इराकमधलं आंदोलन आणि बजाज रिक्षाचा काय संबंध आहे?

जवळजवळ २ महिन्यांपासून इराकी नागरिक भ्रष्ट्राचार, गरिबी आणि दडपशाही विरुद्ध आंदोलन करत आहेत. तळागाळातल्या सामान्य नागरिकांनी केलेलं इराकच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं आंदोलन आहे असं म्हटलं जातंय. रोजच हजारो नागरिक तहरीर चौकावर जमत आहेत आणि रोजच त्यांच्यावर पोलिसांकडून हल्ला केला जातोय.
या सर्व आंदोलनात भारतातली रिक्षा मुख्य भूमिका बजावत आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का ? नक्कीच खरं वाटणार नाही, पण हे सत्य आहे.
गेल्या ५ वर्षांपासून बजाजच्या रिक्षाने इराकमध्ये चांगलाच जम बसवलाय. तिथे रिक्षाला टुकटुक म्हणतात. टुकटुक ही इराकच्या लोकांसाठी आता गरिबांची टॅक्सी झाली आहे. सध्याच्या आंदोलनात टुकटुकचं नवं रूप दिसून आलंय. तहरीर चौकात तर पंख असलेल्या टुकटुकचं चित्र पण पाहायला मिळतं. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जावर या आंदोलनाला ‘टुकटुक मुव्हमेंट’ नाव मिळालंय.
हे कसं घडलं ?
आकाराने लहान आणि शहरात कुठेही सहज नेता येणाऱ्या रिक्षा उर्फ टुकटुकचा वापर जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आणि परतताना आंदोलकांसाठी अन्न, पाणी, औषधं, मुखवटे, हेल्मेट, अश्रुधुरांपासून वाचण्यासाठी गॉगल्स, तसेच काँक्रीटचे ठोकळे आणण्यासाठी केला जातो. हे कॉंक्रिटचे ठोकळे वापरून बॅरिकेड्स तयार केले जातात.
टुकटुक चालवणारे चालक ही सेवा मोफत देत आहे. याची शिक्षाही त्यांना भोगावी लागत आहे. हे चालक सुद्धा पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. यात अनेकांचा जीव गेला आहे, काहींच्या रिक्षांच अतोनात नुकसान झालंय. तरीही रिक्षाचालक आंदोलनापासून हटलेले नाहीत.आंदोलनातले हे काही फोटो पाहा.
आंदोलनाला सुरुवात झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच इराकमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. या कारणाने नागरिकांना पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने आंदोलन वाढवावं लागत आहे. त्यांनी ८ पानांचं मुखपत्र सुरु केलंय. या वृत्तपत्रासाठी ६ जणांची टीम काम करते. सध्या वाचक संख्या ३००० एवढी आहे. या मुखपत्राचं नाव काय असेल असं तुम्हाला वाटतं ? या मुखपत्राला टुकटुक नाव देण्यात आलंय.
मंडळी, बजाजची रिक्षा आणि ती चालवणारे चालक हे दोन्ही आज इराकच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आंदोलनाचे हिरो ठरत आहेत. हे आंदोलन यशस्वी झालं तर इतिहासात याची नक्कीच नोंद होईल. भारतासाठी ही महत्त्वाची बाब असेल.