computer

स्पेलिंग मिस्टेकवरून पोलिसांनी खुन्याचा शोध कसा घेतला याची गोष्ट!!

काही काही लोकांचं इंग्लिश जाम भन्नाट असतं. यामुळे त्यांचं अनेकदा हसं होतं. काहींचं स्पेलिंग म्हणजे नवी भाषा निर्माण होईल की काय इतकं भन्नाट असतं. पण या स्पेलिंग मिस्टेकमुळे कोणाला तुरुंगाची हवा मात्र खावी लागली नसेल.

आज आम्ही ज्या घटनेबद्दल सांगणार आहोत त्या घटनेत एका माणसाला चुकीच्या स्पेलिंगची चूक चांगलीच भोवली आहे. एवढी की त्याला चक्क तुरुंगात जावे लागले आहे. 

गोष्ट यूपीची आहे. राम प्रताप सिंग नावाच्या इसमाने काही दिवसांपूर्वी एका ८ वर्षाच्या लहान मुलीला तिच्या आजीच्या घरून किडनॅप केले होते आणि तिची हत्या केली होती. 

हत्या केल्यानंतर त्याने एका चोरलेल्या फोनवरून मुलीच्या वडिलांना एक मेसेज पाठवला, त्यात त्याने मुलीला सोडण्याच्या बदल्यात २ लाख रुपयांची मागणी केली होती. राम प्रतापने त्या मेसेजमध्ये लिहिले होते, 'दो लाख रुपये सितापूर लेकर पहूंचे, पुलीस को नही बताये नही तो हत्या कर देंगे.' आणि हे देवनागरीत न लिहिता महाशयांनी इंग्रजीत लिहिलं होतं.

मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली, त्यानुसार पोलिसांनी मोबाईल मालकाला उचलले, पण त्याने मोबाईल चोरी झाल्याचे सांगितले. मग पोलिसांनी मुलगी कीडनॅप झाली त्या दिवशी सीसीटीव्हीत आलेल्या लोकांना उचलले.

यापैकी गुन्हेगार कोण हे ओळखण्यासाठी पोलिसांनी एक भन्नाट शक्कल लढवली. त्यांनी सगळ्यांना 'मै पुलीस मे भर्ती होना चाहता हु, मै भरदोइ से सितापूर दौड़ सकता हु.' असे लिहायला सांगितले. राम प्रताप इथेच अडकला. 

त्याने लिहिलेलं police चं स्पेलिंग ही दोन्ही ठिकाणी pulish अशी होती, तर sitapur चं स्पेलिंग दोन्ही ठिकाणी seeta-pur असं होतं. पोलिसांनी खाकीचा दम दाखवल्याबरोबर राम प्रतापने गुन्हा कबूल केला. 

ही पोलिसांची अफलातून डोक्यालिटी खरी!! गुन्हेगार कशामुळे आणि कसा गोत्यात येऊ शकतो हे सांगता येत नाही आणि गुन्हाही नेहमीच लपवला जाऊ सहजता नाही हेच या घटनेतून दिसून येतं.

 

(सर्व फोटो प्रातिनिधिक)

सबस्क्राईब करा

* indicates required