computer

आयसियस तुकारामी: २६/११ चे हिरो तुकाराम ओंबळेंचा अनोखा सन्मान!

२६/११चा मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला ही भारताच्या इतिहासातली एक काळी घटना. त्यादिवशी आपण अनेक मोहरे आणि नागरिकही गमावले. असिस्टंट सब-इन्स्पेक्टर तुकाराम ओंबाळे यांच्या समयसूचकतेमुळे आणि निर्भिडतेमुळे कसाब हाती लागला.  पण हे सगळे होत असताना त्यांना वीरमरण आले.

या तुकाराम ओंबाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संशोधकांनी त्यांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या नावावरुन कोळ्याच्या एका नव्या प्रजातीला "आयसियस तुकारामी" असं नाव देण्यात आलंय.  संशोधकांकडून प्रकाशित झालेल्या एका रिसर्च पेपरमधून या नावाचा पहिल्यांदा उल्लेख केला गेला आहे.

कल्याण आणि ठाण्यात सापडलेल्या कोळ्याच्या दोन नव्या प्रजातींची माहिती या पेपरमधून देण्यात आलीय. कल्याणच्या शहरी भागात सापडलेल्या एका नवीन प्रजातीला ओंबळेंच्या नावावरून "आयसियस तुकारामी" असं शास्त्रीय नाव दिल्याचं वन्यजीव संशोधक आणि छायाचित्रकार ध्रुव प्रजापती सांगतात. तर दुसरीकडे राजेश सानप, सोमनाथ कुंभार आणि जॉन सेलेब या चमूला आरे कॉलनी, मुंबई, आणि कल्याणपासून ५० कि.मी. दूर भागात सापडलेल्या एका नवीन प्रजातीला "फिंटेला चोळकेई" असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव कुंभार यांचे मित्र कमलेश चोळके यांची आठवण म्हणून दिलं गेलं आहे. हे चोळके तिथे येणाऱ्या संशोधकांना कोळ्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती गोळा करून पुरवायचे. या प्रजातींमध्ये इतर प्रजातींपेक्षा वेगळे बॉडी पॅटर्न्स आणि जननेंद्रिये आढळली आहेत.

शहीद तुकाराम ओंबळेंनी तब्बल २३ गोळ्या झेलून आपल्या प्राणाची आहुती देत दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यास मदत केली. या बलिदानासाठी त्यांना मरणोत्तर अशोकचक्र पदक प्रदान करण्यात आलं. आता या कोळ्याच्या प्रजातीला संपूर्ण जग त्यांच्या नावाने ओळखणार आहे.

सौरभ माळी

सबस्क्राईब करा

* indicates required