computer

नाउरु : घरचं फॉस्फेटचं सोनं उधळून सर्वात श्रीमंताचा आता भिकारी झालेला देश!!

पैसा आणि वेळ या दोन गोष्टी कधीच पुरेशा नसतात असे म्हटले जाते. या दोन्ही गोष्टी एक तर कमी असतात, नाही तर जास्त. कोणत्याही गोष्टीची कमतरता प्रगतीची नांदी असते आणि त्याच गोष्टीचा अतिरेक म्हणजे विनाशाची सुरुवात. बक्कळ प्रमाणात एखादी गोष्ट उपलब्ध असली तर तिच्या वापराचे योग्य पध्दतीने नियोजन करणे गरजेचे असते. योग्य नियोजन नसले तर वरदान असलेल्या गोष्टीचं रुपांतर शापात व्हायला वेळ लागत नाही. अशाच एका अनियोजीत व्यवस्थेचा परिणाम भोगत असलेला देश आहे तो म्हणजे नाउरु.

प्रशांत महासागराच्या मध्यभागात एका बेटावर वसलेला हा देश एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश होता. पण आता २०१७ मध्ये हाच देश जगातल्या सगळ्यात जास्त गरीब देशांच्या यादीत गणला जात आहे. चला तर मग आज आपण याच देशाच्या रंक ते राजा आणि पुन्हा राजापासून रंक होण्याचा प्रवास जाणून घेऊयात.

नाउरु हा देश आकाराने जगातला तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात छोटा देश आहे. सकाळी जॉगिंगला जावे तर देशाला एक फेरफटका मारुन दुपारी जेवण्यास घरी परत येता येइल एवढा छोटा हा देश आहे. देशाची लोकसंख्या आहे अंदाजे ११,५००. भूभागालगत असलेल्या शेवाळामुळे इथे कोणतेही बंदर नाही. या देशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या देशाला अधिकृत असे राजधानीचे शहर नाही.

असा हा अजब वाटणारा देश श्रीमंत अचानक श्रीमंत कसा झाला असेल? या प्रश्नाचे उत्तर आणखीच अजब आहे. ४ दशलक्ष वर्षांपासून या जागेचे एक वेगळेच महत्त्व होते. या जागेला 'पक्ष्यांचे शौचालय' (बर्ड्स बाथरुम) समजले जात असे. सी गल पक्षाची विष्ठा या ठिकाणी जवळ जवळ ४ दशलक्ष वर्षांपासून जमा होत होती. फॉस्फेटचा स्त्रोत असलेली ही विष्ठा म्हणजे अतिशय दुर्लभ असा खजिना होता. परंतु मानवी हस्तक्षेपापासून दूर असणारी ही जागा बरेच वर्ष अंधारातच राहिली.

शेवटी १९०६ मध्ये जर्मनीने ही संधी ओळखली आणि 'पॅसिफिक फॉस्फेट कंपनी' मार्फत हा खजिना लुटायला सुरुवात केली. प्रकाशझोतात आल्यानंतर या जागेचा ताबा मिळवण्यासाठी विविध देशांनी प्रयत्न केला. यातच या देशाचा ताबा १९१९ मध्ये ब्रिटन,ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे गेला. ब्रिटिश फॉस्फेट कंपनीच्या मार्फत या देशांनी फॉस्फेटची मोठ्या प्रमाणात निर्यात केली. शेवटी १९६८ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि या नैसर्गिक संसाधनातून आर्थिक प्रगती साधण्याच्या हेतूने नाउरु फॉस्फेट कमिशनची स्थापना करण्यात आली.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाने फॉस्फेटची अमर्याद निर्यात केली. १९७५ मध्ये देशाचा जीडीपी २.५ बिलियन डॉलर्स एवढा होता. देशाचे दरडोई उत्पन्न जगात दुसरया क्रमांकांवर होते. तेव्हा कुवैत पहिल्या नबरावर होता. या अचानक आलेल्या पैशांतून नाउरुच्या जनतेने बंगले, गाड्या विकत घेतल्या. देशात एक आलिशान हॉटेल बांधण्यात आले. त्यावेळी केवळ ७००० लोकसंख्या असताना देशाने स्वत:चे विमानतळ बांधले. देशाने ७ बोईंग विमानं सुध्दा खरेदी केली. या सगळ्या गोष्टींमुळे नाउरु देशाला 'पॅसिफिकचे कुवैत' समजले जाऊ लागले.

मात्र हळूहळू ८०-९० च्या दशकात देशाचे फॉस्फेटचे साठे कमी होत गेले. लोकांच्या उत्पन्नात घट झाली, परंतु खर्च मात्र तेवढाच राहिला. देशातील जमीन फॉस्फेटच्या शोधात पूर्णपणे खणली गेली. शेती करता येईल अशी जमीन जवळजवळ संपुष्टात आली होती. खाद्यपदार्थांसाठी देश पूर्णत: बाहेरील अन्नावर अवलंबून होता. बाहेरील जंकफूड खाऊन नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला होता.

 

त्याचवेळी देशाच्या आर्थिक सल्लागारांपैकी एक असलेल्या ड्युक मिंक्स यांनी एक नाउरुच्या राष्ट्रपतींना एका संगीतगृहात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. लिओनार्डो दा विंचीच्या आयुष्यावर भाष्य करणारा कार्यक्रम सादर करणारे हे संगीतगृह काही आठवड्यात बंद पडले. यात नाउरु देशाला आजच्या काळात ७ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले.

नागरिकांच्या गरजा पूर्ण करता याव्यात म्हणून नाउरुच्या सरकारने बाकी देशांकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि त्यातूनच सरकारचा नाईलाज वाढत गेला. याचाच फायदा घेउन आर्थिक मदतीच्या बदल्यात ऑस्ट्रेलियाने २००१ मध्ये आपल्या देशात अवैधपणे राहणाऱ्या विदेशी नागरीकांना ठेवण्यासाठी नाउरुमध्ये एक तुरुंगच उभा केला. हा तुरुंग मानवी हक्कांच्या भंगासाठी आजही जगभरात प्रसिद्ध आहे.

एकेकाळी समृद्धीने गजबजलेल्या नाउरु देशाला आता अवकळा लागली आहे. ७०% जमीन पूर्णत: ओसाड आहे. बाहेरचे खाण्याची सवय झालेली जनता डायबेटीज, किडनी आणि हृदयविकारांनी ग्रासलेली आहे. एवढेच नव्हे तर देशातील ९७% पुरुष आणि ९४% महिला गरजेपेक्षा जास्त वजनाच्या आहेत. एवढेच नव्हे, तर नाउरुला जगातील सर्वाधिक लठ्ठ लोकांचा देश म्हणून सुध्दा ओळखले जाते.

नाउरुला जगातील सगळ्यात कमी भेट दिल्या जाणारया देशांमध्ये गणले जाते. या देशाला सरासरी १००० परदेशी पर्यटक दरवर्षी भेट देतात. काहीवर्षी तर हा आकडा २०० एवढा कमी असतो. देशात उत्पादनाच्या साधनांमध्ये मासेमारी, नारळ आणि अननस यांचे थोड्या प्रमाणात उत्पादन यांचा समावेश आहे. आजही देशातील जास्तीत जास्त अन्नधान्य ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमधून आयात केले जाते.

नाउरु म्हणजे जगातील सगळ्या प्रशासनांसाठी एक धडा आहे. जनतेचे कल्याण आणि पैसे कमावणे या दोन्हीतला सुवर्णमध्य साधता येणे किती आवश्यक आहे हे नाउरुच्या उदाहरणावरुन लक्षात येते.

 

लेखक: संकेत चिंचखेडे

सबस्क्राईब करा

* indicates required