computer

१९७५ साली किशोर कुमार यांच्या गाण्यावर बंदी का आली होती? हा किस्सा त्याच्या कट्टर चाहत्यांनाही माहित नसेल!!

कोव्हिडने घरात कोंडलेल्या तुमच्या आजोबांच्या उदास मिटमिट डोळ्यांना लखलखीत उजळताना तुम्हाला बघायचं असेल तर आज त्यांना इतकंच सांगा "आबा, आज किशोरकुमारचा जन्मदिवस आहे!" दुसर्‍या क्षणी एक खोडकर हसू तुम्हाला त्यांच्या चेहेर्‍यावर झळकताना दिसेल!!

१९६९ च्या दरम्यान तरुण प्रेमात पडण्याच्या वयात असलेल्या त्या पिढीला आराधनाच्या 'मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू' - 'रुप तेरा मस्ताना ' या गाण्यांनी वेड लावलं होतं. रोमँटिक होण्याची ती पहिली लाट होती. त्यानंतर शर्मिलीचं 'खिलते है गुल यहां' आलं आणि त्यानंतर फक्त नॉन स्टॉप किशोरकुमारचा जमाना होता! ऑल इंडीया रेडिओ आणि विविध भारतीवर अहोरात्र फक्त किशोर कुमारच! १९७५ साली अचानक एक दिवस किशोरकुमारची गाणी ऐकू येईनाशी झाली. बाजारात त्यांच्या रेकॉर्डस् मिळेनाशा झाल्या, सिनेमांत किशोरकुमारच्या गाण्यावर बंदी आली. नक्की काय झालं होतं ते सामान्य जनतेला तेव्हा कळलंच नाही. नंतरच्या काळात कळलं ते असं की सरकारने किशोरकुमार यांच्यावर बंदी घातली होती. काय होता हा प्रकार ते आजच्या लेखात वाचूया!!

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. त्या काळात रेडीओ हे एकच सरकारी प्रचार आणि प्रसाराचे एकमेव माध्यम होते. साहजिकच नभोवाणी खात्याचे मंत्रीपद मिळणे ही मोठी गोष्ट समजली जायची. १९७५च्या मंत्रीमंडळात हे पद विद्याचरण शुक्ल यांना देण्यात आले होते. आणीबाणीच्या कार्यक्रमात एक महत्वाचा सरकारी कार्यक्रम होता ज्याला '२० कलमी कार्यक्रम' म्हटले जायचे. शेती- अन्न सुरक्षा- कुटुंब नियोजन -आरोग्य- गृहनिर्माण आणि इतर अनेक उद्देशांची यादी म्हणजे म्हणजे हा २० कलमी कार्यक्रम होता. बॉलिवूडच्या कलाकारांनी रेडिओ आणि टेलीव्हिजनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा प्रसार करावा अशी विद्याचरण शुक्ल यांची कल्पना होती. रेडिओला महत्व जास्त होते कारण त्या काळात टिव्हीचा प्रसार फक्त ७ मोठ्या शहरांपुरताच मर्यादित होता. रेडीओ म्हट्लं की फक्त आवाज आणि आवाजाचा बादशहा त्यावेळी एकच होता -किशोरकुमार!

विद्याचरण शुक्लांच्या आदेशानुसार आय.बी. म्हणजे इन्फर्मेशन अँड ब्रॉडकास्टींग खात्याच्या सेक्रेटरींनी किशोरकुमारांना फोन लावला. सरकारची काय इच्छा आहे ते समजावून सांगीतलं. भेटीची वेळ मागितली.

आता किशोरकुमार गायक म्हणून रोमँटिक असले तरी आर्थिक व्यवहारात त्यांची 'खडूस' म्हणूनच प्रसिध्दी होती. पैसे नाही तर काम नाही -आधी उधारी द्या मग बाकीचे काम - असे त्यांचे पक्के फंडे होते. या फंड्याच्या अंमलबजावणीचे त्यांचे शेकडो विक्षिप्त किस्से आहेत. त्यांचे व्यवहार बघणारे बाबूभाई नावाचे गृहस्थ होते. रेकॉर्डिंग सुरु करण्यापूर्वी किशोरकुमार त्यांना 'बाबूभाई, चाय आ गयी क्या?' असे विचारायचे. पैशांसाठी 'चाय' हा कोडवर्ड होता. बाबूभाईंनी 'सर, चाय आ गयी' म्हटलं की काम सुरु व्हायचं.

बॉलीवूडच्या एका तलवार नावाच्या निर्मात्याने आठ हजार बाकी ठेवले होते. किशोरकुमार त्याच्या बंगल्यासमोर जाऊन रोज सकाळी "ए तलवार,दे,दे मेरे आठ हजार" अशी आरडाओरड करायचे.

सांगायची गोष्ट अशी की आपल्या हक्कांबाबत किशोरकुमार फारच आग्रही होते. 'सरकारी कार्यक्रम' म्हणजे एकही दिडकी मिळणार नाही हे ठाऊक असलेल्या किशोरकुमार यांनी सेक्रेटरी साहेबांचा प्रस्ताव चार शब्दांत झटकून टाकला. एन.सी. जैन म्हणजे सेक्रेटरी साहेबांनी हा नकार त्यांच्या बॉसला कळवला. त्यांचे बॉस होते एस. एम. एच बर्नी. त्यांनी विद्याचरण शुक्लांना कळवलं की किशोरकुमार सहकार्य करणार नाहीत. रातोरात किशोरकुमार यांच्या गाण्यावर पूर्ण भारतभर बंदी आली. त्यांच्या रेकॉर्डच्या विक्रीवर बंदी आली. त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी स्टुडिओवर बंदी आली. चित्रपट निर्मात्यांची मदार किशोरकुमार यांच्या गाण्यावर असायची त्यांची मोठीच पंचाईत झाली. चित्रिकरण बंद करण्याची वेळ आली. बॉलीवूडचे अनेक निर्माते हादरून गेले. 'जे किशोरकुमार यांचं झालं तेच तुमचंही होऊ शकतं' असा अप्रत्यक्ष आदेश सगळ्यांना मिळाला.

(एस. एम. एच बर्नी)

जवळजवळ वर्षभर हा 'बॅन' टिकून होता. काही निर्मात्यांनी किशोरकुमार यांची भेट घेऊन समजूत काढली. मग एक सहकार्य करण्याचं पत्र किशोरकुमार यांनी सरकारला दिलं. पण हे पत्र म्हणजे निव्वळ बंदी ऊठवण्यासाठी दिलेली हूल आहे असं समजून "तुम्ही ज्या प्रमाणात सहकार्य कराल त्या प्रमाणात" बंदी उठवली जाईल असा निरोप सरकारतर्फे गेला. हे सगळं घडता घडता आणीबाणी संपुष्टात आली. नंतर आलेल्या जनता सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार शहा कमिशनला दिले. त्या आयोगाला उत्तर देताना विद्याचरण शुक्ल यांनी "तो बंदीचा आदेश माझा होता, कोणत्याही सरकारी अधिकार्‍याची मनमानी नव्हती" असे कबूल केले.

नंतरच्या काळात जनता सरकार गेलं. शहा आयोगाचा अहवाल पण विस्मरणात गेला. सगळे काही संपले, पण किशोरकुमार यांचा आवाज अजरामर झाला.

(विद्याचरण शुक्ल)

अशी या बंदीची कहाणी. आठवत राहतेच, पण आपण त्यांची गाणीच आठवूया!

एरवी पैशासाठी इतके आग्रही असलेल्या किशोराकुमार यांच्या गाण्याने इथे थांबूया!!

 

धन से ना दुनिया से, घर से ना द्वार से
साँसों की डोर बंधी है, प्रीतम के प्यार से
दुनिया छूटे पर ना टूटे, ये ऐसा बंधन है
ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है रंगरूप
थोड़े ग़म हैं, थोड़ी खुशियाँ यही है, छाँव धूप
ये जीवन है......................

सबस्क्राईब करा

* indicates required