computer

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःला ५ हजारांचा दंड का लावला ?

अनेक प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. या प्रामाणिक अधिकाऱ्यांमुळेच आजही नोकरशाहीवर लोकांचा विश्वास आहे. पण मंडळी, कितीही प्रामाणिक असला तरी कुठला अधिकारी स्वतःची चूक झाली म्हणून स्वतःला शिक्षा करेल? पण असा पण एक अधिकारी आहे !! काय आहे नेमकी गोष्ट चला बघुया...

सध्या प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या सगळ्याच दुकानात प्लास्टिक मिळणे कठीण होऊन बसले आहे. अशातच बीडमध्ये एक आगळीवेगळी घटना घडली.  

महाराष्ट्रा केडरचे आयएएस अधिकारी आस्तिक कुमार पांडे सध्या बीडचे कलेक्टर आहेत. निवडणूकीच्या तयारीसाठी त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेवेळी पाहुण्यांना चहा देण्यासाठी प्लास्टिकच्या कपांचा वापर करण्यात आला. ही गोष्ट तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराच्या लक्षात आली. त्याने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की सामान्यांकडून प्लास्टीक वापरले म्हणून दंड आकारणारे जिल्हाधिकारी स्वतः प्लास्टिकचा वापर करत आहेत. तेव्हा जिल्हाधिकारी आस्तिक पांडे यांनी स्वतःची चूक मान्य करत स्वतःलाच 5 हजारांचा दंड आकारला.

महाराष्ट्रात अशी ही पहिलीच घटना असेल की आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने स्वतःची चूक मान्य करून स्वतःलाच दंड ठोठावला. या घटनेची मात्र सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सगळीकडे कलेक्टरच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

 

लेखक : वैभव पाटील.

सबस्क्राईब करा

* indicates required