computer

इंडोनेशिया आपली राजधानी हलवतोय, जाणून घ्या त्याची कारणे आणि त्यामुळे होऊ घातलेले देशातले बदल!!

खाद्या देशाची राजधानी बदलणे ही बाब सामान्य नाही. राजधानी नव्या जागेवर हलवल्यावर अनेक गोष्टी बदलतात. १८ जानेवारी रोजी इंडोनेशियाच्या संसदेने देशाची राजधानी जकार्ता येथून 'नुसंतारा' (Nusantara) नावाच्या नवीन शहरात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. याची कारणे काय आहेत, इंडोनेशियामध्ये यामुळे काय बदल होतील याची माहिती आपण करून घेऊयात.

१९४९ मध्ये इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे. मात्र आता ती इथून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जकार्तामध्ये येणाऱ्या अनेक अडचणींमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. यात सर्वात महत्वाची समस्या म्हणजे इथे वाढलेली लोकसंख्या आणि त्यामुळे वाढलेले प्रदूषण. जगातील सर्वात गर्दी असलेले रस्ते म्हणजे जकार्तातील रस्ते असे मानले जाते. तसेच १० दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेले हे महानगर जावाच्या इंडोनेशियन बेटावर एका दलदलीवर वसलेले आहे. अभ्यासकांनुसार कदाचित २०५० पर्यंत हे शहर पूर्णपणे बुडू शकते. इथे दरवर्षी पूर येतो.

त्यामुळे ऑगस्ट २०१९ मध्ये राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी पहिल्यांदा घोषणा केली की जावा बेटावरील राजधानी जकार्ता येथून बोर्नियो बेटावर पूर्व कालीमंतन येथे हलवली जाईल. हे अंतर जकार्ताच्या अंदाजे २००० किलोमीटर ईशान्येला आहे. नुसंतारा हे येथेच आहे. जावानीजमध्ये नुसंतारा या शब्दाचा अर्थ "द्वीपसमूह" असा आहे. पूर्व कालीमंतन हे जंगल आणि ओरांगउटान्समुळे प्रसिद्ध आहे. इथे सध्या केवळ ३.७ दशलक्ष लोक राहतात. नव्या राजधानीसाठी २,५६,१४२ हेक्टर जमीन बाजूला ठेवली गेली आहे. नव्या राजधानीचे काम टप्याटप्यात सुरू होणार असून २०२४ च्या पहिल्या तिमाहीत पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. २०४५ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. पर्यावरणास अनुकूल "स्मार्ट" शहराची स्थापना करण्याच्या उद्देशाने एक आदर्श म्हणता येईल असे सर्वसोयींनीयुक्त डिझाइन तयार करण्यात आले आहे. ३० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च अपेक्षित असलेला हा प्रकल्प इंडोनेशियातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. जकार्ता आणि जावा बेटावरील भार कमी करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

आपली राजधानी स्थलांतरित करणारा इंडोनेशिया हा पहिला आणि एकमेव देश नाही. अलीकडेच कझाकस्तान आणि म्यानमार यांनीही राजधानी बदलली आहे. कझाकस्तानने १९९७ मध्ये आपली राजधानी अल्माटी येथून अस्ताना येथे हलवली. २०१९ मध्ये माजी अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव यांच्या सन्मानार्थ अस्तानाचे नाव बदलून नूर-सुलतान करण्यात आले. २००५ मध्ये, म्यानमारची राजधानी यांगून इथून नेपीडाव येथे स्थलांतरित करण्यात आली.

इंडोनेशियामध्ये सध्याच्या राजधानीत प्रदूषण आणि पुराचा सामना करावा लागल्यामुळे नव्या ठिकाणी राजधानी हलवण्यात येणार आहे. हे विधेयक तीन वर्षानंतर संसदेत मंजूर झाले आहे. नव्या राजधानीच्या प्रशासनाची जबाबजारी ही स्टेट कॅपिटल ऑथेरिटी चीफकडे असणार आहे. पुढची २० वर्षं हे काम चालणार आहे. पूर्ण जगाचे लक्ष यावर असणार आहे हे निश्चित.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required