computer

भारतातल्या एका शहराला मिळालाय ट्री सिटी ऑफ द वर्ल्डचा किताब! हा मान कसा मिळतो?

आजकाल शहर म्हणजे 'सिमेंटचे जंगल' अशी जवळजवळ प्रत्येक शहराची ओळख झाली आहे. शहर वसवताना हिरवे जंगल नष्ट होईल की काय अशी भिती निर्माण झाली आहे. पण अशातच भारतातल्या एका शहराने जगात ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणून मान्यता मिळवली आहे.

तेलंगणाची राजधानी हैदराबाद या शहरासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. हैदराबाद हे जगातील "ट्री सिटी" म्हणजे वृक्षांचे शहर म्हणून घोषित झाले आहे. तेलंगणा राष्ट्रसमितीचे कार्यकारी अध्यक्ष आणि नगरपालिका मंत्री के. टी. रामा राव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही बातमी शेअर केली आहे. हैदराबाद शहराची ही नवी ओळख म्हणावी लागेल. संपूर्ण हैदराबादसाठी ही एक अभिमानाची बाब आहे.

आर्बर डे फाउंडेशन आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संस्था (FAO) ने हैदराबादला २०२० वर्षातले वृक्षांचे शहर म्हणून मान्यता दिली आहे. हा मान मिळवणारे हैदराबाद हे भारतातील एकमेव शहर आहे. पालिका प्रशासन व नगरविकास विभागाने ३१ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन सबमिशनद्वारे या मान्यतेसाठी अर्ज केला होता.

आतापर्यंत ६३ देशांतील ५१ शहरांना वृक्ष शहरांना ही मान्यता मिळाली आहे. पण ही इतर शहरे कॅनडा, यूके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांतील होती. त्यामुळे भारतातील या एकमेव शहराचे महत्व अजून वाढले.

२०१५ पासून तेलंगणा राज्य सरकार हरीत हारम हा कार्यक्रम राबवित आहे. त्या निमित्ताने अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पण फक्त वृक्षारोपण केले आणि विसरले असे न होता तिथे वृक्षसंवर्धनाचे कामही उत्तम झाले. तिथे असलेल्या जगलांची देखरेख आणि वाढ कशी होईल यासाठी नागरिकांसोबत अनेक कार्यक्रम राबवले गेले. तेलंगणा सरकारच्या म्हणण्यानुसार, या मान्यतामुळे हैदराबाद समृद्ध शहरांच्या नेटवर्कमध्ये सामील झाले आहे. शहरांची वाढ होताना वृक्षांची कत्तल होत नाही ना यासाठी प्रयत्न केले गेले.

प्रशासन आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांनी शहराला जागतिक स्तरावर नेऊन ठेवण्याचे कौतुकास्पद काम हैदराबादने केले आहे. आज स्मार्ट सिटीसाठी खूप जास्त प्रयत्न होताना दिसतात पण ग्रीन सिटी साठी केलेला हा यशस्वी प्रयत्न खूप कौतुकास्पद ठरला आहे. खरंच या नवीन ट्री सिटीचे बोभाटातर्फे खूप खूप अभिनंदन...

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required