computer

बाथरूम-चेंजिंग रूममध्ये लपवलेला कॅमेरा असा शोधा !!

नुकतंच पुण्याच्या एका हॉटेलमध्ये स्त्रियांच्या शौचालयात कॅमेरा आढळून आला होता. तंत्रज्ञानातील  प्रगतीमुळे असे प्रकार आता ओळखणे कठीण होऊन बसले आहे. आकाराने लहान आणि त्यापेक्षा लहान चीप सिस्टम असल्याने कॅमेरा सहज लपवता येतो आणि हे सहज ओळखता येत नाही. Oyo आणि Airbnb सारख्या नावाजलेल्या हॉटेल्समध्ये पण असे लपवलेले कॅमेरे आढळून आले आहेत.

...पण हे कॅमेरे कितीही अत्याधुनिक असले तरी  एका सोप्प्या मार्गाने ते सहज ओळखता येऊ शकतात. त्यासाठी काय करायचं हे आज जाणून घेऊया.

१.हॉटेल रूममधल्या सर्व लाईट बंद करा. टीव्ही किंवा इतर लहानसहान उपकरणं ज्यातून प्रकाश येईल अशा सर्व गोष्टी बंद करा. पूर्ण अंधार होईल याची खात्री करून घ्या.

२. यानंतर मोबाईल कॅमेरा सुरु करा. फ्लॅश लाईट बंद असेल याची काळजी घ्या.  ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की कॅमेरा लपवलेला असू शकतो त्या ठिकाणी मोबाईल कॅमेऱ्यातून पहा.

३. पांढऱ्या रंगातील लहान  ठिपके दिसतायत का हे नीट निरखून पहा. हे ठिपके तुम्हाला डोळ्यांनी दिसणार नाहीत पण कॅमेऱ्यात ते टिपले जातील. हे ठिपके म्हणजेच कॅमरा असण्याची शक्यता असू शकते.

या पद्धतीने कॅमरा कसा ओळखता येतो ?

या प्रकारातील कॅमेरामध्ये इन्फ्रारेड (आयआर) ब्लास्टर असतो. या तंत्रज्ञानामुळे कॅमेऱ्याला अंधारातही रेकॉर्डिंग करता येतं. असे कॅमेरे अंधारात दिसत नाहीत कारण इन्फ्रारेड लाईट माणसाला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. पण हेच काम आपला मोबाईल कॅमेरा सहज करतो. मोबाईल कॅमेऱ्यात इन्फ्रारेड लाईट दिसते त्यामुळे अंधारात पण लपवलेले कॅमेरे ओळखता येतात.

समजा असे कॅमेरे आढळले तर आधी त्यांचा व्हिडीओ किंवा फोटो घ्यायला विसरू नका.  तुमच्याकडे पुरावा तयार झाल्यानंतर हॉटेलकडे तक्रार करा. पुण्यातल्या घटनेत ज्यावेळी महिलेने हॉटेलकडे तक्रार केली तेव्हा त्याच्या १० मिनिटांनी हॉटेलने पोलिसांना न कळवता तिथून कॅमेरा काढून टाकला होता आणि त्या महिलेची दखल सुद्धा घेतली नव्हती, पण सुदैवाने महिलेने आधीच कॅमेराचा फोटो घेतला होता.

तर महिला वाचकांनो, असे प्रकार घडू नयेत म्हणून ही काळजी नक्की घ्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required