computer

रोमन संख्यापद्धत लक्षात आहे की विसरलात?? त्यातल्या या गंमतीजमती तुम्हांला नक्कीच आठवत असतील!!

आपण भारतीय खूप हुशार आहोत. प्रत्येकाला किमान दोन भाषा येत असतात हे तर आता सर्वमान्य आहे. आपण सगळे देवनागरी आणि इंग्रजीमध्ये आकडे लिहू शकतोच आणि त्याचसोबत 1 ते 20 पर्यंतचे रोमन अंक अगदी व्यवस्थित लिहू शकतो. कारण लहानपणीच शाळेत आपली रोमन आकड्यांशी ओळख झालेली असते. दोन आडव्या रेषांच्या मध्ये सरळ किंवा तिरक्या रेषा मारून तयार होणारे रोमन अंक शिकताना मज्जा आली असेल ना? पण मग ५०, १०० आणि त्यापुढच्या अंकांना काय म्हणतात हे लक्षात ठेवताठेवता वाट लागली असेल!! पण कधी प्रश्न पडलाय? थोडीफार ओळख होऊन नंतर पसार झालेले हे आकडे नेमके कुठून आले होते? कोणत्या देशात त्यांच्या उगम झाला होता? चला तर मग जाणून घेऊया...

रोमन संख्या ही गणितातली एक संख्यापद्धत आहे. तिचा उगम रोम या युरोपातल्या देशात झाला. लॅटिन भाषेतील अक्षरे एकमेकांशेजारी विशिष्ट पद्धतीने मांडली की तिचे रोमन अंक तयार होतात! रोमन अंक सात मूलभूत प्रतीकांच्या म्हणजेच अक्षरांच्या संचापासून तयार झाले आहेत. उत्तरार्धापर्यंत यूरोपमध्ये रोमन संख्या एक प्रचलित संख्यापद्धत होती. रोमन साम्राज्याचा अंत झाल्यानंतरही रोमन संख्यापद्धत उपयोगात होती. परंतु चौदाव्या शतकानंतर हिंदू - अरब अंकांनी हळूहळू तिची जागा घेतली. तरीसुद्धा आजही गणिताच्या काही आकडेमोडीत रोमन संख्यांची जागा अबाधित आहे.

रोमन अंकांच्या गमती - जमती

१. रोमन अंकामध्ये दशमान पद्धतीचा वापर केला जात नाही. म्हणजेच अंकांना त्यांच्या स्थानानुसार किंमत नसते!

२. रोमन संख्यांमध्ये "शून्य" हा अंकच नाही!

३. I आणि X ही अक्षरे सलग तीनपेक्षा जास्त वेळा वापरता येत नाहीत. तर V हे अक्षर सलग दोन वेळा वापरता येत नाही!

४. I किंवा V ही अक्षरे मोठय़ा संख्येच्या अक्षराच्या उजवीकडे लिहिले असल्यास I किंवा V ची किंमत मोठय़ा संख्येच्या किमतीत मिळवली जाते. उदाहरणार्थ, XVI = 10 + 5 + 1 = 16!

५. जेव्हा I हे अक्षर V किंवा X च्या डावीकडे लिहिलेले असते तेव्हा त्या I ची किंमत X किंवा V च्या किमतीतून वजा केली जाते. परंतु I हे अक्षर एकापेक्षा जास्त वेळा V किंवा Xच्या आधी वापरता येत नाही. उदाहरणार्थ, 8 ही संख्या रोमन अंकात IIX ऐवजी VIII अशा प्रकारे लिहिली जाते!

रोमन संख्यापद्धत आणि दशमान संख्यापद्धत

I = 1, V = 5, X = 10, L = 50, C = 100, D = 500, M = 1,000

रोमन संख्यात शून्य नसतो. साहजिकच, मोठ्या संख्या रोमनमध्ये लिहिणे अवघड असते. कारण एकतर त्यांच्यात खूप अक्षरे असतात आणि ती समजून घ्यायला वेळ लागतो. रोमन संख्येत अंकांना त्यांच्या स्थानानुसार किंमत नसते. त्यामुळे त्यांची आकडेमोड करताना खूप अडचणी निर्माण होतात. या सर्व कारणांमुळे जसजसा अरबांच्या माध्यमातून शून्याचा जगभर प्रसार झाला, तसतशा रोमन संख्या केवळ शास्त्र म्हणून शिल्लक राहिल्या आणि गणितातील त्यांची भूमिका काही अपवाद वगळता समाप्त झाली.

स्वतंत्रपणे काहीही किंमत नसणाऱ्या शून्याने एक संख्यापद्धत कालबाह्य ठरवली!!

 

लेखक : सौरभ पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required