computer

स्केटबोर्डने एका संपूर्ण गावाला शिक्षणाच्या मार्गावर कसं आणलं? भारतातल्या पहिल्या स्केटपार्कची गोष्ट!!

एखादा सतत फिरणारा माणूस पाहिला की आपण म्हणतो, याच्या पायाला चाके लागली आहेत. कदाचित हेच म्हणणे खरे ठरले आणि स्केटबॉर्ड आले. स्केटिंगमुळे मुले मस्त फिरू लागली. परदेशात पाहिले तर स्केटबॉर्डवर मुले सर्रास रस्त्यांवर फिरताना दिसतात. डोक्यावर हेल्मेट, हातापायाला सेफ्टी गार्डस घालून ही मुलं वाऱ्याच्या वेगाने इकडू तिकडे जात असतात. त्या मुलांची चपळता आणि संतुलन पाहिले की थक्क व्हायला होते. भारतात हे प्रमाण फार कमी आहे. प्रमुख शहरांत मुलं स्केटिंग करतांना दिसतात. पण आता चक्क गावातली मुले स्केटबोर्ड शिकत आहेत आणि त्यासाठी खास स्केटपार्कही बनवले गेले आहे. 

भारतात पहिले स्केटपार्क बुंदेलखंड येथे जनवार या गावात उघडले गेले होते. मध्य प्रदेशच्या एखाद्या खेड्यात असे स्केट पार्क उघडणे हे तिथल्या लोकांसाठी फार नवीन होते. हे पार्क जनवार कॅसलच्या नावाने प्रसिद्ध आहे. जर्मन सामाजिक कार्यकर्त्या उल्रिक रेनहार्ड (Ulrike Reinhard) यांनी गावातल्या मुलांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे पार्क बांधले आहे. या छोट्याश्या खेड्यात केवळ १५० घरे आहेत. अतिशय गरिब अशा या गावात मुलं शाळेपासून लांब पळत. आईबाप दिवसा कष्ट करत, तर मुलं शाळेत न जाता दिवसभर खेळत. त्यामुळे असे काहीतरी करावे की मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, या विचाराने उल्रिक रेनहार्ड यांनी या मुलांसाठी मोफत स्केटपार्क सुरू केले. मोफत असले तरी येथे शिकण्यासाठी दोन महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली म्हणजे शाळेत जाऊन मगच पार्कमध्ये येणे आणि दुसरी म्हणजे मुलींना प्राधान्य देणे. या खेड्यात मुलींना मोठ्याप्रमाणात शिक्षणापासून लांब ठेवलं जातं. त्यामुळे स्केटपार्कच्या निमित्ताने मुलींनाही शिक्षणाकडे वळवण्यात आले.

स्केटपार्क सुरू झाल्यापासून मुलामुलींची शाळेत जाण्याची संख्या वाढली आहे. मुलं शाळेत जात नव्हती पण स्केट पार्क उघडल्यानंतर ८० मुलांनी प्राथमिक शाळेत नाव दाखल केले आहे. रोज सगळे शाळेत जातात आणि मग स्केटिंग शिकायला येतात. इथे ५ ते १७, १८ वयाचे मुलं मुली स्केटिंग शिकतात. दररोज दोनदा इथे सराव घेतला जातो. अनेक स्पर्धाही इथे भरवल्या जातात. इथे कुठलीही जातपात न मानता सर्वाना एकत्र शिकवले जाते. त्यामुळे माणसांमधली दरीही कमी होत आहे. रेनहार्ड सांगतात आधी बऱ्याच अडचणी आल्या, परंतु मार्ग मिळत गेले. मुलं अत्यंत कौशल्याने स्केटिंग करत हवेत झेपावतात आणि खेळाचा आनंद घेतात, हे पाहून खूप आनंद होतो.  

जनवार येथील स्केटपार्क पाहून इतर राज्यातील गावांमध्येही काही सामाजिक संस्था (NGO) एकत्र येऊन हा उपक्रम राबवण्याचा विचार करत आहेत. या अभिनव उपक्रमामुळे मुलांची ऊर्जा एका चांगल्या गोष्टीसाठी खर्च होत आहे, शिवाय शिक्षणाकडेही ते वळत आहेत. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required