computer

जगभरात चर्चा असलेले आयर्न डोम आहे तरी काय? ते कसे काम करते? त्याचे वैशिष्ट्य काय?

Subscribe to Bobhata

सध्या जगात दोन देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इस्राईल आणि पॅलेस्टाइन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु झालं आहे. या युद्धातल्या बॉम्ब वर्षावाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. जसे भारत पाकिस्तान तसेच इस्राईल आणि पॅलेस्टाईन हे दोन देश मानले जातात. अनेक वर्षांपासून या देशांमध्ये भांडण सुरु आहे. या भांडणावर अनेक पुस्तके, डॉक्युमेंटरीज, फिल्म्स आल्या. तो वेगळा लेखाचाच विषय आहे.

आजच्या लेखाचा विषय सध्या सुरु असलेल्या युद्ध्यावर आहे.

इस्राईल हा तसा छोटासा देश १९५० च्या कालखंडात अस्तित्वात आला. पण अल्पावधीतच तंत्रज्ञान प्रगतीच्या जोरावर जगात वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. सध्या इस्राईलच्या तांत्रिक प्रगतीची प्रचिती पूर्ण जग घेत आहे. इस्राईलने आपल्या शहरांभोवती उभे केलेले आयर्न डोम हे याचेच उदाहरण आहे. अनेकांना या आयर्न डोमबद्दल कुतूहल लागून राहिले आहे. की बुवा हे नेमके आहे काय ज्यामुळे आकाशातल्या आकाशात मिसाईल्स रोखल्या जातात. तर आज आम्ही या आयर्न डोमची सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहोत.

सोप्या शब्दात सांगायचे तर जसे तलवारीचा वार रोखण्यासाठी ढालीचा उपयोग होतो तसेच आकाशातून मारा करणाऱ्या मिसाईल्सना रोखण्यासाठी आयर्न डोमचा वापर केला जातो. आयर्न डोम ही लहान टप्प्याची जमिनीवरून आकाशपर्यंत संरक्षण करणारी पद्धत आहे. या बहुउद्देशी सिस्टीमच्या वापराने रॉकेट, मोर्टार, मोठमोठे गोळे एवढेच काय ताकदवर विमाने, हेलिकॉप्टर तसेच यूएव्हीला दुरूनच निशाणा बनवून उडवता येते.

आयर्न डोम एक मोबाईल डिफेन्स सिस्टीम आहे. ही एक अशी प्रणाली आहे जिथे अनेक इक्युपमेंट्स एकाचवेळी काम करतात. जेव्हा हल्ला होतो तेव्हा कोणती मिसाईल कुठल्या दिशेने येणार आहे याची माहिती यातल्या रडारला होते. याच दरम्यान याच्या वेगाची आणि मार्गाची माहिती कंट्रोल सेंटरकडे पाठवली जाते. एवढेच नाही तर जे मिसाईल आयर्न डोममुळे उडविण्यात येते ते कुठे पडेल याची देखील चौकशी याद्वारे केली जाते. जर मिसाईल नको त्या जागी पडणार असेल तर रडारकडून मिळत असणारे संदेश ओळखून त्या मिसाईलचा पाठलाग केला जातो. यावरून तुम्हाला कळलेच असेल की आयर्न डोम किती प्रगत आहे

यात त्यांनी वापरलेली डोक्यालिटी अशी की जेव्हा समोरून एखादी मिसाईल येत असल्याची माहिती मिळते तेव्हा त्या दिशेने आपली मिसाईल सोडायची आणि ती बरोबर समोरच्या मिसाईलजवळ पोहोचून स्वतःहून फुटते. असे केल्याने शत्रूचे नुकसान देखील होते आणि ते आपल्याला वाटेल त्या ठिकाणी पाडता येते. इस्राईल आयर्न डोमच्या माध्यमातून स्वतःला सोयीस्कर अशा ठिकाणी युद्ध घेऊन जाण्यास यशस्वी होत आहे.

आयर्न डोमच्या माध्यमाने आधी निशाणा कोणत्या ठिकाणी लावायचा आणि कोणत्या वेळी लावायचा हे ठरविण्यात येते. एकदा सर्व ठरले की जिथे हे सर्व प्रकार घडणार असतात तिथे सायरन वाजवून सर्व लोकांना कल्पना दिली जाते. ती जागा पूर्ण खाली झाली की मग आयर्न डोम मिशन फत्ते करण्यासाठी मिसाईल सोडते. असे असले तरी आयर्न डोमचे टीकाकार सांगतात की या सर्व नादात ज्या चूका होतात त्यामुळे इस्राईल आपल्या नागरिकांच्या जीवाचे देखील मोल मोजत असते. आयर्न डोमचे काम हे युद्धभूमीवर नसून रहदारीच्या भागात असते. आजवर अशा भागात बचावाचे धोरण अवलंबिले जात असे. पण त्यात देखील इस्राईलने आक्रमक यंत्रणा तयार करून दाखवली आहे.

विशेष गोष्ट म्हणजे आयर्न डोम कोणत्याही वातावरणात तसेच दिवस आणि रात्रीही कार्यरत राहू शकते. इस्राईलकडे फक्त आयर्न डोम आहे अशातला भाग नाही. इस्राईल हा देश जगाला शस्त्रास्त्रे पुरवतो म्हणजे या खेळातील तो मोठा खेळाडू आहे. अशावेळी तो स्वतःच्या मैदानावरील खेळ जास्तच शिताफीने खेळणार यात वाद नाही. त्यांच्याकडे सी डोम म्हणून सागरी सीमा संरक्षित करणारी प्रणाली देखील आहे. तसेच आय डोम हे यांत्रिक शस्त्रांना संरक्षण पुरवणारे मोबाईल व्हर्जन देखील त्यांच्याकडे आहे.

२००६ साली झालेल्या इस्राईल लेबनॉन युध्दावेळी अशी प्रणाली आपल्याकडे असायला हवी असे इस्राईलला वाटायला लागले. हा देश लागलीच कामाला देखील लागला. २०११ पर्यंत त्यांनी इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्री आणि राफेल ऍडवान्स्ड डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने त्यांनी आयर्न डोम तयार करून दाखवले. 

हे आयर्न डोम जवळपास ९० टक्के प्रभावी आहे असा दावा इस्राईलचा आहे. आजवर हजारो रॉकेट आणि मिसाईल्स या आयर्न डोमने रोखल्याने इस्राईलसाठी ही शब्दशः सर्वात मोठी ढाल आहे असे म्हणायला जागा आहे.  पॅलेस्टाईनच्या गाजा पट्टीतून सोडण्यात येणारे सर्व प्रकारचे हवेतले शस्त्रास्त्र रोखण्यात हे आयर्न डोम यशस्वी ठरले असल्याने जगभर याची चर्चा सुरू झाली आहे. जगभर अनेक देश आता ही प्रणाली विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याची देखील शक्यता आहे.

कसा वाटला हा लेख? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा !! 

सबस्क्राईब करा

* indicates required