अख्ख जग ज्या बॅटरीवर चालतं त्या ताकदवान 'लिथियम बॅटरी' बद्दल जाणून घ्या!!

आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक उपकरणांमध्ये, म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर डिव्हाइसमध्ये लिथियम बॅटर्या वापरल्या जातात. चार-आठ आण्याच्या या बॅटर्यांनी जुन्या मोठ्ठ्या बॅटर्यांचा वापर अगदी मर्यादीत करून टाकला आहे. या बॅटरीत जो धातू वापरला जातो त्याचं नाव लिथियम आहे. म्हणून या बॅटरीला लिथियम आयॉन बॅटरी म्हणतात. साधारण सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी लिथियमपासून बॅटरी बनवता येईल असं कुणी म्हटलं असतं तर त्याला नक्कीच वेड्यात काढलं गेलं असतं.
लिथियमचा वापर पूर्वी असा केला जायचा-
पूर्वी, म्हणजे साधारण १९५०च्या काळात लिथियमचा वापर वेडावर औषध म्हणून केला जायचा. ज्यांना वारंवार वेडाचे झटके येतात, त्यांच्या दोन झटक्यांमधले अंतर कमी व्हावे म्हणून लिथियम कार्बोनेटचा वापर सुरु झाला. त्यामुळे या धातूचा उपयोग बॅटरीमध्ये होईल अशी कल्पनाही कुणाला नव्हती. पण लिथियमच्या या गुणधर्माचा वापर अमेरीकन कंपनी कॅडबरीने बिनदिक्कत केला. सर्वसामान्य व्यक्तीच्या आरोग्यावर लिथियमचा काय परिणाम होईल याचा विचार न करता सेव्हन अप या कोल्ड ड्रिंकमध्ये लिथियम सायट्रेट वापरायला सुरुवात केली. कदाचित, लिथियमच्या मेंदूवर होणार्या परिणामामुळे ते त्याकाळचे अतिशय लोकप्रिय पेय होते. १९५० नंतर हा प्रकार बंद झाला पण केवळ खप वाढवण्यासाठी अमेरिकन कंपन्या काय करू शकतात याचं हे नेमकं उदाहरण आहे.
तर ते जाऊ द्या, आपण बोलत होतो बॅटरीबद्दल !!
लिथियम बॅटरी येण्यापूर्वी बरीच वर्षं आपण एव्हरेडीच्या लाल बॅटर्या वापरायचो. ही बॅटरी काही कालावधीने संपून जायची. ते संपलेले सेल फेकून देताना फार वाईट वाटायचे. त्या बॅटरीचा भुगा गावठी दारु बनवणारे वापरायचे, कारण त्यात नवसागर असायचा. गावठी दारु बंद व्हावी म्हणून सरकारने नवसागरावर बंदी आणली होती. मग बॅटरीचा भुगा वापरला तर दारुत विष उतरायचे. लोकं मरायची. संपलेल्या बॅटरीचा इतकाच उपयोग व्हायचा. त्यानंतर अल्कलाइन बॅटरीचे दिवस आले. रीचार्ज होणार्या बॅटर्या आल्या.
रीचार्ज होणार्या बॅटरीचा एक तोटा होता, तो म्हणजे या बॅटर्यांना विसरभोळ्या होत्या. त्याला मेमरी लॉस म्हणतात. संपूर्ण रिकाम्या होण्याआधी जर चार्जींगला लावल्या, तर चार्ज जितका कमी झाला असेल तितक्याच त्या बॅटर्या चार्ज व्हायच्या. १०० टक्के चार्ज होण्याचं विसरूनच जायच्या. याखेरीज बॅटर्या लिक व्हायच्या. लिक झाल्या की ज्या डिव्हाइसच्या आत असायच्या, त्या डिव्हाइसचा सत्यानाश व्हायचा.
दिवसेंदिवस उपकरणांचा खप वाढला आणि आकार कमी व्हायला लागला. उपकरणाचे वजन आणि आकार बॅटरीच्या वजन आकारावर अवलंबून असल्यामुळे छोट्या आकाराच्या बॅटर्यांची गरज वाढली आणि लिथियम बॅटरीचा खप वाढायला लागला. एकूणात वापर वाढला म्हणून उत्पादन वाढले. प्रश्न असा आहे की लिथियम बॅटरीचा आकार लहान असला तरी पॉवर तेव्हढीच कशी मिळते ??? याचे उत्तर असे की लिथियम सर्वसाधारण बॅटरीच्या सहापट पॉवर जमा करू शकतो. त्यामुळे आकार कमी झाला.
लिथियमच्या जन्माची कहाणी माहीत आहे ?
पण मग हे लिथियम मिळणार कुठे? कधीतरी काही शेकडो कोटी वर्षांपूर्वी जेव्हा विश्वाचा स्फोट होऊन पृथ्वी जन्माला आली, तेव्हा जी तीन मूलद्रव्ये विपुल प्रमाणात तयार होती त्यापैकी एक म्हणजे लिथियम! बाकीची दोन म्हणजे हायड्रोजन आणि हिलीयम. लिथियम अतिशय रीअॅक्टीव्ह असल्यामुळे इतर द्रव्यांबरोबर त्याचा संयोग झाला आणि शुध्द लिथियम मिळायला १८१७ साल उ़जाडावं लागलं. जोहान ऑगस्ट नावाच्या एका स्वीडिश शास्त्रज्ञाने एका खनिजातून ते मिळवलं. या गृहस्थाने लावलेला हा एकमेव शोध होता. तो इतका श्रीमंत होता की घरची कामं उरकायला त्यानंतर त्याने रसायनशास्त्रच सोडून दिलं.
लिथियमचं भारतीय कनेक्शन-
जॉन बॅनीस्टर गुडनहॉफ (स्रोत)
१९९० साली जॉन बॅनीस्टर गुडनहॉफ या शास्त्रज्ञाने जगातील पहिली लिथियम कोबाल्ट ऑक्साइड बॅटरी बनवली. त्याचे दुर्दैव असे की त्याच्या संशोधनाचे पेटंट त्याला मिळेना. सरतेशेवटी त्याने ते संशोधन आण्विक संशोधन करणार्या एका सरकारी संस्थेला देऊन टाकले. यानंतर ज्या घटना घडल्या, त्या केवळ एका रहस्य चित्रपटात शोभतील अशा होत्या. जपानच्या एका कंपनीने -निप्पॉन टेलीफोन -गुडनहॉफ यांच्या सोबत संशोधन करण्याचे निश्चित केले. गुडनहॉफ यांनी अक्षय पाधी नावाच्या एका भारतीय शास्त्रज्ञाला मदतीस घेतले. काहीच दिवसानी गुडनहॉफ रजेवर असताना जपानी शास्त्रज्ञ संशोधन एकत्र करून चक्क पळून गेला आणि त्याच्या कंपनीच्या नावाने पेटंट घेण्याच्या प्रयत्नाला लागला. त्याच्या प्रयत्नाला एकच माणूस लगाम घालू शकत होता, तो म्हणजे डॉ. अक्षय पाधी! पुन्हा एकदा गुडेनहॉफ यांचे दुर्दैव आड आले. डॉ. अक्षय पाधींनी प्रयोशाळेच्या नोंद पुस्तकात नोंदी करण्याचे नाकारले. त्यानंतर A 123 कंपनीच्या माध्यमातून गुडेनहॉफ यांनी पेटंटसाठी झगडा सुरु केला. झगडा सामंजस्याने सुटला, पण A 123 कंपनीने गुडेनहॉफ यांना ठेंगा दाखवला.
आता तर अमेरिकेसारख्या देशात लिथियम बॅटरीशिवाय जगणं मुश्किल झालं आहे, इतका लिथियम बॅटरीचा वापर होतो आहे. लिथियम बॅटरी नसेल तर मोबाईल नाही, कॅल्क्युलेटर नाही, टेस्ला पण नाही. लिथियम बॅटरीवर आज टेस्ला सारखी गाडी ताशी ३०० किलोमीटरच्या वेगाने धावते आहे. करोडो कोटी रुपयांचा व्यवहार लिथियम बॅटरीच्या जोरावर चालला आहे. इलॉन मस्कची टेस्ला गाडी हा घरोघरीचा चर्चेचा विषय आहे. म्हणून आम्ही सुरुवातीला म्हटलं की लिथियम बॅटरीत वापरले जाईल असे सत्तर वर्षांपूर्वी कोणी म्हटले असते, तर त्याची गणना वेड्यातच झाली असती.