हमारा बजाज, रुह अफजा आणि बँड बाजा बारात.. हे सगळेजण कोर्टात का गेले? जाणून घ्या या खटल्यांबद्दल..

अमेरीका आणि युरोपच्या अनेक कंपन्यांनी वर्षानुवर्षं नफा कमावला असेल तर केवळ चांगल्या उत्पादनाच्या जोरावर नाही तर त्या उत्पादनाला संरक्षण देणार्या आयपी राईट्स म्हणजेच उत्पादकाचे 'बौद्धिक संपदा अधिकार' कायद्यांच्या जोरावर !!
आता हे कायदे समजणे थोडे अवघडच आहे. अगदी कोर्टाला पण या कायद्यावर आधारीत निर्णय घेताना बराच विचार करावा लागतो.
या बौध्दीक संपदा अधिकाराचा फायदा परदेशातील औषध कंपन्यांना सगळ्यात जास्त होतो. उदाहरणार्थ, अॅव्हेस्टीन नावाचे स्तनाच्या कर्करोगावरच्या इंजेक्शनची किंमत १,०९,००० रुपये होती. औषध बौध्दीक संपदेच्या अधिकारात असल्याने रुग्णांना परवडत नव्हते. सरकारने हस्तक्षेप केल्यावर केवळ भारतासाठी किंमत कमी करण्यात आली. थोडक्यात, बौध्दीक संपदेचा कायदा उत्पादनाचे संरक्षण करतो पण कंपनीला बेलगाम किंमत लावण्यापासून अडवू पण शकत नाही.
आपले बॉलीवूड यात कॉपीमास्टर आहे. इथे नाव, कथा, पोस्टर, सिन, वेशभूषा या सगळ्याची कॉपी बिनदिक्कत मारली जाते. आज बघू या असे गमतीदार खटले !!
बँड बाजा बारात हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघीतला असेल. हा चित्रपट तयार होता होताच त्याची हुबेहूब कॉपी तेलगूमध्ये 'जबरदस्त या नावाने आली. यशराज फिल्म्सच्या नजरेत ही कॉपी येईपर्यंत त्याची तमीळ कॉपी पण तयार झाली होती. दिल्लीच्या हायकोर्टात धाव घेतल्यावर तेलुगू चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपट रिलीज करण्यावर तात्पुरता मनाई हुकुम जारी केला. यशराजचा चित्रपट आला आणि गेला पण अजूनही खटला चालूच आहे.
चला हा खटला तर निर्मात्यांचा होता पण जॉन अब्राहमच्या एका चित्रपटावर बजाज ऑटो कंपनीने आक्षेप घेतला होता कारण या चित्रपटाचे नाव होते 'हमारा बजाज '!!
या चित्रपटात नायकाचे नाव बजाज आहे, स्कूटर हा आमचा विषय नाही असे उत्तर जॉन अब्राहमच्या कंपनीने कोर्टात दिले. बजाज ऑटोच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या ब्रँडची प्रतिमा या नावाने डागाळते. कोर्टाने बजाज ऑटोचे विधान योग्य मानून जॉन अब्राहमला हमारा बजाज आणि बजाज हे दोन्ही शब्द चित्रपटात वापरायची मनाई केली.
पण यापेक्षा जबरदस्त डायलॉग आणखी एका चित्रपटात होता "ब्रेड का बादशाह और ऑम्लेट का राजा....बजाज, हमारा बजाज !!" आठवतो का तो चित्रपट ? त्या डायलॉगवर मात्र तेव्हा कंपनीने आक्षेप घेतला नव्हता.
हमदर्द या औषध कंपनीने मात्र एका चित्रपटातल्या एका संवादावर आक्षेप घेतला होता. चित्रपट होता " ये जवानी है दिवानी " . चित्रपट प्रेक्षागृहात येण्यास काही दिवसांचाच अवधी होता आणि हमदर्दने तक्रार केली की त्यांचे एक उत्पादन रूह अफझा बद्दल नायक जे म्हणतो ते अत्यंत चुकीचे असून रूह अफझा हा त्यामुळे थट्टेचा विषय होतो आहे. या चित्रपटात आई मुलाला समजवत असते की "या जगात हळूहळू सगळं काही ठीक होत असतं " यावर मुलगा आईला म्हणतो "या जगात सगळं काही बदलेल पण बदलणार नाही रूह अफझा आणि त्याची घाणेरडी चव " अर्थातच कोर्टाने हमदर्दचा दावा मान्य केला आणि निर्मात्यांना तो संवाद काढून टाकण्याचे आदेश दिले.
बॉलीवूडमध्ये गाण्याच्या चाली चोरल्या जातात, हॉलीवूडचे कथानक ढापले जाते, इतकंच नव्हे तर काही वेळा चित्रपटाचे सिन पण चोरले जातात. अशा एका चोरीमुळे ' नॉक आउट' या चित्रपटाच्या निर्मात्याला ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स या कंपनीला एक कोटी वीस लाखाची भरपाई द्यावी लागली होती. त्या हॉलीवूड कंपनीचा फोन बूथ नावाचा एक चित्रपट आला होता. एका फोन बूथमध्ये अडकलेल्या माणसाची ती कथा होती. हीच आयडीया'नॉक आउट' वाल्यांनी चोरली. त्यानंतर खटला हायकोर्टात उभा राहीला आणि चोरीची भरपाई म्हणून एक कोटी वीस लाखाचा दंड बॉलीवूड निर्मात्याला भरावा लागला.
असे अनेक किस्से सर्वत्र घडत असतात. अगदी छोट्याछोट्या बाबी पण खटल्याचे विषय होतात. कॅडबरी आणि नेसले या कंपन्या तर सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. एक्लेअर्स चॉकलेटचा असाच एक गंमतीदार किस्सा आहे, तो नंतर कधीतरी...
शेवटी, थोडक्यात आणि महत्वाचे, "बोभाटा" चे सर्व लेख बौध्दीक संपदेच्या कायद्याच्या अंतर्गत येतात.