computer

या २७ वर्षांच्या तरुणाला स्वतः रतन टाटांनी देऊ केली आहे नोकरी...त्याने अशी कोणती कामगिरी केली आहे ??

रतन टाटा यांच्यासोबत सेल्फी घेता आला तरी भलेभले स्वत:ला भाग्यवान समजतात. पण एक २७ वर्षांच्या या तरुणाला थेट त्यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढण्याची संधी मिळालीय. . 

ज्या वयात मुले टाटांच्या कंपनीत काम मिळावे म्हणून धडपडत असतात, त्या वयात हा गडी टाटांचा सर्वात जवळचा सहकारी म्हणून काम करतोय. शंतनू नायडू असे या तरुणाचे नाव आहे!! शंतनूचे कुटुंब पाच पिढ्यांपासून टाटांच्या कंपनीत काम करत आहे. पण त्यांनी कधी टाटा कंपनीत उच्चपद भूषवले नाही. पण शंतनूला खुद्द रतन टाटांसोबत काम करण्याचा मान मिळालाय. 

एवढ्या कमी वयात हा भाऊ इतक्या वरपर्यंत पोचला म्हणजे त्यानं काहीतरी भारी काम केलं असलं पाहिजे ना? तर त्याची गोष्ट अशी आहे की शंतनू प्राणीप्रेमी आहे. एका रात्री रस्त्याने जाताना एका कारने एका कुत्र्याला उडवले. ही गोष्ट शंतनूला सहन झाली नाही. त्याने एक रेडियमचा पट्टा तयार केला आणि शहरातल्या सगळ्या भटक्या जनावरांच्या गळ्यात बांधला. या रेडियमच्या पट्ट्यांमुळे भटके प्राणी लांबूनच ओळखता येऊ लागले आणि अपघात मोठ्या प्रमाणावर कमी झाले. 

अर्थातच ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशी कामगिरी करणारा तरुण टाटाचा कर्मचारी आहे हे रतन टाटांना समजले आणि त्यांनी त्याला भेटायला बोलवून घेतले. टाटांचे पण पशुप्रेम सगळ्यांना माहित आहे.  त्यांच्या घरात अनेक पाळीव प्राणी आहेत. रतन टाटांनी ही मोहीम पुढे राबविण्यासाठी शंतनूला फंड पण पुरविला.

त्यानंतर शंतनूने एमबीएसाठी परदेशात जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि परत येऊन टाटा जॉईन करेल अशी ग्वाही त्याने दिली. परत आल्यावर स्वतः रतन टाटांनी त्याला कॉल करून त्यांचा सहायक म्हणून नियुक्त केले.

शंतनू सांगतो की त्या दिवसापासून माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे.

 

लेखक : वैभव पाटील