या पितृपक्षात असे करा आपल्या पूर्वजांचे स्मरण.. वाचा एकदम हटके आयडिया..

हा पंधरवडा श्राध्द पक्षाचा किंवा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या पंधरा दिवसात काय करावे हे आम्ही काय सांगणार? पण काहीतरी वेगळे काय करायचे हा सल्ला आम्ही नक्कीच देऊ शकतो!
हे सांगण्यापूर्वी आम्हाला या लेखाची स्फूर्ती कशी मिळाली ते ऐका! Alex Hally या कृष्णवर्णीय लेखकाने 1976 साली Roots नावाची कादंबरी लिहिली. अलेक्सच्या सात पिढ्या अमेरिकन गुलामगिरीत होत्या. अलेक्सचा मूळ पूर्वज आफ्रिकेतून गुलाम म्हणून बाजारात विकला गेला होता. अलेक्सने Roots मधून त्याच्या सात पिढ्यांचा शोध घेतला आहे. तसाच येत्या पितृपक्षात आपणही आपला शोध घेऊ या!
तुमच्या घरात असलेल्या तुमच्या आजोबा-पणजोबांच्या सध्या वापरात नसलेल्या वस्तू म्हणजेच फोटो किंवा इतर काही शोधून जतन करा.
उदाहरणार्थ, माझ्या आजोबांचा चष्मा! हा चष्मा जवळजवळ ७५ वर्षे जुना आहे! माझ्या पणजोबांचा चष्मा नाही कारण ते अशिक्षित असल्यामुळे त्यांनी चष्मा वापरलाच नाही किंवा त्यांची नजर नव्वदीतही उत्तम होती हेही एक कारण होते! माझ्या आजोबांचा चष्मा माझ्या कुटुंबाच्या शिक्षणाचा ऐतिहासिक पुरावा आहे.
माझ्या आजोबांचा चष्मा!

माझे आजोबा १९६४ साली भारतीय वायुदलातर्फे अमेरिकेत विमानांचा ताबा (Hand over) घ्यायला गेले होते. तेव्हाचे एक ओळखपत्र आहे. यावर ते अमेरिकेचे पाहुणे (स्टेट गेस्ट) असल्याचा उल्लेख आहे. माझ्या कुटुंबासाठी हा अनमोल ठेवा आहे.
तुमच्याकडे असा काही ठेवा आहे का? असल्यास कृपया आमच्या सोबत तो शेअर करा!

तुमचे आडनाव तुमच्या घराण्याला कसे मिळाले? याचा ख़ास अभ्यास या काळात करावा. ब्रिटिश काळात घाटावरून आलेल्या बहुतेकांना पाटील म्हणून संबोधन मिळाले. पण मूळ आडनाव काही वेगळे होते.
अनेक भोसले कुटंबाना पाच-गांव भोसले म्हणून ओळखतात किंवा काही देसाई कुटुंबांना सात-गांव देसाई म्हणतात. सावंत कुटुंबात पाच वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ भोसले-सावंत, पटेल -सावंत वगैरे वगैरे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंची आडनावे कामाच्या प्रकारातून आलेली आहेत. जे सचिव होते ते चिटणीस , जे अश्वशाळेचे काम बघायचे ते पागनीस!
तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या कुटुंबाच्या आडनावाची अशी काही ओळख आहे का??
अशीच गोष्ट आपल्या मूळ गावाची पण आहे. उदाहरणार्थ चौकळशी, पाच-कळशी समाजाची कुटुंबे अलीबागजवळ स्थायिक आहेत. त्यांचे हे मूळ गाव नव्हे. मग हे अलिबागला कसे गेले? तर याचं उत्तर असं आहे की चिमाजी अप्पानी ही कुटुंबे तेथे नेली.
आपल्याकडील भानुशाली समाज पण अशाच स्थित्यंतरातून अलिबागला गेला आहे. भानुशाली समाज मूळचा पंजाब प्रांतातला, तो भाग आता पाकिस्तानात आहे. पण काही ऐतिहासिक कारणाने ते कोकणात आले. भानुशालींच्या मूळ देवीचं मूळ स्थान काराकोरम पर्वतात आहे, तसंच एक देऊळ अलीबागजवळ आहे. हे मंदिर या स्थित्यंतराचे प्रतिक आहे.
तर या पितृपक्षात हे पण शोधून बघा की आपले मूळ गाव कोणते?
अमुक एक गोष्ट "आपल्याकडे" करत नाही किंवा चालत नाही याचे कारण शोधायचा प्रयत्न करा किंवा अमुक प्रथा आपल्याकडे कशी आली असेल याचा अभ्यास करा. उदाहरणार्थ , लग्नाच्या बैठकीत तुमच्याकडे सहाणेवर वधू अंगठा टेकते की नाही अशी चर्चा कोकणातल्या काही मराठा समाजात ऐकायला मिळते. या प्रथेचा संबंध पुनार्विवाहाशी आहे. पण ही प्रथा का आली असेल याचा विचार करा!
असे काही निर्बंध खाण्यापिण्याच्या चालीरितीत पण बघण्यात येतात. उदाहरणार्थ अनेक शाकाहारी कुटुंबात मसूर वर्ज्य असतो तर काही मांसाहारी कुटुंबात मसूराशिवाय चालत नाही? असे का होत असेल??
काही कोकणस्थ मांसाहारी लोक नामदेव शिंपी समाजात शिंपल्या-तिसऱ्या खात नाहीत किंवा अमुक एक मासा खाल्ला जात नाही असे आढळते. खरंतर यातल्या काही पध्दतींमागचं कारण असं आहे की शेकडो वर्षापूर्वी काशीयात्रा केल्यावर आवडीचा पदार्थ सोडला जायचा आणि ती प्रथा पुढे चालत रहायची .
अशा काही प्रथा तुमच्याकडे आहेत का?? कृपया ही माहिती शेअर करा !
आपल्या पूर्वजांची भाषा कदाचित वेगळी असेल. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे कानडी किंवा तेलुगु बोलायचे. तसेच तुमची बोलीभाषा वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, शहरात स्थायिक झाल्यावर अहिराणी भाषा तुमच्या नव्या पिढीला अवगत नसेल तर ती पुन्हा अवगत करण्याचा प्रयत्न करा.
मोडी लिपी हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. आपल्या घरातील बरीच कागदपत्रे मोडीत असतील , या पितृपक्षात मोडी शिकण्याचा संकल्प तुम्ही करू शकाल!
भाषावार प्रांतरचनेपूर्वी आपले पूर्वज वेगवेगळ्या प्रांतात राहत होते. त्या जमान्यातील पत्रे - कागदपत्रे - इमानपत्रे वेगळ्या भाषेत असतील तर त्यांचे जतन् करण्याचा संकल्पपण आपण करू शकतो. उदाहरणार्थ मराठवाड्यातील जुनी कागदपत्रे फारसी उर्दू भाषेत असतील तर सोलापूरकड़े कानडीत असतील.
असे काही पुरातन दस्ताऐवज् तुमच्याकडे आहेत का? असेल तर इथे नक्की शेअर करा!
आपल्या प्रथेनुसार पूर्वजांचे स्मरण कराच, पण आम्ही म्हणतोय तसंही आपल्या पूर्वजांचे स्मरण करून बघा!!