६ महिन्यात तब्बल १३ लाख टन कचऱ्याची विल्हेवाट...इंदूर डम्पिंग ग्राउंडवर उभारणार जंगल !!

मंडळी, इंदूरने पुन्हा एकदा स्वच्छ भारत अभियानात बाजी मारून पहिला क्रमांक पटकावला आहे. इंदूरला हा मान काही सहज मिळालेला नाही. इंदूरकरांनी आपल्या शहराला स्वच्छ करण्यासाठी जो कार्यक्रम आखला तो कौतुकास्पद आहे. आज आपण यानिमित्ताने इंदूर मध्ये राबवण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया !!!
मंडळी, इंदूरच्या यशात सर्वात मोठा वाटा आहे तो IAS अधिकारी आशिष सिंग यांचा. आशिष सिंग यांनी केवळ ६ महिन्यात १३ लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. इथेच न थांबता त्यांनी डम्पिंग ग्राउंडचं रुपांतर जंगलात करण्याचं काम हाती घेतलं आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावली म्हणजे काय केलं ते आता समजून घेऊया...
कचऱ्याचा वेगवेगळ्या कामासाठी वापर करण्यात आला. यासाठी तसं योग्य नियोजन करण्यात आलं होतं. सर्वात आधी कचऱ्याची ‘ओला कचरा’ आणि ‘सुका कचरा’ अशी विभागणी करण्यात आली. त्यानंतर कचऱ्यातील वेगवेगळे घटक बाजूला करण्यात आले. जसे की प्लास्टिक, पॉलिथीन, माती, दगड-विटांचे तुकडे इत्यादी.
प्लास्टिक ज्याचं सहसा विघटन होतं नाही त्याचं रुपांतर इंधनात करण्यात आलं आहे. पॉलिथीन जमा करून तो सिमेंट कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आला. रस्ते बांधणीच्या कामात हाच पॉलिथीन वापरण्यात आला आहे. याखेरीज माती, दगड विटांना नव्याने इमारत बांधणीसाठी वापरण्यात आलंय.
डळी, कचरा हटवण्यासाठी जर कंत्राट दिलं असतं तर या कामाला ५ वर्षांचा अवधी आणि ६५ कोटी रुपयांचा निधी लागला असता. पण आशिष सिंग यांनी स्वतःच्या संसाधनांचा वापर करून हे काम अवघ्या ६ महिन्यात करून दाखवलं आहे.
What an achievement of team Indore!!
— Asheesh Singh (@AsheeshSg) December 24, 2018
Before and after photos of Indore’s garbage dumpsite. We toiled day and night for 6 months and reclaimed 100 acres of land worth 300+ crores. #IndoreRahegaNo1 @CMMadhyaPradesh @MoHUA_India @Secretary_MoHUA @SwachhBharatGov @PMOIndia @swarup58 pic.twitter.com/3Wg5zhagsT
काम पूर्ण झाल्यानंतर या रिकाम्या जागी गोल्फचं मैदान तयार करण्याचं ठरलं होतं. पुढे हा निर्णय बदलण्यात आला आणि आता या जवळजवळ १०० एकर जागेत झाडांची भरभराट होणार आहे. १०% हिश्याचं बागेत रुपांतर करण्यात येणार असून ९०% भागात जंगल तयार करण्यात येणार आहे.
मंडळी, इंदूर मध्ये जो प्रयोग झाला तो तुमच्या-आमच्या शहरातही करता येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं ??