computer

भांडी जास्त काळ टिकवण्यासाठी आणि लखलखीतही ठेवण्यासाठी अशी काळजी घ्या

स्वयंपाकघराची खरी शोभा वाढते ती स्वच्छ, चकचकीत आणि नीटनेटक्या मांडलेल्या भांड्यांनी. पुलंनी एका लेखात म्हटल्याप्रमाणे खाण्याचा जसा आसनाशी संबंध असतो तसाच बासनाशी. कल्पना करा- पांढराशुभ्र मऊसूत भात, त्यावर छान पिवळंधमक वरण, त्यावर साजूक तुपाची धार, कडेला सुबकशी लिंबाची फोड असं पंचेंद्रियांना सुखावणारं अन्न आहे. पण ते वाढलंय ते ताट कळकट, अस्वच्छ, डाग पडलेलं किंवा कुठेकुठे पोचे आलेलं असं आहे. जेवणाची मजा वाढेल की कमी होईल? कित्येक घरात स्वयंपाक तर चविष्ट केला जातो, मात्र भांड्यांची काळजी, स्वच्छता तितक्या निगुतीने केली जात नाही. यामुळे भांड्यांचं आयुष्य तर कमी होतंच, पण कित्येकदा घरातल्या लोकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी भांड्यांची निगा कशी राखावी हे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे.

१. भांडी धुण्यासाठी (विशेषतः तेलकट, ओशट, तुपाची भांडी) गरम पाणी वापरल्यास भांडी लवकर स्वच्छ होतात. गरम पाण्याचं तापमान जास्त असल्याने भांड्याला चिकटलेल्या तेलकट पदार्थाचा थर पातळ होऊन पाण्याबरोबर वाहून जातो. याला पाण्याचा सरफेस टेन्शन हा गुणधर्म कारणीभूत आहे. यामुळे पाण्याचे रेणू एकमेकांशी एक प्रकारे बांधलेले राहतात. जसं पाण्याचं तपमान वाढतं तसं सरफेस टेन्शन कमी होतं. त्यामुळे पाण्याचे रेणू भांड्याला चिकटलेल्या पदार्थाच्या रेणूंमध्ये लवकर शिरतात आणि त्यांना एकमेकांपासून सुटं करतात.

२. स्टीलच्या भांड्यावर कधीकधी धुतल्यानंतरही पांढरे डाग दिसतात. हे डाग पाण्यांमध्ये असलेल्या क्षारांमुळे पडतात. हे टाळण्यासाठी भांडी धुतल्यावर हवेवर न वाळवता स्वच्छ फडक्याने पुसून कोरडी करावीत.

३. कपबश्या, गाळणी यांच्यावर कधीकधी डाग दिसतात. ते मुख्यतः चहाकॉफीतील आम्लामुळे पडतात. ते काढण्यासाठी बेकिंग सोड्यासारखे पदार्थ वापरावेत. बेकिंग सोडा अल्कधर्मी असल्याने त्याची या आम्लावर विक्रिया होऊन डाग नाहीसे होतात.

४. नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी नायलॉनची घासणी वापरावी. त्यात पदार्थ शिजवताना चमचेही लाकडीच वापरावेत. मेटल स्क्रबर्स, स्टीलचे चमचे, उलथणी यामुळे भांड्यांचं कोटिंग खराब होऊन अन्नात मिसळू शकतं. यामुळे भांडी तर खराब होतातच, शिवाय हे आरोग्यासाठी घातक ठरतं.

५. कुकर आतून स्वच्छ होण्यासाठी अनेकजण तळाशी एखादी लिंबाची फोड किंवा चिंचेचं बुटूक ठेवतात. कुकरमध्ये पाणी उकळलं गेल्याने पाण्याचे क्षार कुकरच्या आतल्या बाजूला साचतात. हे क्षार लिंबू, चिंच यात असलेल्या आम्लात विरघळतात आणि क्षार नष्ट झाल्याने कुकर स्वच्छ होतो.

६. स्टीलच्या पातेल्यात पदार्थ शिजवताना त्यावर जड आणि पातेल्याच्या मापाचं झाकण ठेवावं. यामुळे वाफ आतच राहते आणि पदार्थ लवकर शिजतो. पातेल्यावर आकाराने मोठं, हलकं झाकण ठेवल्यास त्याचा आकार बदलतो आणि पातेलं व झाकण यांच्यात सूक्ष्म फट तयार होऊन वाफेला बाहेर निघून जायला अवकाश मिळतो. स्टीलमध्ये उष्णता सर्वत्र सारख्या प्रमाणात पसरत नाही. त्यामुळे झाकणाचा आकार एकसमान न राहता थोडासा बदलतो.

७. कोणती भांडी घासण्यासाठी काय वापरायचं याचंपण एक गणित आहे. यासाठी घरात तीन प्रकारच्या घासण्या असाव्यात. नायलॉनची मऊ घासणी, स्कॉच ब्राईटची बेताची खरखरीत घासणी, आणि खरखरीत मेटल स्क्रबर्स. काचेची भांडी, इनॅमल वेअर, सिरॅमिक, काचेची भांडी, नॉनस्टिक भांडी यांच्यासाठी नायलॉनची मऊ घासणी आणि डायल्यूट लिक्विड सोप हे कॉम्बिनेशन सगळ्यात उत्तम. रोजच्या वापरातली स्टीलची ताटं, वाट्या, पातेली चमचे यासाठी स्कॉच ब्राईट आणि लोखंडी तवे व कढया यांच्यासाठी मेटल स्क्रबर्स वापरावेत.

या काही साध्या सोप्या गोष्टी आणि त्यामागचं विज्ञान लक्षात घेतलं तर प्रत्येकीला स्वयंपाकघराचं व्यवस्थापन करणं, भांडी स्वच्छ राखणं आणि जास्तकाळ टिकवणं आणि कुटुंबीयांचं आरोग्य चांगलं ठेवणं सहज शक्य होईल.

सबस्क्राईब करा

* indicates required