पाण्याच्या निर्यातीत भारत अग्रेसर !!

वैशाखवणवा सुरु झाला आहे.  अवर्षण क्षेत्रातील लोक पाण्यासाठी दाही दिशा फिरत आहेत. अशा परिस्थितीत आपण पाण्याच्या निर्यातीत अग्रेसर आहोत हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल, नाही का ?

पण ही सत्य परिस्थिती आहे.  फक्त   ही प्रक्रिया अप्रत्यक्षरित्या घडत  असल्यामुळे आपल्याला या समस्येचे गांभीर्य थेट लक्षात येत नाही. 
उदाहरणार्थ वाटीभर तांदूळ शिजवायला किती  पाणी लागते? उत्तर सोपं आहे.  प्रेशर कुकरच्या बुडाशी एक वाटी आणि तांदूळ शिजवायला दोन वाट्या इतकं पाणी लागेल. पण एक वाटी तांदूळ आपल्या घरात येण्यापूर्वी त्यावर किती पाणी खर्च होते याचा विचार आपण करत नाही. जगभरात एक किलो तांदूळ पिकवायला तब्ब्ल २१७३ लिटर पाणी वापरले जाते तर भारतात त्यासाठी २६८८ लिटर पाणी वापरले जाते.  २०१४-१५ या वर्षात आपण ३७.२ लाख टन बासमती तांदूळ निर्यात केला आणि त्यासाठी १० ट्रिलीयन लिटर पाणी वापरले गेले. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या १० ट्रिलीयन लिटर पाण्याची आपण निर्यात केली. पण हे गणित आपल्या लक्षात येत नाही. यासाठी एंबेडेड वॉटर ही संकल्पना वापरली जाते. 


आता दुसरे उदाहरण बघू . एक लिटर बीअरच्या बाटलीत एक लिटर पाणी आहे असे मानले तर एक लिटर बीअर बनवण्यासाठी २९८ लिटर पाणी वापरले जाते . मग हे पाणी येते कुठून? असाही एक प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. यावर उत्तर असे आहे की पावसाळा संपल्यावर नद्यांच्या पात्रातून वाहणारे आणि भूगर्भात शिल्ल्क राहणारं  पाणी आपण वापरतो. 
जागतिक स्तरावर या आकडेवारीची तुलना केली तर पाण्याच्या वापरात आपण दिवाळखोरीच्या मार्गावर आहोत. ब्रह्मपुत्रेसारख्या नदीच्या खोर्‍याचा अपवाद वगळता बाकी सर्व नद्यांच्या खोर्‍यात दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत जाणार आहे आणि उपलब्ध आकडेवारीचा विचार केला तर आपण धोक्याची पातळी आधीच ओलांडली आहे. 

Image source


अधिक माहितीसाठी अर्थातच हा अहवाल मुळातून वाचणे आवश्यक आहे. पाण्याचा पेला हाताशी ठेवूनच हा अहवाल वाचा हा एक आगाऊ सल्ला आहे कारण अहवाल वाचल्यानंतर घशाला कोरड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 http://www.pnas.org/content/109/9/3232.full

सबस्क्राईब करा

* indicates required