computer

शोधसूत्र: भाग १ गुजरात पाकिस्तान सीमा

फॅमिली मॅन सारख्या मालीका बघताना मनात एक विचार घोळत असतो तो असा की खरोखर अशा पेट्या भरभरून शस्त्रं कशी आणत असतील?? विमानाचे सुटे भाग करून ते परत जोडणं ही फक्त कल्पना आहे की खरंच तसं घडतं? एकाचवेळी दोन अतिरेकी गट एकत्र येतात का? किडनॅपींग करून हवं ते साध्य करण्याचा प्रयत्न अतिरेकी कसे करतात? या सर्व प्रश्नांचे उत्तर असे आहे की होय, हे सगळे असेच चालत असते. आपण या बातम्या तुकड्यांत वाचत असतो. या बातम्या जोडल्या तर वर्षभरात तुम्हीही सहज फॅमिली मॅनसारखे कथानक लिहू शकाल.

आज जी सत्यकथा तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत त्यातही असेच घडले आहे. सरहद्दीच्या पलीकडून येणारा शस्त्रांचा साठा - कलकत्यातील एका धनिकाचे अपहरण- आणि त्यातून मिळालेल्या पैशाचा ९/११ हल्ल्यासोबत असलेला थेट संबंध-कलकत्त्यातल्या अमेरीकन वकिलातीवर हल्ला -आणि शेवटी यामागे असलेल्या सूत्रधाराचा आखातीदेशातून मिळवलेला ताबा - हे सगळे एकत्र सांगणारी ही कथा आहे. कथेची सुरुवात होते पाकीस्तानलगत असलेल्या गुजरातच्या सरहद्दीपासून!
प्रत्येक गुन्हेगारीच्या प्रकरणात एक साखळी असते. या साखळीचा दुहेरी उपयोग असतो. जर गुन्हा उघडकीस आला तर बर्‍याच वेळा मुद्देमाल जप्त होण्यापलीकडे नुकसान होत नाही. दुसरा फायदा असा की गुन्ह्यामागे असलेल्या सूत्रधाराला गायब होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. अर्थातच या कारणांचा पुरेपूर अभ्यास शोध करणार्‍या एजन्सीने केलेला असतो. त्यांच्याकडेही यावर उतारा उपलब्ध असतो.

अशा प्रकारच्या तस्करीवर नजर ठेवणारी पथके 'कंट्रोल्ड डिलिव्हरी'चे तंत्र नेहेमी वापरतात. या तंत्रात तस्करी करणार्‍या छोट्या गुन्हेगारांकडे बर्‍याच वेळा मुद्दाम दुर्लक्ष केले जाते किंवा दुर्लक्ष केले आहे असे दाखवले जाते. त्या छोट्या गुन्हेगारांना पकडण्यात फायदा नसतो. ते केवळ हमाल असतात. 'सरफरोश'मधल्या मिर्चीसेठ सारख्या त्यांच्या दलालांनाही ताबडतोब पकडून फायदा नसतो. पण त्यांच्यावर नजर ठेवून कोणते प्यादे उपयोगाचे आहे ते ठरवले जाते. त्याला मुद्देमालासह पकडले जाते, त्याला फितवले जाते, माहिती काढून घेतली जाते आणि त्याला अभय देण्याचे वचन दिले जाते. काही दिवसांतच हे 'खबरी' पडद्यामागे असलेल्या सूत्रधारांचा पत्ता देतात. आणि त्यानंतर थेट शह देऊन 'चेकमेट' केली जाते.

२६/२७ ऑक्टोबर २०००च्या त्या रात्री पाकीस्तानच्या सीमेलगतच्या गुजरातच्या भागावर बीएसएफ (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) आणि सीबीआयचे अधिकारी यांची एकत्र टेहळणी चालू होती. सीबीआय बर्‍याच वेळा अशा अनेक वेगवेगळ्या खात्यांसोबत काम करत असते. पाकिस्तातून एक मोठी 'कन्साइनमेंट' येण्याची खबर मिळून बरेच दिवस झाले होते, पण या बरेच पाळत ठेवूनही हाती काही लागत नव्हते. त्या दिवशी रात्री १.३० वाजता NH-15 च्या संतलपूर गावाजवळ हॉटेल नागराजसमोर खबर मिळालेला ट्रक या पथकाला दिसला. डीएसपी साहानी -सीबीआयचे सहा अधिकारी आणि बीएसएफचे जवान वेगवेगळ्या दिशांनी अंधारातून त्या ट्रककडे निघाले. ट्रकमधल्या माणसांना त्यांची चाहूल लागली आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. सीबीआय आणि बीएसएफच्या अधिकार्‍यांनी गोळीबाराचे प्रत्युत्तर दिले, पण तोपर्यंत ट्रक सुरु होऊन भरधाव वेगाने निघालाही होता. दोन जीपमधून त्यांच्या पाठलागावर निघालेल्या अधिकार्‍यांना त्या ट्रकला गाठण्यात यश आले, पण पुन्हा एकदा त्या गुन्हेगारांनी चकवा दिला. अंधाराचा फायदा घेऊन ट्रकमधून चार माणसांनी उडी मारून शेतातून पळ काढला. त्यांच्या पाठोपाठ भारतीय पथक धावत होते. एखाद्या हिंदी चित्रपटात दाखवतात तसा पाठलाग सुरु होता. पण ती माणसं दिसेनाशीच झाली. निराश झालेले सीबीआयचे अधिकारी मागे फिरले. आता सोडून दिलेला ट्रक ताब्यात घेणं इतकंच काम बाकी होतं. ट्रकची झडती घेतल्यावर त्यातून दोन एके-५६, पिस्तुलं आणि अनेक अतिरेकी हल्ले करता येतील इतका दारुगोळा सापडला. दारुगोळा आणि हत्यारं जप्त करणं हा या मोहिमेचा उद्देश नव्हता. गुन्हेगार हातातून निसटलेच होते. पण नशिबाने हात दिला, पलायनाच्या गडबडीत ट्रकचे कागदपत्रं -फोन नंबर असलेली एक डायरी आणि अनेक वेगवेगळे मोबाईल नंबर लिहिलेल्या चिठ्ठ्या तशाच राहिल्या होत्या. ट्रकचा मालक होता अलवार -राजस्थानचा युनुस खान. गुन्हेगार पळाले होते, पण शोधाची साखळी जोडता येईल इतका पुरावा हातात होता. युनुस खान- तपासाच्या साखळीची पहिली कडी हातात आली होती. आता दुसरी कडी शोधायची होती.

 

दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत सापडलेल्या मोबाईलच्या सर्व कॉल्सची तपासणी पूर्ण झाली होती. त्या सर्व नंबरवर दिल्लीच्या एका नंबरवरून बरेच कॉल आले होते. हा नंबर होता एका इस्टेट एजंटचा. इस्टेट एजंटच्या ऑफीसला पोहचायला सीबीआयला फारसा वेळ लागला नाही. इस्टेट एजंटनी डायरीत असलेल्या त्या नंबरवर फोन केल्याचं लगेच कबूल केलं. तो नंबर होता अशबुद्दीन खानचा. या खानाने या दलालामार्फत दिल्लीत एक प्लॉट घेतला होता. चांगली बातमी अशी होती की येत्या दोन दिवसात अशबुद्दीन खान इस्टेट एजंटच्या ऑफीसात येणार होता. पुढच्या चार दिवसांत अपेक्षेप्रमाणे अशबुद्दीन खान आणखी एका माणसासोबत एजंटच्या ऑफीसात पोहचलाच. ऑफीसात तळ ठो़ऊन बसलेल्या सीबीआयच्या अधिकार्‍यांच्या हातात अशबुद्दीन खान सापडला. सोबत असलेला दुसरा माणूस म्हणजे एक बोनस होता. त्याचं नाव होतं अब्दुल सुभान! अब्दुल सुभान म्हणजे त्या रात्री हायवेवरून गुंगार्‍या देणार्‍या चार पैकी एक - त्या ट्रकचा ड्रायव्हर! काहीवेळा अपेक्षेपलीकडे जाऊन नशिब साथ देतं- ते दोघं ज्या मारुती कारने आली होती ती कार कलकत्त्याच्या खादीम शूजच्या मालकाला- पार्थ प्रतिम रॉयला किडनॅप करायला वापरण्यात आली होती . आता हे काय प्रकरण आहे ते नंतर बघूच. सीबीआय साखळीच्या दुसर्‍या कडीपर्यंत पोहचली होती.

हा लेख तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पण बघू शकता.सोबत दिलेली लिंक वापरा

 

हा लेख तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पण बघू शकता.

सबस्क्राईब करा

* indicates required