मुंबईचा दानशूर कर्ण -  ‘जेजे हॉस्पिटल’ला ज्यांचं नाव दिलंय असे सर जमशेटजी जीजीभॉय !!

इसवीसनाच्या १८६८ च्या दरम्यान पारशी मुंबईत आले. मुंबई तेव्हा आजच्या मुंबई सारखी एकसलग नव्हती सात वेगवेगळ्या बेटात विभागलेली होती. ‘खर्सेटजी पोचाजी पांडे’ या गृहस्थांचा पहिला उल्लेख पोर्तुगीजांच्या इतिहासात सापडतो. त्यानंतरच्याच काळात मुंबई ब्रिटिशांना आंदण म्हणून मिळाली आणि पारशी व्यापाऱ्यांची येजा मुंबईत वाढत गेली. मुंबईत स्थाईक होणाऱ्या पहिल्या काही जणांमध्ये दोराबजी नानाभाई या पारशी गृहस्थाचं नाव आढळतं.

ब्रिटीशांना त्यावेळी भारतातली भाषा, परंपरा, चालीरीती याची माहिती नसल्यामुळे दोराबजी नानाभाई यांची मदत ब्रिटिशांना लागायची. १६९२ साली मुंबईत प्लेगची साथ आली आणि इस्ट इंडिया कंपनीचे बरेचसे सैनिक त्यात मरण पावले. या संधीचा फायदा घेऊन जंजिऱ्याच्या सिद्धीने मुंबईवर आक्रमण केले आणि डोंगरीचा किल्ला ताब्यात घेतला. रुस्तुमजी दोराबजी नावाच्या एका पारशाने स्थानिक कोळी लोकांची पलटण तयार करून सिद्धीचा पराभव केला आणि मुंबई पुन्हा ताब्यात घेतली. यानंतर दळणवळण, अन्नामालाचा पुरवठा, बांधकामासाठी मजूर पुरवणे, आणि नंतरच्या काळात मद्यविक्री करणे हेच प्रमुख व्यवसाय पारशी कंत्राटदारांचे होते.

आजची जी शानदार मुंबई आपल्याला दिसते त्यामध्ये पारशी दानशूर व्यापाऱ्यांचा मोठा हिस्सा आहे. या दानशूर लोकांपैकी सगळ्यात मोठे नाव म्हणजे जमशेटजी जीजीभॉय यांचे ! वयाच्या १६ व्या वर्षी हे गृहस्थ चीनला चार वाऱ्या करून आले होते. यापैकी एका सफरीत फ्रेंच सैनिकांनी त्यांना अटक करून आफ्रिकेत बंदी पण बनवले होते. अशा वेगवेगळ्या संकटांना तोंड देत त्यांनी जो व्यापार केला त्यातली बहुतांशी रक्कम अनेक लोकोपयोगी कामांसाठी खर्च केले.

स्रोत

आज आपण ज्याला माहीम कॉजवे म्हणतो तो रस्ता दोन बेटे जोडणारा आहे. हा रस्ता त्यांनी स्वतःच्या खर्चाने बांधला.

आज आपण ज्याला आझाद मैदान म्हणतो ती जागा म्हणजे गुरचरण होती. ब्रिटिशांनी या गुरचरणीचा कर आकारायला सुरुवात केल्यावर गुराख्यांना ती रक्कम भरणे परवडेनासे झाले. जमशेटजी जीजीभॉय यांनी गिरगावच्या जवळ एका मैदानात गुरचरणीची मोफत व्यवस्था करून दिली. आपण ज्याला चर्नी रोड स्टेशन म्हणतो ते नाव या गुरचरणीवरूनच आलेले आहे.

स्रोत

१८४९ साली नेटिव्ह लोकांना म्हणजे आपल्या भारतीयांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शाळा सुरु केली जी आजही कार्यरत आहे.

मुंबईला सगळ्यात मोठी देणगी जर त्यांनी दिली असेल तर ती म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे. जगन्नाथ शंकरशेठ यांना सोबत घेऊन त्यांनी ‘ग्रेट इंडियन पेनेन्शुला’ ही रेल्वे कंपनी स्थापन केली. त्यावेळी ज्याला आपण आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणतो त्या स्टेशनचे नाव बोरीबंदर होते. १८५३ साली मुंबई ते ठाणे ही पहिली आगगाडी इथूनच सुटली.

स्रोत

याच स्टेशनच्या समोर ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट्स’ आहे. या कालाम्हाविद्यालयाला १ लाख रुपयांची देणगी  जमशेटजी जीजीभॉय यांनी दिली.

स्रोत

भायखळ्याच्या राणीबागेजवळ डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय उभारण्यात जमशेटजी जीजीभॉय, डेव्हिड ससून आणि जगन्नाथ शंकरशेठ या तिघांचा मोठा आर्थिक सहभाग होता.

स्रोत

आज आपण ज्याला ‘जेजे हॉस्पिटल’ म्हणून ओळखतो ते सुद्धा जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीतून उभे राहिलेले आहे.

स्रोत

बेलासिस रोड भायखळा येथे १,४५,००० रुपये खर्च करून गरिबांसाठी एक धर्मशाळा उभारली जी आजही कार्यरत असून आशिया खंडातील सगळ्यात मोठा मोफत वृद्धाश्रम म्हणून ओळखला जातो. याखेरीज मुंबई, नौसरी, सुरत पुणे येथे अनेक विहिरी, तलाव, पूल त्यांच्या खर्चांनी बांधण्यात आले.

त्यांच्या एकूण आयुष्यकाळात १२६ लोकोपयोगी उपक्रमांना त्यांनी मदत केली जी त्याकाळात २,३०,००० पाऊंड इतकी होती.

पारशी म्हणजे दानशूर हा पायंडा त्यांनी घातला.

 

आणखी वाचा :

हिंदी सिनेमे आणि पारसी कनेक्शन...तुमचा यातला आवडता सिनेमा कोणता ?

सबस्क्राईब करा

* indicates required