computer

५५० हेक्टर खडकाळ जमीन जंगलात रूपांतरित करणारा भारताचा 'फॉरेस्ट मॅन' !!

सगळ्यांना हिरव्यागार निसर्गाची आवड असते. शहरातले लोक तर हा अनुभव घेण्यासाठी बऱ्याच लांबवर फिरायला जातात. बरेच जण आपआपल्या घरात खिडकीत किंवा गच्चीवर कुंडीत रोपं लावून आपली हौस भागवून घेतात. एकटा माणूस अशी किती रोपं लावणार किंवा जगवणार? असं वाटत असेल तर आज एका  जंगल निर्माण करणाऱ्या अवलियाची कहाणी अगदी जरूर वाचा. त्याने काही थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ५५० हेक्टर खडकाळ जमीन जंगलात रूपांतरित केली आहे.

आसाममधल्या जोरहाट जिल्ह्यातल्या जादव मुलाई पायेंग यांची ही सत्यकथा आहे. जादव मुलाई पायेंग हे पद्मश्री पुरस्कार विजेते पर्यावरण कार्यकर्ते आहेत. आज त्यांचं वय ६२ वर्षे आहे. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी झाडे लावणे सुरू केले. जोरहाट येथे १९७९ मध्ये ब्रम्हपुत्रेला आलेल्या पुरामुळे मेलेल्या सापांना बघून त्यांनी तेथे झाडे लावण्याचा निर्धार केला. या बालुकादांडावर त्यांनी सुमारे १३६० एकर म्हणजे अंदाजे ५५० हेक्टर जमिनीवर एकट्याने, कुणाची मदत न घेता, अनेक झाडे लावली. त्याच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज या जंगलात हरिण, हत्ती, माकड, वाघ, गेंडे, गवे, ससे, गिधाडं असे अनेक प्रकारचे पक्षी-प्राणी राहतात.

ब्रह्मपुत्रेला जेव्हा प्रचंड पूर आला तेव्हा अतोनात नुकसान झालं. तिथे त्यांना किनाऱ्यावर जिकडेतिकडे मेलेल्या सापांचे असंख्य सांगाडे पडलेले दिसले. पुराबरोबर वाहत आलेले ते साप होते. एकही झाड नसल्याने शिवाय रणरणतं ऊन असल्यामुळे ते साप मृत्युमुखी पडले होते. अवघ्या १६ वर्षीय जादव यांना ते बघवलं नाही. आपलीही परिस्थिती अशीच होऊ शकते याचा विचार करून त्यांना रडू कोसळलं. अनेक गावातल्या लोकांना त्यांनी विचारलं तेव्हा त्यांना समजलं की एकही झाड नसल्याने ही अवस्था झाली. ती वाळू असलेली जमीन असल्याने काहीच उगवत नव्हतं. शेवटी कोणीतरी त्यांना बांबूची रोपं दिली. जादव यांनी त्या रोपांची खूप काळजी घेतली आणि ती रोपं खूप जोमात वाढू लागली. मग जादवनं सर्व भाग हिरवा करण्याचं स्वप्न पाहिलं. त्यांना त्यांचं ध्येय सापडलं.

मुलाई पायेंग यांनी १९७९ मध्येच आसामच्या जंगल खात्यानं अरुणा शापोरीतल्या पाचशे एकर जागेवर जंगल उभारणी करण्याचं ठरवलं. त्यासाठी जादव एक मजूर म्हणून काम करत होते. काही काळानंतर हे काम मध्येच बंद पडलं व सर्व मजूर शहराकडे निघून गेले. एकटे जादव मात्र मागेच राहिले व या निर्जन, ओसाड भागात झाडं लावण्याचं काम एकहाती करू लागले. तेही दररोज न कंटाळता आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता ते हे काम करत राहिले. या जंगलाला 'मुलई (जादव यांनी दिलेलं नाव) कथोनी' (म्हणजे जंगल) किंवा मोला फॉरेस्ट म्हणतात. सुंदरबन बघायला येणा-या पर्यटकांसाठीही 'मुलई कथोनी' हे 'हॅपनींग डेस्टीनेशन' बनलं. ब्रिटिश डॉक्युमेन्ट्रीकार टॉम रॉबर्ट याने या जंगलात काही काळ राहून एक अप्रतिम माहितीपटही बनवला. त्यामाध्यमातून मुलाई यांच नाव आणि कार्य जगभर माहित झालं. बाहेर देशातल्या एनजीओ आणि जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग सरकारनेही मुलाईच्या कार्याची दखल घेत त्यांनी त्याचा गौरव केला.

दरवर्षी अनेक हत्ती मोलाई फॉरेस्टमध्ये येतात व सहा महिन्यांसाठी तेथे मुक्काम करतात.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं २०१२ मध्ये जादव यांचा सत्कार केला व त्यांना ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ हा पुरस्कार दिला. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनीही जादव यांचा सत्कार केला.

जादव आजही आपल्या कुटुंबीयांसमवेत मजुली बेटावरच राहतात. पत्नी बिनीता, दोन मुलगे व एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. घरातले सर्व जण त्यांना त्यांच्या कार्यात मनापासून मदत करतात. जादव यांच्याकडे पन्नासेक गाई, म्हशी आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसायातून येणाऱ्या पैशांवर जादव यांचा चरितार्थ चालतो. त्यांनी लावलेल्या जंगलात अनेक आयुर्वेदिक औषधी आहेत. जंगलात त्यांनी हत्तींसाठी, दुसरं गेंडय़ांसाठी व तिसरं गाई, म्हशी व इतर प्राण्यांसाठी तीन प्रकारच्या गवतांची लागवड केली आहे.  एकदा कुणी तरी सांगितलं की, लाल मुंग्यांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. झालं, लगेचच ते एका खेडय़ात गेले व तिथून भरपूर लाल मुंग्या अरुणा शापोरीवर आणल्या. हे करताना त्यांना इतक्या मुंग्या चावल्या की त्या वेदना त्यांनी हसत हसत सहन केल्या.

गेले ४५ वर्ष त्यांचं हे अभूतपूर्व कार्य अविरत चालू आहे. त्यांचं कुटुंब ही यात सामिल झालं आहे. या फॉरेस्ट मॅन ला बोभाटाचा सलाम.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required