लक्झेंबर्ग- जगातला हा दोन नंबरचा श्रीमंत देश आहे तरी कसा ?

होय, तुम्ही वाचलंत ते अगदी बरोबर आहे. लक्जेंबर्ग हा एक असा देश आहे की त्या देशाच्या लोकसंख्येपैकी ५०टक्के लोक परदेशी आहेत. म्हणजे फक्त ५० टक्के मूलनिवासी आणि बाकी सगळे उपरे !! या परदेशी पन्नास टक्क्यात १७०  देशातून आलेल्या नागरीकांचा समावेश होतो. असे असूनही , हा देश पूर्णपणे तंटामुक्त देश आहे.  इथल्या पोलीस दलात फक्त १३०० पोलीस आहेत आणि आख्ख्या देशात फक्त दोन तुरुंग आहेत.

स्रोत

या देशाबद्द्ल सांगावं तितकं कमीच आहे. जगातला हा दोन नंबरचा श्रीमंत देश आहे. युरोपातील सर्व देशांमध्ये या देशात दरडोई उत्पन्न सगळ्यात जास्त आहे. लक्जेंबर्गच्या सरकारी धोरणाप्रमाणे मासिक किमान वेतन १९१३ युरोज म्हणजे एक लाख  पंचावन्न हजार रुपये आहे. निसर्गाने हजारो हातांनी या देशाल नटवले आहे म्हणून या देशाला "मिनी स्वित्झर्लंड" अशी उपाधी देण्यात आली आहे. 

हा देश फायनान्शीअल टेक्नॉलॉजीचा देश समजला जातो.  तसंच बँकांचा देशही समजला जातो. १५० अधिक इन्व्हेस्टमेंट बँकाची कार्यालये इथे आहेत. ३५० हून अधिक बहूराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये इथे आहेत. अभिमानाची गोष्ट अशी की या देशातली सगळ्यात मोठी पोलादाची कंपनी एका भारतीय वंशाच्या मालकाकडेआहे. ही कंपनी आहे आर्सेलर-मित्तल आणि मालकाचे नाव आहे लक्ष्मीचंद मित्तल. अगदी  स्वप्नात सुध्दा असा देश तुम्ही बघितला नसेल. 

स्रोत

अशा देशात भारतीय लोक आहेत का? असतील तर आहेत किती? आणि का गेलेत भारतीय या देशात.  हे आज आपण समजून घेऊ या !!

२००७ च्या जनगणनेनुसार पाह्यलं तर तेव्हाच ३०००० भारतीय तेथे स्थायिक झाले होते. साधारण १९८० पासून पुढे संगणक क्षेत्राची भरभराट झाली आणि भारतीय नागरीक तिकडे स्थलांतरीत व्हायला सुरुवात झाली.  साहजिकच इथले भारतीय नागरीक तिथे जाऊन गब्बर झालेत वेगळं सांगायला नकोच! पण सबूर!!! हा देश तितकाच महागडा आहे!

कसे आहे इथले जीवनमान? चला, थोडी तुलना करून बघू या !!

स्रोत
एका माणसाचं जेवण सर्व साधारण हॉटेलमध्ये भारतात  १५० रुपयात आटपतं,  तर इथे १३५० रुपये मोजावे लागतील. पाण्याची बाटली  १८४ रुपयात घ्यावी लागेल, दूधाचा एक लिटरचा दर १९४ रुपये आहे, तर एक किलो बटाटे घेण्यासाठी तब्ब्ल १२५ रुपये खर्च होतील.  फुट्ला ना घाम हे दर ऐकून?? पण टेक इट इझी बॉस, इथे सध्या सरासरी मासिक वेतन आहे २,५०,००० आणि घर घ्यायचे म्हटले तर गृहकर्ज फक्त १.९४ व्याजदराने मिळेल !!

कसे आहे इथल्या भारतीयांचे सामाजिक जीवन ?

आपले भारतीय लोक आपसातल्या व्यवहारात हिंदी आणि तमिळचा वापर जास्त करतात.  १९९१ साली अंबी वेकंटरमण नावाच्या गृहस्थाने इथे The Indian Association of Luxembourg ची स्थापना केली. या संस्थेद्वारे साजरे केले जाणारे सण जर बघितले तर आपली भारतीय संस्कृती या देशात जतन केली आहे  याची ग्वाही मिळेल. हैद्राबादचे जफर अली शेरवानी यांनी १९७४ साली "स्टार ऑफ एशिया " हे भारतीत रेस्टॉरंट इथे सुरु केलं. त्यांचा मुलगा इथे एक रेडीओ चॅनेल "देसी व्हाइब्ज" चालवतो आणि त्यावर  हिंदी गाणि शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होतात. सुनीता त्रिवेदा ही महिला इथे भारतीय कुकींग क्लास चालवते, तर अनिता कोहली या शिक्षिका इथल्या नागरीकांना  हिंदी शिकवतात. 

स्टार ऑफ एशिया (स्रोत)

देसी व्हाइब्ज (स्रोत)

भारतीय विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येऊ शकतात का ?
होय, लक्जेंबर्ग या देशात एकच विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या अंतर्गत जी महाविद्यालये आहेत तेथे भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. स्टुडंट व्हिसा पण अगदी सहज मिळतो. या विद्यापीठातील एमबीएची पदवी जगभरात मान्यतापात्र आहे. शिक्षणाचा खर्च मात्र खूपच जास्त आहे. सर्वसाधारणपणे एका वर्षाची फी २५ लाखाच्या घरात जाते. त्यामुळे भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी फारसे इथे येताना दिसत नाहीत. 

इथे येण्यासाठी व्हिसा कसा मिळवायचा ?
दिल्ली , जयपूर, पुणे, चंदीगढ , बंगळूरु , अहमदाबाद गोवा , कोलकाटा आणि इतर अनेक शहरात व्हिसा अ‍ॅप्लीकेशन सेंटर आहेत. व्हीएफएस ग्लोबल ही भारतीय कंपनी व्हिसा प्रोसेसचे काम बघते. 

भारतीय पर्यटकांसाठी हा देश कसा आहे ?

स्रोत

डोळ्याचे पारणे  फिटावे असे निसर्ग सौंदर्य आणि अत्यंत सुंदररित्या जपलेला सांस्कृतीक ठेवा बघायचा असेल तर लक्जेंबर्गला नक्की भेट द्या. 

काही भारतीयांचा अनुभव सांगू शकाल का ?
इंग्रजी शिवाय जर्मन  किंवा फ्रेंच सारखी आणखी एखादी भाषा येत असेल तर इथे राहणे फारच सोपे आहे. सरकारी खाते त्वरीत मदत करते. सकाळी मेल करा, संध्याकाळपर्यंत उत्तर मिळते. अ‍ॅमेझॉन्मध्ये काम करणारी अनेक भारतीय माणसं इथे भेटतील. आपले घरचे जेवण हवे असेल तर अगदी तंदूरी, आलू, नानचे जेवण पण इथे मिळते.

स्रोत

शब्दात सांगता येईल इतके आम्ही तुम्हाला सांगितले आहेच, बाकी लक्जेंबर्ग, (इथली लोकं प्रेमाने या देशाला लक्स म्हणतात) आपण फोटो आणि व्हिडीओतून बघू या !!!

 

 

आणखी वाचा :

कथा विविध देशांच्या : 'लाटव्हिया' भारतीयांसाठी कसा आहे? तिथं काय करावं आणि काय करू नये?

सबस्क्राईब करा

* indicates required