computer

दुर्मिळ प्रजातीला वाचवण्याच्या भानगडीत हंगेरियन शास्त्रज्ञांनी नवीन प्रजातीला कसा जन्म दिला ?

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने नामशेष झालेले प्राणी आणि पक्ष्यांना वाचवण्याचे प्रयत्न जगभर होताना दिसत आहेत. हंगेरीच्या शास्त्रज्ञांनी माशांची एक प्रजात वाचवण्याचा असाच एक प्रयत्न केला होता, पण या भानगडीत त्यांनी एका नवीनच प्रजातीला जन्म दिला आहे. हा घोळ कसा झाला, नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया.

 

रशियातील स्टर्गन ही माशांची प्रजात आज जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हंगेरीच्या Research Institute for Fisheries and Aquaculture च्या शास्त्रज्ञांनी स्टर्गन प्रजातींच्या पुनरुत्पादनाचं काम हाती घेतलं होतं. यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या पॅडलफिशच्या शुक्राणूचा वापर केला होता. या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत gynogenesis म्हणतात.

Gynogenesis ही एक अलैंगिक प्रक्रिया आहे. या प्रकारच्या पुनरुत्पादन प्रक्रियेत DNA शिवाय फक्त शुक्राणूंच्या वापरातून नवीन जीव जन्माला येऊ शकतो.

अपेक्षा अशी होती की या प्रक्रियेतून स्टर्गन प्रजाती तयार होईल. या कामी हंगेरियन शास्त्रज्ञांनी अमेरिकन पॅडलफिशची निवड केली, कारण त्यांचा असा अंदाज होता की या दोन्ही प्रजाती कधीच एकत्र आलेल्या नसल्यामुळे त्यांच्यात संकर होऊ शकणार नाही. पण झालं उलटच. स्टर्गन आणि पॅडलफिशच्या संकरातून नवीन माशाची प्रजाती जन्माला आली. या नवीन प्रजातीला ‘Sturddlefish’ नाव देण्यात आलं आहे.

Gynogenesis प्रक्रियेत शुक्राणू सोबत DNA चं हस्तांतरण अपेक्षित नसतं. या प्रकरणात नेमकं हेच घडलं.  शास्त्रज्ञ म्हणतायत की हा या दोन प्रजातींच्या मंद गतीने होणाऱ्या उत्क्रांतीचा परिणाम आहे. या दोन्ही प्रजाती दुर्मिळ आहेत आणि त्यांच्यात हजारो वर्षात उत्क्रांती झालेली नाही. त्यामुळे त्यांना ‘living fossils’ म्हटलं जातं.

तर, संकर तर झाला. पण संकरातून तयार झालेली प्रजात नपुंसक असते. नवीन ‘Sturddlefish’ सुद्धा नपुंसक आहे, पण तिच्यात १०० वर्ष जगण्याची क्षमता आहे. हंगेरियन शास्त्रज्ञांनी आता हा प्रयोग बंद केला आहे. नवीन Sturddlefish पुन्हा कधीच जन्माला येणार नाहीत.

 

(Sturddlefish)

एका दुर्मिळ प्रजातीला वाचवण्याच्या प्रयत्नात हंगेरियन शास्त्रज्ञांनी नवीनच दुर्मिळ प्रजातीला जन्म दिलाय. इतिहासात असे क्षण कमीच येतात.

सबस्क्राईब करा

* indicates required