computer

बनवायला गेले अंडी फेटणारं मशीन, शोध लागला मिक्सरचा!!

दैनंदिन आयुष्यातील जवळपास सगळ्याच गोष्टींसाठी आपण आज यंत्रांवर अवलंबून आहोत. या गोष्टींमुळे आपलं आयुष्य सुखकर झालं आहे. स्वयंपाक घरातील ओटीजी, मायक्रोवेव्ह, ब्लेंडर इत्यादी गोष्टींचा यात समावेश होतो. पण या गोष्टींना आजचं स्वरूप येण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जावा लागला. यापैकीच एक म्हणजे मिक्सर. मिक्सरचं सुरुवातीचं स्वरूप कसं असेल? किंवा अगदी प्राचीन काळी याच कामांसाठी तत्कालीन लोक काय वापरत असतील? याचा प्रवासही रंजक आहे.

खरंतर मिक्सरचा शोध लागण्यापूर्वी आणि शोध लागल्यानंतरही त्यामध्ये अनेक स्थित्यंतरं आली.

अतिप्राचीन काळी रोमन लोक प्राणी आणि मजुरांच्या स्नायूबळाचा वापर करून धान्य दळत असत. असं म्हटलं जातं की मिलिंग इंडस्ट्रीची मुहूर्तमेढ रोमन लोकांनी रोवली. त्याहीपूर्वी धान्य घरी जात्यामध्ये दळलं जात असे. अगदी आपल्या महाराष्ट्रातसुद्धा मिरची, डाळ इ. गोष्टी वाटण्यासाठी पाटा-वरवंट्याचा उपयोग केला जात असे आणि कालपरवापर्यंत धान्य जात्यावर दळलं जायचं. जात्यावरच्या ओव्या ही आपली परंपरा होती. परदेशात अंडी फेटण्यासाठी एखादं सहजसोपं साधन असावं या गरजेपोटी मिक्सरचा जन्म झाला. त्याआधी अंडी फेटण्यासाठी हाताने चालवायचे एग बीटर्स वापरले जायचे. या एग बीटर्सच्या साह्याने दूध, साखर, आणि अंड्याचा पांढरा भाग एकत्र फेटून केकसाठी झटपट आयसिंग तयार करता येत असे.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सफरचंद, पीच या झाडांच्या डहाळ्या एकत्र बांधून रवीसारखं उपकरण बनवलं गेलं. याचा उद्देश तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित एकजीव व्हावं हा होता. प्रत्यक्षात मात्र बनवणाऱ्याच्या हाताने ते मिश्रण एकसंध केलं जाई. ही पद्धत एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत सुरू होती. त्यानंतर फ्रान्समध्ये वायर व्हिस्कचा (अंडी वगैरे फेटण्यासाठी हाताने वापरायचा बीटर) शोध लागला. यात रंजक गोष्ट म्हणजे रोटेट होणाऱ्या ब्लेडचा वापर असलेल्या मिक्सरचा शोध नेमका कोणी लावला याबाबत आजही अनेक मतमतांतरं आहेत.

अनेकांच्या मते राल्फ कॉलियर याने डिसेंबर १८५६ मध्ये या मिक्सरचा शोध लावला. हा कॉलियर कथिलाची भांडी तयार करायचा. त्याचं हे संशोधन दोन कारणांसाठी क्रांतिकारी ठरलं. त्यातलं पहिलं म्हणजे ते ज्या कारणासाठी बनवण्यात आलं होतं तो हेतू पूर्ण झाला. दुसरं म्हणजे या शोधात वापरलेली गिअर यंत्रणा ड्रिल आणि कार ट्रान्समिशन अशा दैनंदिन वापरातील अनेक बाबींसाठी प्रेरणादायी ठरली.

ब्रिटिश संशोधक ग्रिफिथ याने कॉलियरच्या मॉडेलला आधार मानून स्वतःची आवृत्ती काढली. कॉलीअरचा मिक्सर हाताने धरण्याचा होता. हा मिक्सर म्हणजे गोल फिरणारे भाग असलेला एग बिटर होता. ग्रिफिथच्या मिक्सरमध्ये भांड्याच्या आत मिक्सर बसवला होता. तो साफ करण्यासाठी बाहेर काढता येत होता की नाही याबद्दल अजूनही ठोस माहिती उपलब्ध नाही, पण मिक्सरची ही आवृत्ती अजिबात सोयीची नव्हती असं काही लोकांचं मत आहे. यानंतर दोन वर्षांनी लगेचच १८५९ मध्ये जेएफ आणि ई पी मन्रो या अमेरिकन संशोधकांनी हाताने फिरवता येण्याजोगा मिक्सर बनवला. त्याचे स्वामित्व हक्कही मिळवले. यानंतर १८८४ मध्ये विली जॉन्सन नावाच्या संशोधकानी गिअर्स, कप्पी आणि बीटर्स यांचा वापर करून चालणारं एक उपकरण तयार केलं.

१८८५ नंतर मिक्सरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण झाली. त्याला कारणही तसंच होतं. या काळात इलेक्ट्रिक मोटर असलेल्या मिक्सरची निर्मिती सुरू झाली. सर्वप्रथम रुफस इस्टमन नावाच्या अमेरिकन संशोधकाने विजेवर चालणारे मिक्सर बाजारात आणले. इस्टमनचे स्वामित्व हक्क हे फक्त मिक्सरपुरतेच मर्यादित नव्हते, तर क्रीम-अंडी-दारू यांच्या मिक्सिंग संदर्भातलेही होते.

या इतिहासात अजून एक रंजक वळण आलं ते १९०८ मध्ये.

खरोखर कुठल्या माणसाला कशातून काय सुचेल याचा नेम नाही. हर्बर्ट जॉन्सन या अमेरिकी अभियंत्याने एका बेकरला कणकेचा मोठा गोळा एका मोठ्या धातूच्या चमच्याने एकत्र करताना बघितलं. हे काम इतकं घाम गाळणारं होतं, की त्याने घाम न गाळता मिश्रण व्यवस्थित एकत्र होईल असं "घाम विरहित' उपकरण निर्माण करण्याचं ठरवलं. याच उपकरणाला स्पायरल मिक्सर असंही म्हणतात. त्याचं हे उपकरण 'हटके' होतं. कारण त्याला जोडलेला एक बाऊल गोल दिशेत फिरत होता. त्याच वेळी बीटर मात्र त्याच्या विरुद्ध बाजूने फिरत होतं. १९१५ पर्यंत त्याच्या अवजडपणामुळे आणि अजस्त्र क्षमतेमुळे ते संपूर्ण अमेरिकेत फक्त व्यावसायिक बेकरीजसाठी वापरलं जात असे. त्यानंतर जॉन्सन या उपकरणाच्या घरगुती उपयोगासाठीच्या आवृत्तीच्या मागे लागला. १९१९ मध्ये जॉन्सनने एक नवीन उपकरण निर्माण केलं. त्याचं नाव होतं फूड प्रीपेअर. या उपकरणासाठी मुख्य ग्राहक वर्ग होता घरगुती बेकरी उत्पादनांचे निर्माते. याच्या विक्रीसाठी दुकानदारांनी विरोध दर्शवला. मात्र हार मानेल तर तो जॉन्सन कसला? त्याने घरोघर जाऊन त्याचं प्रात्यक्षिक दाखवून विक्रीला सुरुवात केली. या उपकरणाला सिट्रस ज्यूसर व फुड ग्राइंडर जोडण्याची ही सोय होती.

गेल्या ४० वर्षांत मिक्सरच्या आवृत्त्यांमध्ये अनेक चढ-उतार आले. कालौघात अनेक कंपन्यांनी मिक्सरची निर्मिती करून ते बाजारपेठेत आणले. या कंपन्यांनी काही प्रमाणात बाजारपेठेची स्पर्धाही अनुभवली. या स्पर्धेत सनबीम आणि किचन एड या दोन कंपन्यांच्या नावाचा बोलबाला होता. पण १९७३ मध्ये अनेक गोष्टी बदलल्या. या वर्षी कार्ल सोंथम इयरने स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या फूड प्रोसेसरचं प्रात्यक्षिक पाहून स्वतः हे उपकरण तयार करायचं ठरवलं. त्याने त्याचं उपकरण जेम्स बियर्ड, जुलिया चाइल्ड आणि हेलेन मॅककली अशा दिग्गजांसमोर नेलं. याचवेळी मिक्सर बाजारपेठेत वाढ होऊन अनेक नवीन ब्रँड पुढे आले. काळाच्या कसोटीवर त्यातले काही ब्रँड्स टिकले, काही नाही.

बघितलंत मिक्सरने केवढा मोठा पल्ला गाठला आहे? कदाचित आपल्यापैकी काहीजण अजूनही पाट्यावर वाटलेली चटणी, खलबत्त्याने केलेलं दाण्याचं कूट यांची चव, स्वाद, टेक्श्चर आठवून हुरहुरत असतील. पण म्हणून मिक्सरचं महत्त्व कमी होत नाही, नाही का?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required