासाच्या मते येणारे वर्ष म्हणजेच २०२१ हे वर्ष विज्ञानाच्या दृष्टीने फारच रोमांचक असणार आहे. सोशल मिडीयावर हा फोटो शेअर करताच नेहमीप्रमाणेच नेटकऱ्यांच्या कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
(इटा करिनी)
इटा करिनीवरील हा महाविस्फोट फार फार वर्षापुर्वीचा आहे आणि कदाचित याच्याही आधी त्या मोठ्या ताऱ्यावर असेच विस्फोट झाले असतील, अशीही शास्त्रज्ञांना शंका आहे. हबल दुर्बिणीतून याचे आणखी सुस्पष्ट रूप दिसेल, अशीही त्यांना खात्री आहे. हबल दुर्बिणीने टिपलेला हा सर्वात जास्त रिजॉल्यूशन असणारा फोटो आहे ज्यात या विस्फोटातून उत्सर्जित होणाऱ्या वायूंचे रंगही स्पष्ट दिसतात.
यात लाल, पांढरा आणि निळ्या रंगाच्या वायूचे त्याक्षणी होणारे उत्सर्जन अचूक टिपले आहे. सुरुवातीला हबलने या ताऱ्याचे जे फोटो टिपले आहेत, त्यामध्ये या ताऱ्यातून निघणारे वायूंचे, धुळीचे लोट एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फुटत असल्यासारखे दिसतात. गेल्याच वर्षी शास्त्रज्ञांना असे आढळले की, या विस्फोटातून बाहेर पडणारे वायू आणि धुळीचे कण तशी २ कोटी मैल इतक्या वेगाने बाहेर फेकले जात आहेत. या वेगाने जर आपण प्रवास केला तर अगदी मोजक्याच दिवसात आपण पृथ्वीवरून प्लुटोवर पोहोचू!
एडमंड हॅली यांनी यापूर्वीच सांगितले होते की इटा करिनी हा दोन ताऱ्यांचा समूह आहे आणि यातील मोठा तारा स्थिर असून लवकरच तो संपणार आहे. या तारका समुहातील दुसऱ्या ताऱ्याचा शोध २००५ मध्ये लागला. शास्त्रज्ञांच्या मते या ताऱ्यावरील हा विस्फोट आणखी तीव्र होत जाईल आणि एकतर तो न्यूट्रॉन स्टारशी धडकेल किंवा मोठ्या कृष्णविवरात पडेल.
खरे तर इटा करिनीवर होणारा हा काही पहिलाच विस्फोट नाही. मग याआधीच तो कृष्णविवरात गडप व्हायला हवा होता, पण तसे झाले नाही. हेही शास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक गूढच आहे. आणखी एका मतानुसार कदाचित हा तीन ताऱ्यांचा तारकासमूह असेल आणि यातील एक तारा नष्ट झाला असेल. त्यामुळेच हा विस्फोट झाला असावा.
हा तारका समूह नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे आर्मीन रेस्ट यांनीही २०१२ मध्येच सांगितले होते. कदाचित आणखी हजारो वर्षे देखील हा विस्फोट असाच सुरु राहू शकतो किंवा अगदी उद्या देखील तो संपू शकतो, असेही ते म्हणाले होते. हा विस्फोट नक्की कधी संपेल याबाबत कोणतेही निश्चित विधान करणे कठीण आहे.
अवकाशातील अशा विस्फोटांकडे नासाचे लक्ष असतेच आणि यापूर्वी देखील नासाने अशा काही महाविस्फोटांचे फोटो प्रसिद्ध केले होते. इटा करिनी हा आपल्या सूर्यासारखाच एक तेजस्वी तारा आहे. ब्रह्मांडातील तारे किती विस्फोटक असू शकतात याचे हे एक उदाहरण आहे.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी