भाग २ - घरातले जुने कागदी शेअर्स शोधा आणि चार पैसे गाठीला लावा !!

शेअर्स डीमॅट न करण्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकी वारंवार ऐकू येणारी कारणं आपण आधी बघू या. 

स्रोत

असे शेअर आमच्याकडे आहेत हेच माहिती नव्हते - ही तक्रार घरातील एखादा वृध्द गृहस्थ गेल्यानंतर ऐकू येते. अशा मृत्युनंतर जेव्हा सामानाची विल्हेवाट लावली जाते, तेव्हा त्यांच्या पेटीत जुने शेअर सर्टिफिकेट सापडते. काहीवेळा सर्टिफिकेट नसते, पण जुने खात्यात न जमा केलेले  डीव्हीडंडचे चेक सापडतात. बर्‍याच वेळ जाऊ देत, दोनच शेअर आहेत म्हणून ते फेकलेही जातात. पण कल्पना करा, ते दोन शेअर जर एमआरएफसारख्या कंपनीचे असतील, तर फेकल्या जाणार्‍या शेअरची किंमत आजच्या बाजार भावाने रुपये १,८०,००० आहे. हे एक उदाहरण झालं, पण सांगायचा मुद्दा असा की  एक-दोनच शेअर्स आहेत म्हणून सर्टिफिकेट फेकू नका.

आमच्या घरात कोणाला शेअर बाजारात इंटरेस्ट नाही - कंपनीच्या जुन्या कामगारांकडे किंवा त्यांच्या घरी ही तक्रार ऐकायला मिळते. पूर्वी कंपनीचा पब्लिक इश्यू यायचा, तेव्हा कर्मचार्‍यांना खास कोट्यातून  शेअर्स दिले जायचे. इतकंच नाही, तर ते घेण्यासाठी कामगार पतपेढीतून कर्ज पण दिलं जायचं. त्यानंतर कंपनी काही कारणानं सोडल्यावर किंवा कंपनीचा प्लँट बंद झाल्यावर कामगार घरी बसायचे. आर्थिक साक्षरेतेच्या अभावानं घरात या शेअर्सकडे कुणाचं लक्ष जायचं नाही. परिणामी बर्‍याच घरात सर्टिफिकेट पडून राहतात.

स्रोत

आयला !! या  कंपनीचं नाव बदललं हे कळलंच नाय ! - बरीच सर्टीफीकेट कचर्‍यात जातात ती या कारणामुळं किंवा केवळ दुर्लक्ष केल्यामुळं!! एक झक्क उदाहरण बघा. धारुहेरा केमिकल्स नावाची एक कंपनी होती. त्यावेळी या शेअरचा भाव फारसा नव्हता. मध्यंतरीच्या काळात कंपनीचा फायदा वाढला. भावही वाढला. मॅनेजमेंट बदलली, पण सोबत कंपनीचं नावही बदललं. नविन नाव झालं- ओरिएंटल कार्बन ब्लॅक लिमिटेड. आजचा बाजारभाव रुपये ११७० आहे. ज्यांनी शेअर सर्टीफीकेट बदलून घेतली नाहीत, त्यांना जुनं नाव दिसलं नाही आणि घराच्या साफसफाईत कागद गेले कचर्‍यात !!!

स्रोत

मुंबईत असताना कळायचं, आता गावाला काय कळत नाही - मुंबईसारख्या शहरात हे कारण ऐकायला मिळतं. गेल्या २० वर्षात मुंबई बदलली. मुंबईतले कारखाने बाहेर गेले, बर्‍याच चाळी जमीनदोस्त करून नवे हाउसिंग काँप्लेक्स आले, चाळीतल्या रुम विकून एक पिढी गावाला गेली.  या गडबडीत पत्ता बदल्ण्याचे राहून गेले. डिव्हीडंड वॉरन्ट आली आणि वाया गेली अशी परिस्थिती बर्‍याच घरात आहे. 

आता फार उशिर करू नका, कामाला लागा. घरातले जुने कागदपत्रं पेटीत, माळ्यावर जिथे असतील तिथून बाहेर काढा.  शेअर सर्टिफिकेट, डीव्हीडंड वॉरंट सारखे दिसणारे कागद, कंपनी अ‍ॅन्युअल रिपोर्ट, बाहेर काढा. कंपनीचं नाव टिपून घ्या. रजिस्टर्ड शेअर ट्रान्सफर एजंटकडं जा आणि डीमॅट करून घ्या. ब्रोकरचा सल्ला घ्या आणि  शेअर्स विकून टाका किंवा खात्यात जमा ठेवा. हे नाहीच जमलं तर "बोभाटा"ला मेसेज करा आणि मदत मिळवा. 

पण लक्षात ठेवा, जे काही करायचं ते ५ डिसेंबरच्या आधी करा !!!

सबस्क्राईब करा

* indicates required