computer

अ‍ॅपलची भागीदारी ८०० डॉलरमध्ये विकून ७०० कोटी डॉलर्स गमावणारा रोनाल्ड वेन !!

" काय सांगू राव, कोल्हापुरात आमच्या आज्ज्यानी धा एकर जागा घेटलेली, पण आमच्या पावण्याच्या हट्टापायी फक्त लाखभर रुपयात विकली बघा.  नाहीतर आज आम्ही त्या धा एकरावर लोकसभेची शिट घेऊन बसलो असतो'.  अशा प्रकारची हळहळ तुमच्या कानावर हज्जारवेळा पडली असेल नाही का ?

चुकलेली संधी, हुकलेली श्रीमंती हा नेहेमीच हळहळ करण्याचा विषय असतो. केलेली गुंतवणूक अवेळी विकून टाकण्यासारखा मूर्खपणा बरेचजण करत असतात. म्हणूनच इंग्रजीत थॉमस टसर नावाच्या एका शहाण्याने असं म्हटलंय की  A fool and his money soon part the company म्हणजेच "मूर्ख माणूस आणि त्याचा पैसा यांची फार लवकर ताटातूट होते".

आधी जाते अक्कल, मग जाते भांडवल हे सिध्द करणारा एक अफलातून किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

तर मंडळी, अ‍ॅपल कंपनीबद्दल माहिती नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. जगातली आघाडीची कंपनी असलेल्या अ‍ॅपलने शून्यातून एवढे मोठे साम्राज्य निर्माण केले आहे राव!! आज जगातल्या सर्वाधिक श्रीमंत कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅपलच्या आजवरच्या प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. स्टीव्ह जॉब्स यांनी किती कठीण परिस्थितीत कंपनी सुरू केली आणि नंतर त्यांनाच ती कंपनी सोडावी लागली. कंपनीचा टिकाव लागणे कठीण झाल्यावर पुन्हा स्टीव्ह जॉब्ज यांना मानाने कंपनी परत आणले गेले. या गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो. अ‍ॅपलचे दोन संस्थापक होते असे तुम्हाला माहिती असेल. पण मंडळी, खरं तर अ‍ॅपलचे तीन संस्थापक होते. या तिसऱ्या संस्थापकाने सुरुवातीलाच कंपनी सोडून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला राव!! तुम्ही म्हणाल कसे? तर वाचा हा किस्सा!

(मध्यभागी अ‍ॅपलचे तिसरे रेनॉल्ड वेन)

आजच्या घडीला अ‍ॅपलची उलाढाल आहे 1 ट्रिलीयन डॉलर!! आपल्या रुपयांमध्ये मोजले तर  तब्बल 65 लाख कोटी रुपये!!

एक एप्रिल १९७६ साली जेव्हा अ‍ॅपलची स्थापना झाली तेव्हा स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉझनिअ‍ॅक यांच्याकडे प्रत्येकी ४५ टक्के शेअर्स होते आणि उरलेले १० टक्के शेअर्स रोनाल्ड वेन याच्याकडे होते. इतर दोन भागीदारांसारखा रेनॉल्ड वेन पण इंजिनियरच होता. अ‍ॅपलचा बिझनेस प्लॅॅन बनवणे, अ‍ॅपलची सर्व व्यवस्थापकीय जबाबदारी हाताळणे हे काम त्याचे होते. याखेरीज दोन भागीदारात मतभेद झाले तर निर्णायक मत म्हणूनही रोनाल्ड वेनने काम करायचे होते. कंपनीचा सुरुवतीचा लोगोसुद्धा रोनाल्डनेच तयार केला होता. नंतर तो लोगो बदलून आता असलेल्या लोगोची निवड करण्यात आली.

(रोनाल्ड वेनने तयार केलेला अ‍ॅपलचा लोगो)

 

(अ‍ॅपल मधले हक्क विकण्याचा करार)

पण माणसाची बुध्दी कधी फिरेल हे सांगता येत नाही. कंपनीची स्थापना झाल्याच्या १२ व्या दिवशी रोनाल्ड वेनने भागीदारीतून अंग काढून घेतले. १० टक्के शेअर्स फक्त ८०० डॉलरमध्ये विकून मोकळा झाला. वर्षभराने स्टीव्ह जॉब्सने काही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी रोनाल्ड वेनला आणखी १५०० डॉलर्स दिले. अशा एकूण २३०० डॉलर्सच्या व्यवहारात अ‍ॅपलचे १० टक्के शेअर्स विकून रोनाल्ड वेन मो़कळा झाला. मंडळी, त्याकाळी फक्त २३०० डॉलर्स मध्ये रोनाल्ड वेनने त्याचे शेअर्स विकले नसते तर आज तो ७०० कोटी डॉलरचा मालक असता. जगातल्या सर्वात श्रीमंत  व्यक्तींपैकी एक असता. पण ही श्रीमंती त्याच्या नशिबातच नव्हती असेच म्हणावे लागेल. कारण अ‍ॅपलच्या काँट्रॅक्टची प्रत पण त्यानी ५०० डॉलरमध्ये विकून टाकली आणि गंमत म्हणजे तीच प्रत २०११ साली १६ लाख डॉलर्समध्ये विकली गेली.

पण या लेखाच्या सुरुवातीला जे म्हटले आहे तेच खरे - आधी जाते अक्क्ल मग जाते भांडवल !!!

सबस्क्राईब करा

* indicates required