computer

जाणून घ्या युक्रेनला जगाची 'बेबी फॅक्टरी' म्हणून कसे ओळखले जाऊ लागले!! या उद्योगाची काळी बाजूही पाहा..

या जगात अपत्य प्राप्ती सारखा दुसरा आनंद नाही. परंतु अनेक दांपत्यांना हा आनंदही सहजासहजी मिळत नाही. वैद्यकीय क्षेत्रात यावर आयव्हीएफ आणि सरोगेसीसारखे उपाय निघाले असले तरी हा पर्यायही वाटतो तितका साधा सोपा अजिबात नाही. भारत, नेपाळ आणि थायलंड यांसारख्या देशांनी तर सरोगसीवर कायदेशीररित्या बंदीच आणली आहे. असे असले तरी अनेक देशात सरोगेसीने मोठ्या बाजारपेठेचे स्वरूप घेतले आहे. या यादीत युक्रेनचे नाव अगदी वरचे आहे. सरोगेसीच्या माध्यमातून अपत्य हवे असणाऱ्या दांपत्यासाठी युक्रेन हे ऑनलाईन बेबी स्टोअर बनले आहे. म्हणूनच युक्रेनला आजकाल ‘बेबी फॅक्टरी’ म्हणून ओळखले जात आहे. यामागची नेमकी कारणे काय आहेत जाणून घेऊया या लेखातून.

युक्रेनमधील बसेसमध्ये, रेल्वेमध्ये, प्लॅटफॉर्मवर सरोगसीसाठी पात्र स्त्रिया हव्या असल्याच्या जाहिराती तुम्हाला सर्रास पाहायला मिळतील.

तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहात? तुमचे वय १८ ते ३५ दरम्यान आहे? तुम्हाला सदृढ मुले आहेत? मग आम्हांला तुमच्या सारख्याच महिलांची गरज आहे. अशा आशयाच्या जाहिराती अक्षरश: जागोजागी पाहायला मिळतील. युक्रेनमध्ये सरोगसीसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी एका सरोगेसी मागे महिलेला ११,०००$ इतकी रक्कम मोजते. शिवाय गर्भावस्थेच्या काळात त्यांना महिन्याचे २५०$ स्टायपेंड मिळतो. सरळ साधी नोकरी करणाऱ्या सामान्य माणसाच्या पगाराशी तुलना केल्यास ही रक्कम जवळपास तिपटीने जास्त भरते.

सरोगेसीमुळे एखाद्या दांपत्याला अपत्य प्राप्तीचा आनंद मिळू शकतो ही जरी याची एक लखलखती बाजू असली तरी, याची दुसरी बाजू कितीतरी अंधकारमय आहे. सरोगेसी करून देण्याचे काम करणाऱ्या कंपन्या ज्या ते दांपत्य आणि सेरोगेसी मदर यांच्यामधील दुव्याचे काम करतात, अनेकदा दोन्ही बाजूची फसवणूक करत असल्याचे दिसतात.

सेरोगेसीसाठी त्या महिलेला जितकी रक्कम देण्याचे कबूल केले होते त्यापेक्षा कमीच रक्कम प्रत्यक्षात त्यांना मिळते. याउलट सेरोगेसी करवून घेणाऱ्या दांपत्याकडून मात्र भारीभक्कम रक्कम वसूल केली जाते.

सरोगेसी मदर्सची राहण्याची-खाण्याची सोय करण्याची जबाबदारीही या कंपन्याच घेतात. चांगली सोय करून देण्याची जाहिरात केली असली तरी प्रत्यक्षातील स्थिती मात्र काहीशी वेगळीच असते. पत्र्याच्या एखाद्या शेडमध्ये या गर्भवती स्त्रियांची सोय केली जाते. जिथे या महिलांना झोपण्यासाठी स्वतंत्र कॉट देखील मिळत नाही. कधीकधी एकाच कॉटवर दोघींना ॲडजस्ट करावे लागते तर, काही जणींना कॉटदेखील मिळत नाही. प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर तर यांना अगदी गैरसोयीच्या ठिकाणी दिवस काढावे लागतात.

अनेक दांपत्यांचा असाही अनुभव आहे की त्यांनी सरोगेट अपत्य आणि त्यांच्यात कुठलेच जनुकीय साम्य नसल्याचे आढळून आले आहे. अक्षरश: एका हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी शेकडोंनी सरोगेट मुले जन्माला येतात. काही जणांचे स्वतःचे अपत्य असण्याचे स्वप्न पूर्ण होते, तर काहींची मात्र घोर निराशा होते.
शिवाय, सरोगेसी मदर म्हणून काम करणाऱ्या महिलांचे यात जी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण होते ते वेगळेच.

२०१५मध्ये भारत, नेपाळ आणि थायलंड सारख्या देशांनी सरोगेसीवर पूर्णतः बंदी घातल्यानंतर तर युक्रेनमध्ये याला प्रचंड मागणी सुरू झाली. सरोगेसी तंत्राने या ठिकाणी मोठ्या बाजारपेठेचे स्वरूप घेतल्याने यात गुंतलेल्या महिलांचे शोषण हाही इथला एक कळीचा मुद्दा बनला आहे. दरवर्षी युक्रेनमध्ये नेमकी किती मुले सरोगेसीद्वारे जन्माला येतात किंवा किती महिला या क्षेत्रात सरोगेसी मदर म्हणून काम करतात, याची निश्चित आकडेवारी इथल्या आरोग्य मंत्रालयालासुद्धा देता येणार नाही. एकाच महिलेला इथे चार-चार वेळा सरोगेसी करण्याची संधी दिली जाते. या महिलांच्या मते हे काम करण्यासाठी त्यांच्यावर कुणी जबरदस्ती करत नाही त्यामुळे इथे त्यांचे शोषण होत नाही. कारण त्या स्वतःच्या इच्छेने हे काम करत आहेत.

२६ वर्षाच्या ओल्गाने आतापर्यंत दोनवेळा सरोगेसी केली आहे. तिच्या मते अपत्य प्राप्तीसाठी आसुसलेल्या पालकांना ती त्यांचा आनंद मिळवून देण्यात मदत करते. त्यामुळे यात तिला काहीच वाईट वाटत नाही. शिवाय एखाद्या ठिकाणी नोकरी करून तिला महिन्याचे केवळ १३५$ मिळाले असते. पण एका सरोगेसीमाधून तिने १५,०००$ मिळवले आहेत. या पैशातून ती स्वतःचा कॅफे सुरू करण्याचा विचार करत आहे. सेरोगेसीमुळे तिचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी तिला आशा आहे. युक्रेनच्या कीव शहरातील वकील सर्जी अंटोनोव यांच्या मते युक्रेनमध्ये दरवर्षी सुमारे २००० ते ३००० मुले ही सरोगेसीद्वारे जन्माला येतात. प्रत्यक्षात हा आकडा याहीपेक्षा मोठा असू शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे.

युक्रेनमध्ये सरोगेसीद्वारे अपत्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारी अनेक दांपत्ये हे बहुधा चीनमधील आहेत. युक्रेनमध्ये या व्यवसायाने इतके मोठे जाळे पसरले आहे की या उद्योगामुळे देशातील तरुण महिलांचे शोषण करण्याचा एक प्रकारे परवानाच मिळाला आहे.

युक्रेनचे बालहक्क समितीचे आयुक्त मायकोला कुलेबा यांनी तर युक्रेनमधील या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कारण सरोगेसीच्या आडून इथे अनधिकृतपणे मुले दत्तक दिली जात आहेत. शिवाय महिलांचे अतिरिक्त शारीरिक आणि मानसिक शोषण हाही चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर देशात लवकरच या उद्योगावर बंदी लादली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

युक्रेनमधील या उद्योगाचे खरे स्वरूप कोरोनाकाळात जगासमोर उघड झाले. कारण या काळात आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी आल्याने अनेक परदेशी पालकांना आपल्या अपत्यांपार्यात पोहोचणे देखील महामुश्किल होऊन बसले होते. तेव्हा इथल्या एका स्थानिक सरोगेसी कंपनीने एक व्हिडीओ इंटरनेटवर पोस्ट केला होता ज्यामध्ये एका रूमध्ये पाळण्यात निजलेली मुलेच मुले दाखवण्यात आली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युक्रेन मधील या उद्योगाचे खरे स्वरूप जगासमोर उघड झाले. युरोपातील अत्यंत गरीब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशात सरोगेसीसाठी फक्त ४२,०००$ इतका खर्च येतो. अमेरिकेसारख्या देशात याच्या दुप्पट खर्च येतोच, शिवाय कायद्याच्या जाचक अटींची पूर्तता करणे त्याहून कठीण.

ही छोटी छोटी निरागस अर्भके म्हणजे जणू त्यांच्यासाठी एखाद्या ऑनलाईन स्टोअरवर विकण्यासाठीची वस्तूच आहे. महामारीच्या काळात या धंद्याचे हे काळे रूप जगासमोर येण्यास मदत झाली.

सरोगेसी हे विनापत्य दांपत्यासाठी एक आशेचा किरण असला तरी यात सरोगेसी मदर होणाऱ्यांसाठी मात्र हा एक शोषणाचा क्रूर खेळ आहे, हे नक्की.

मेघश्री श्रेष्ठी

 

सबस्क्राईब करा

* indicates required