computer

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे काय? नव्या वाहनासाठी तर ठीक, पण जुन्या वाहनासाठी ती कशी मिळवावी?

काही महिन्यांपूर्वी सरकारकडून वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट असणे गरजेचे आहे असे निर्देश दिले होते. मात्र अजूनही हा नेमका काय प्रकार आहे आणि यासाठी काय आणि कसे करावे याबद्दल लोकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. या लेखाच्या माध्यमातून एचएसआरपी नंबर प्लेटबद्दल माहीती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

आजकाल तुम्ही नव्या वाहनांवर जरा वेगळ्याच नंबरप्लेट्स पाहिल्या असतील. मागची नंबरप्लेट तर आडवी आणि पूर्ण असेल, पण समोरच्या नंबरप्लेटची सिरीज वेगळ्या प्रकारे लिहिलेली तुम्हांला आढळेल. म्हणजे MH23 BQ 1234 असा वाहन क्रमांक असेल तर पहिल्या ओळीत MH23 B आणि पुढच्या ओळीत Q 1234 लिहिलेले दिसेल. असे का? हा प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे की ही एचएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे.

एचएसआरपी वाहन सुरक्षा आणि सुविधा यांचा विचार करून बनविण्यात आली आहे. या प्लेटवर एक होलोग्राम स्टिकर लावण्यात येते आणि त्यात वाहनाचा इंजिन आणि चेसिस नंबर असतो. हा नंबर प्रेशर मशीनने लिहिला जातो. या नंबर प्लेटवर वाहनाचा ७ अंकी युनिक डिजिटल कोड असतो. या कोडच्या माध्यमातून वाहनाची संपूर्ण माहिती काढता येऊ शकते. अशा रितीने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे डाटा डिजिटलायझेशन करण्याच्या दृष्टीने पडलेले हे पाऊल आहे.

एप्रिल २०१९ नंतर ज्यांनी वाहन घेतले असेल त्यांना डीलरकडूनच ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असते. पण ज्यांनी एप्रिल २०१९ आधी गाडी घेतली आहे, त्यांना हा बदल स्वतःहून करावा लागणार आहे. इंधनप्रकारानुसार गाड्यांचे नंबर प्लेट वेगवेगळ्या रंगाचे असतील हेही स्पष्ट झाले आहे.

हलक्या निळ्या रंगाचा स्टिकर हा पेट्रोल आणि सीएनजी वाहनांसाठी ठरवण्यात आला आहे. तर डिझेलपासून चालणाऱ्या गाड्यांसाठी नारंगी रंगाचा स्टिकर अनिवार्य करण्यात आला आहे. या सर्वांचा हेतू हा गाडी दुरूनच ओळखली जायला हवी हा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एचएसआरपी आणि इंधन प्रकारानुसार रंगीत स्टिकर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आता एचएसआरपी साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सर्व प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • bookmyhsrp.com/index.aspx या वेबसाईटवर जाऊन खासगी वाहन असेल तर तसा पर्याय निवडावा.

  • तिथे पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक, सीएनजी असे पर्याय असतील. आपल्या वाहन प्रकारानुसार पर्याय निवडावा.

  • यानंतर आपले वाहन बाईक, स्कूटर, कार असे काय आहे ते निवडावे लागेल.

  • यानंतर तिथे पुढील विचारलेली माहिती भरावी लागेल.

-आता तुम्हाला पासवर्ड आणि युजरनेम मिळेल.

  • हा युजरनेम पासवर्ड टाकून लॉग इन करावे. नंतर एक पावती तयार केली जाईल.

  • तुमचा एचएसआरपी नंबर तयार झाला की तसा मेसेज तुम्हाला मोबाईल नंबरवर येईल.

 

आता समजा तुमच्या वाहनात रजिस्ट्रेशन प्लेट आहे आणि तुम्हाला फक्त स्टिकर लावायचे असेल तर www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जावे लागेल. तुम्ही ही नंबर प्लेट आरटीओ किंवा अधिकृत डीलर्सकडून ऑफलाईनही खरेदी करू शकतात.

मोटारसायकलसाठी या प्लेटची फी ही ४०० रुपये, तर कारसाठी ११०० रुपये ठरविण्यात आली आहे. सोबतच कलर कोडेड स्टिकरसाठी १०० रुपये वेगळे द्यावे लागतील.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required