computer

शाळेबाहेर जेवणाची वाट पाहणाऱ्या मुलीच्या फोटोने तिचं आयुष्य कसं बदललं पाहा !!

सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे उपयोग केला तर तो किती प्रभावशाली ठरू शकतो, हे वेळोवेळी दिसून आले आहे. बिनकामाचे मेसेजेस फॉरवर्ड करण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक सोशल मीडियावर शेयर केले तर बदल घडतो याचे एक मोठे उदाहरण आज आम्ही तुमच्या पुढे आणणार आहोत. 

हैदराबादच्या एका गरीब मुलीला सोशल मीडियामुळे अशा शाळेत प्रवेश मिळाला आहे, जिथे तिच्या आई वडिलांना प्रवेश घेऊन देणे शक्य झाले नसते.  मध्यंतरी सोशल मीडियावर एक फोटो वायरल झाला. त्या फोटोत एक मुलगी हातात वाडगे घेऊन वर्गातील मुलांचे जेवण संपेल आणि उरलेले आपल्याला मिळेल या आशेने एका वर्गाच्या बाहेर उभी आहे. कुणीतरी हा फोटो घेतला आणि एका स्थानिक पेपर मध्ये तो छापून आला. 'भुकेला चेहरा' असे टायटल देऊन तो फोटो छापण्यात आला होता. हा फोटो गुडीमलकापूर येथील देवल झाम सिंग नावाच्या सरकारी शाळेतील आहे.

त्या मुलीचे नाव दिव्या असे आहे. तिचे आईवडील कचरा गोळा करण्याचे काम करतात. मंडळी आईवडील कामाला गेले की ती शाळेबाहेर उभी राहून थोडं फार खायला मिळेल या आशेने वर्गाबाहेर उभी राहायची. हा तिचा रोजचा दिनक्रम झाला होता. 

दिव्याचा हा फोटो लहान मुलांसाठी काम करणारी NGO एमवी फाऊंडेशनचे वेंकट रेड्डी यांच्या नजरेस आला आणि त्यांनी तो फेसबुकवर शेअर केला.  त्यांनी सिस्टीमवर टीका केली आणि एक लहान मुलगी भुकेजून वर्गाबाहेर उभी राहत असेल तर आपल्याला लाज वाटायला हवी असेही लिहिले. फक्त एवढे करून ते थांबले नाहीत त्यांनी त्या शाळेच्या प्रशासनाशी संपर्क साधला आणि तिला तेथे प्रवेश मिळवून दिला. 

वेंकट रेड्डींनी नंतर दिव्याचा स्कूल युनिफॉर्म घातलेला फोटो शेअर केला. सोबत तिचे आईवडील सुद्धा दिसत आहेत. रेड्डी स्वतः तिच्या घरी गेले आणि त्यांनी दिव्याची आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांची परिस्थिती जगापुढे आणली.

मंडळी, एका रात्रीत बदल घडून येत नाहीत आणि फक्त सोशल मिडियावर पोस्टस लिहून तर नाहीच नाही. पण सामाजिक कार्यासाठी उचललेले लहान पाऊलही  समाजात मोठा बदल घडवून आणू शकते, हे दिव्याच्या उदाहरणाने सिद्ध झाले आहे. वेंकट रेड्डी यांच्यासारखे अजून लोक समाजात तयार झाले तर बदल घडायला वेळ लागणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required