कसे ओळखाल मेण लावलेले सफरचंद?
बाजारात चकचकीत आणि तजेलदार सफरचंदं दिसली, की घ्यायचा मोह होतो. आरोग्यासाठी फळं खाल्ली पाहिजेत असं मत सर्वमान्य असलं तरी फळं खरेदी करताना ती चांगली असतील की नाही याबद्दल मनात एक धास्ती असतेच. त्यात आजकाल भर पडलीय अनैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांची आणि मेण लावलेल्या सफरचंदांची. चांगला आंबा कसा ओळखायचा हे तर यापूर्वी पाहिलं आहेच. मेण लावलेली फळं नीट पचत नाहीत, त्यामुळे आतड्याचे आणि परिणामी पोटाचेही विकार होतात. असं फळ टाळलेलं केव्हाही चांगलंच.
सफरचंदाला मेण का लावतात?
फळाचा ओलावा आतच टिकण्यासाठी आणि मुख्यत: फळ तजेलदार दिसण्यासाठी फळावर मेणाचा थर देतात. फळ खूप दिवस ताजं दिसण्यासाठीही मेणाची मदतच होते.
आता मेण लावलेल्या सफरचंदाचं करायचं तरी काय?.
१. अवाजवीरित्या चकचकीत असेल तर तो खोटा तजेला आहे. असं फळ मुळात विकत घ्यायचंच नाही. थोड्या नैसर्गिक सुरकुत्या असलेलं फळ उत्तम.
२. घरी आणल्यानंतर फळावर थोडं गरम पाणी ओतलं तर काही वेळाने मेण थिजून फळाच्या पृष्ठभागावर पांढुरकं दिसायला लागतं.
३. पांढरा व्हिनेगर किंवा लिंबाच्या मदतीनेही मेण काढता येतं.
४. व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याच्या एकत्रित मिश्रणाने सफरचंद धुतल्यासही त्यावरचं मेण दिसतं.
५. काही दुकानांमधून भांडी घासायचा असतो तसा फळं आणि भाज्या धुवायचा लिक्विड साबण मिळतो. मनात शंका नको असेल तर आणलेली सगळी फळफळावळ एकदा त्या साबणाने धुऊनच टाकावी.
दृष्टीआड सृष्टी असल्याने आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी शक्य ते सारं करून निरोगी आयुष्य मिळवण्याचा प्रयत्न करायलाच हवा, नाही का?




