computer

याने झोमॅटोवाल्यांना उबरच्या कामाला लावलं पाहा.. जाणून घ्या हा सॉलिड डोकॅलिटीचा किस्सा!!

अर्ध्या रात्री रिक्षा किंवा टॅक्सी मिळणे हे जिकिरीचे काम असते. त्यातही मिळाली तरी भाडे अव्वाच्या सव्वा आकारून कठीण वेळेचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगलेच माहीत असते. कॅब आधीच महाग असल्याने प्रत्येकाला परवडेल असे नाही. मग अशावेळी उपयोगी पडतो तो जुगाड!! 

जुगाड करण्यात भारतीयांचा हात कुणीच धरू शकत नाही. कठिणातल्या कठीण परिस्थितीत अफलातून जुगाड कसे करावेत हे भारतीयांकडून शिकायला हवं.

हैदराबादच्या एका तरुणाने पण अशीच एक भन्नाट आयडीया वापरली राव!! ओबेश नावाचा हा तरुण घरी जायला निघाला पण त्याला अर्ध्या रात्री कुठली बस मिळाली नाही ना कुणी लिफ्ट दिली. रिक्षा टॅक्सीवाले लुटायलाच बसलेले असतात आणि कॅब महाग आहे. मग भाऊने अशी शक्कल लढवली की तो थेट घरापर्यंत मोफत गेला.

तर मंडळी, त्याला काय करावे सुचत नव्हते आणि  भूक पण लागली होती. मग त्याने झोमॅटोवर जवळपास कुठे एखादे हॉटेल आहे का हे सर्च केले. तेव्हा तिथे त्याला जवळच एक हॉटेल असल्याचे समजले. तिथे त्याने मग एक डोसा ऑर्डर केला. आणि त्याने डिलिव्हरी बॉयला कॉल करून तो जिथे उभा होता तिथे त्याला बोलवले.

मंडळी, पण त्याने पत्ता मात्र स्वतःच्या घराचा दिला होता. म्हणून जेव्हा तो डिलिव्हरी बॉय त्याच्याजवळ गेला तेव्हा ओबेशने त्याला त्याच्या घरापर्यंत सोडायला सांगितले. मग त्या डिलीव्हरी बॉयने पण त्याला घरापर्यंत सोडून दिले. अशाप्रकारे जेवण पण झाले आणि गडी फुकटात घरी पण पोहचला. आता त्या बिचाऱ्या झोमॅटोवाल्याने त्याच्यासाठी एवढे केले तर त्याचे पण त्या डिलिव्हरी बॉयबद्दल कर्तव्य आहे ना !! मग भाऊने त्याला थेट 5 स्टार रेटिंग देऊन टाकली.

ओबेशची ही पोस्ट वायरल झाल्यावर झोमॅटोची पण प्रचंड स्तुती होत आहे.

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required