अमेरिकन ड्रीम - गुजरातच्या पटेलांनी अमेरिका कशी जिंकली ?

'अमेरिकन ड्रीम' हा शब्द तुम्ही कधी ऐकला आहे का ? अमेरिकन ड्रीम म्हणजे जगातल्या कोणत्याही देशातून अमेरिकत या, आपली जात -धर्म -वंश विसरा, जीवतोड मेहनत करा, या देशात सगळ्यांना एकसारखी संधी मिळते - त्याचा फायदा करून घ्या आणि आपलं आयुष्य यशस्वी करा!! अमेरिका हा जगातला एकमेव असा देश आहे जिथे मूळ अमेरिकन नागरिक जेमतेम मूठभरच आहेत. नेमकं सांगायचं झालं तर हा देश स्थलांतरितांचा देश आहे. इथे इटालियन लोक पिझ्झा पार्लर चालवतात, चायनीज लोक लाँड्री व्यवसाय करतात, किराण्याची दुकानं कोरियन माणसं चालवतात, श्रीलंकेचे लोक व्हिडीओ पार्लरचा धंदा बघतात, व्हिएटनामी ब्यूटीपार्लर चालवतात, फिलीपिनो-मेक्सिकन हाऊसकिपिंग करतात, बांगला देशी पानाची दुकानं चालवतात, युध्द, भूक,गरिबीच्या सापळ्यातून बाहेर पडून ही सगळी माणसं आता खर्या अर्थाने 'अमेरिकन ड्रीम' जगत आहेत.
हे सगळं वाचल्यावर तुमच्या मनात एक प्रश्न तात्काळ उभा राहिल तो म्हणजे आपले भारतीय लोक अमेरिकेत काय करतात? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की सध्या अमेरिकेतले भारतीय 'अमेरिका' चालवतात!! आज अमेरिकेत 'इंडीयन अमेरिकन' हे अभिमानाने मिरवण्यासारखे स्टेटस आहे. पण हे स्टेटस मिळवण्यासाठी भारतातल्या एका राज्यातल्या निर्वासितांनी म्हणजे गुजरातमधल्या पटेल समाजाने जे कष्ट घेतले त्याचा थोडासा आढावा आज आपण घेऊ या !!
काही वर्षांपूर्वी 'आपण कुठून आलात?' या प्रश्नाचे उत्तर जर ' इंडिया ' असे कोणी दिले तर विचारणार्याचा पुढचा प्रश्न 'म्हणजे तुम्ही पटेल का?' असाच असायाचा. गुजरातेतला पटेल समाज मूलतः शेती आणि गावाची महसूली व्यवस्था बघणारा समाज आहे. शेतकरी असल्याने अंगमेहनत- परिश्रम करणे - काटकसर करणे - प्रामाणिक प्रयत्न करणे या समाजाच्या रक्तातच होते. हेच त्यांचे अमेरिकेत जाण्याचे भांडवल होते असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला म्हणजे १९ व्या शतकात आफ्रिकेतल्या अनेक देशात स्थलांतरीत आणि स्थायिक झाल्यावर गुजराती समाजाला आफ्रिकेतल्या राजकीय वातावरणामुळे नव्या देशाच्या शोधात फिरावे लागले. बरेच गुजराथी आधी इंग्लंडला गेले, तर काही अमेरिकेत पोहचले. या काळात अमेरिकेतले कायदे बरेच शिथिल होते. त्यामुळे काही लोक अगदी बेकायदेशीररित्या अमेरिकेत स्थायिक झाले.
त्याकाळात बेकायदेशीररित्या अमेरिकेत पोचलेल्या भारतीयांपैकी एक होते कानजी मंछू देसाई. या माणसाने कॅलिफोर्नियात एक ३२ खोल्यांचे हॉटेल चालवायला घेतले आणि अमेरिकेत एका गुजराथी वर्चस्वाची सुरुवात झाली. त्याला अमेरीकेत आजही 'पटेल -मोटेल-कार्टेल' असं म्हटलं जातं. मोटेल म्हणजे आपल्याकडे तालुक्याला जसा लॉज असतो, तसा अमेरिकन नमुना!! अमेरिकेतला बहुतेक प्रवास कारने होतो. या प्रवासात एखादी रात्र किंवा दिवस काढण्यासाठी फारसे महाग नसलेले, हायवेच्यालगत असलेले हॉटेल म्हणजे 'मोटेल'.
अमेरिकेत नव्याने आलेले पटेल या मोटेलच्या धंद्यात उतरण्याचे कारण असे होते की मोटेल लीज म्हणजे कराराने घेण्यासाठी पटेल समाजातूनच उसने भांडवल मिळायचे. बँकेकडे जाण्याची गरज नव्हती आणि बँका नव्या पटेलला कर्ज द्यायच्या नाहीत. लीजचा खर्च सोडल्यास नोकर चाकरांचा खर्च पटेल करायचेच नाहीत. मोटेलमध्ये त्यांना नोकरांची गरजच नव्हती, एक पटेल आणि त्याचे कुटुंब मोटेल सांभाळायचे. चोवीस तासांतले सोळा तास काम करणार्या या पटेलांचे बस्तान बसले की त्यांना बँकांकडून कर्ज मिळायचे. हे झाले की दुसरे मोटेल!!
साठीच्या दशकानंतर अमेरिकेत कायदेशीर मार्गाने पटेलांची आवक वाढली. त्यानंतर फक्त मोटेलच नाही, तर पेपर स्टॉल, किराणा मालाचे दुकान किंवा ज्या धंद्यात मेहनत हेच भांडवल लागायचे असा कोणताही धंदा पटेल करायचे. जयंतीभाई पटेल या गृहस्थांचेच उदाहरण आपण आता बघू या! जयंतीभाई १९७० साली कॅलिफोर्नियात आले. त्यांनी मोटेल व्हिन्सेंट नावाचे एक मोटेल चालवायला घेतले. जयंतीभाई दिवसभर बँकेत नोकरी करायचे आणि रात्री मोटेलमध्ये काम करायचे. पुढच्या दहा वर्षांत त्यांची दोन मुलं हाताशी आली. त्यांनीही मेहेनत करून आणखी चार मोटेल चालवायला घेतली. आज त्यांच्या मुलांच्या मुली हा व्यवसाय पुढे नेत आहेत.
पटेल समाजाकडून स्फूर्ती घेऊन इतर गुजराथी समाजही याच व्यवसायात उतरला. मनोज पांडोरीया या मुलाचे हे स्वगत वाचा.
"१९८१ साली आमच्या कुटुंबाने नॉर्थ कॅरोलायनामध्ये हे २३ खोल्यांचे मोटेल चालवायला घेतले. मला वीकएंड हा प्रकारच माहिती नव्हता. वीकएंड म्हणजे हॉटेलची साफसफाई!!" घर आणि धंदा यात काही अंतरच नव्हते. बेल वाजली की ग्राहकाच्या हाकेला ओ द्यावीच लागायची." मनोज आज सत्तेचाळीस वर्षांचा आहे, जुने मोटेल त्याने दुसर्या पटेलला विकले आहे. आयबीएमसारख्या कंपनीतली नोकरी सोडून त्याने 'स्पा;ची शृंखला सुरु केली आहे.
१९८० च्या नंतरच्या काळात पटेल म्हणजे मोटेल हे असाच शिरस्ता झाला होता. आजच्या घडीला अमेरिकेतले ७० टक्के मोटेल फक्त पटेल आणि इतर गुजराथी समाजाकडे आहेत. सध्याची पिढी ही अमेरिकेतील पटेलांची तिसरी पिढी आहे. अर्थातच, ती पूर्णपणे अमेरिकन आहे. जीवनमान १००टक्के अमेरीकन झाले आहे, पण आजही ते आपली भाषा विसरलेले नाहीत. घरी अजूनही गुजराथीतच संभाषण असते. बहुतेक लग्ने अजूनही समाजातच होतात, नवरात्री -गरबा दिवाळी जुन्याच पध्दतीने साजरी होते.
या नंतरच्या काळात अमेरिकेत अनेक बदल झाले. पटेलांची मक्तेदारी कमी करण्याचे प्रयत्न झाले. पटेलांना अमेरिकन व्हिसा मिळेनासा झाला. तिकडे उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी फक्त पटेल आडनावामुळे व्हिसा रिजेक्ट होऊ नये म्हणून आडनावे बदलली. एककाळी फक्त मोटेलच्या धंद्यात असलेले पटेल आता अनेक वेगवेगळ्या व्यवसायांत आहेत. गेल्या काही वर्षांत पटेल म्हणजे 'इंडियन ग्रोसरी शॉप' असा एक नवा पायंडा पडला आहे.
आज अमेरिकेत शिकायला गेलेल्या भारतीय मुलांना फोनवर जेव्हा पालक विचारतात की "इकडून काही पाठवू का?' तेव्हा सगळ्या मुलांचे एकच उत्तर असते ' काहीही पाठवू नका, इकडे 'पटेल ब्रदर्स'मध्ये सगळं काही मिळतं!!"
पुढच्या भागात हा नविन पटेल फंडा काय आहे ते वाचू या!!!