या चित्रकाराने ८० वर्षांपूर्वीच चितारला मोबाईल, तुम्हांला काय वाटतं?

प्रत्येक चित्रात एक गोष्ट लपलेली असते. अर्थात आपल्याला प्रत्येक चित्र काही कळत नाही ते सोडा.. पण माणसं, प्राणी, पक्षी आणि एखादा प्रसंग चितारला असेल तर किमान त्या चित्रकाराला काय म्हणायचंय हे थोडं तरी कळतं. 
तर आता ८० वर्षं जुनं चित्र सोशल मिडियावर फिरतंय आणि ते चांगलंच चर्चेत आहे. या चित्रात आहेत नेटिव्ह अमेरिकन्स आणि प्रत्येक व्यक्ती वेगळ्याच पोजमध्ये दिसतेय. या चित्राचं नांव आहे, "Mr Pynchon and the Settling of Springfield". हे पेंटिंग १९३७ मधलं आणि ते चितारलंय आहे इटलीचे ख्यातनाम चित्रकार उम्बेर्तो रोमानो यांनी.  या पेंटिंगमधल्या एका अमेरिकन आदिवासी मनुष्याच्या हाती असलेली गोष्ट सगळ्यांचं लक्ष्य वेधून घेतेय. 

आता तुम्हांआम्हांलाही माहित आहे की १९३७मध्ये काही मोबाईल फोन्स नव्हते तर मग स्मार्टफोन्स असण्याचा तर काहीच संभव नाही. तरीदेखील या चित्रकारानं तब्बल ८० वर्षं आधी या गोष्टीची कल्पना कशी काय केली असेल याबद्दल भलतंच आश्चर्य वाटतंय. 

 

स्रोत

 

बरं हा मनुष्य कुतूहलाने या भलत्याच माहित नसलेल्या गोष्टीकडे पाहातोय असंही वाटत नाही. त्याची देहबोली पाहा. तो अगदी सहजपणे मोबाईलकडे पाहातोय. म्हणजे आपण कुणाची वाट पाहात असताना सहज फोन चेक करतो ना, तसं.

ही गोष्ट पहिल्यांदा वॉईस या ऑनलाईन नियतकालिकाचे लेखक ब्रायन अँडरसन यांच्या लक्षात आली. त्यांनी म्हटलं, "हा मनुष्य कोण आहे हे कळत नसलं तरी त्याच्याकडे पाहून असं वाटतंय की तो सेल्फी घ्यायचा प्रयत्न करतोय किंवा तो त्याची फेसबुकवर नवीन काय आलंय ते पाहात असेल. आजच्या काळात हे यंत्र इतकं सर्वसाधारण झालंय आणि त्याच्या देहबोलीकडे पाहून असंच वाटतं आहे की अगदी निवांत आहे, फोन त्याला काही कुतूहलाची गोष्ट वाटतेय असं जराही वाटत नाही. जणू काही त्यानं पकाऊ ट्वीट वाचलंय किंवा बोअर होऊन फोनवर गेम खेळतोय किंवा तो कदाचित इंटरनेट सर्फिंगही करत असू शकेल असं त्याच्याकडे पाहून वाटत आहे."

तुम्हांला काय वाटतं या माणसाच्या हातात काय आहे आणि तो काय करत आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required