टॉयलेटला जाता आलं नाही म्हणून मिळाली ३० हजार रुपये भरपाई !!

आपली भारतीय रेल्वे आता कात टाकतीय. रेल्वे प्रशासनेही 'अच्छे दिन' धोरण जवळ केल्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि सुखाचा प्रवास घडतोय. पण ही गोष्ट आहे ७ वर्षांपूर्वीची. त्यावेळी घडलेल्या चुकीची भरपाई रेल्वेला आत्ता द्यावी लागतीये.

तर झालं असं की कायदे व न्याय मंत्रालयात डेप्युटी लीगल अॅडव्हायझर असलेले मिस्टर देव कांत हे २००९ मध्ये अमृतसर ते दिल्लीचा रेल्वेने प्रवास करत होते. सोबत पत्नी, मुलगा आणि मुलगी असं कूटूंबही होतं. दरम्यान लुधियाना स्टेशन वर रेल्वे थांबल्यानंतर पॅसेज मध्ये मोठ्या संख्येत लोक बिना तिकीट आत घुसले. ज्यांना जागा मिळाली नाही त्यांनी खालीच ठाण मांडून घेतलं. त्यामुळे पॅसेज गच्च भरलं आणि वॉशरुमचा रस्ताही बंद झाला. टीटीईच्या निदर्शनास आणूनही लोकांचा काही बंदोबस्त झाला नाही. यामुळे जवळपास दिड तास देव यांच्या कूटूंबाला शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागला. 

शेवटी हा माणूस कायद्याच्या तालमीतला. यांनी कन्झ्युमर कोर्टात रेल्वे विरूध्द खटला भरला. आता ७ वर्षानंतर न्यायालयानं रेल्वेला देव कांत यांना ३०,००० रूपये भरपाई देण्याचा आदेश दिलाय. रेल्वे सुधारली तरी बेशिस्त प्रवाशांचा मुद्दा उरतोच. त्याचं काय ? 

सबस्क्राईब करा

* indicates required