computer

अवघ्या १४व्या वयात १०-१२ वी पास करणारी, १४ भाषा अवगत असणारी ही वंडर गर्ल आहे तरी कोण ??

Subscribe to Bobhata

एका छोट्याशा खेड्यातील मुलगी सध्या भल्याभल्यांना चकित करत आहे. एवढ्याशा  वयात या चिमुरडीने मोठी कमाल केली आहे. मंडळी, तुम्ही कधी असे ऐकले आहे का भारतातल्या एखाद्याचे इंग्रजी ऐकून साक्षात इंग्रजांचे तोंड बंद झाले आहे? ही पोरगी जेव्हा इंग्लिश बोलायला लागते तेव्हा इंग्रज सुद्धा डोळे फाडून बघत असतात आणि केवळ इंग्लिश नाही तर ही पोरगी तब्बल १४ भाषा बोलते !! 

हरियाणाच्या मालपूर नावाच्या गावात राहणारी १४ वर्षाची जान्हवी पनवार तब्बल १४ भाषा बोलते. सध्या सोशल मीडियावर जान्हवी सेन्सेशन आहे. तिला सोशल मीडियावर 'वंडर गर्ल' म्हणून ओळखले जात आहे.

मंडळी, या पोरीने फक्त १३ वर्षाच्या वयात १२ वी पास केली आहे. हरियानवी, इंग्लिश, फ्रेंच, जपानी आणि अजून अशा अनेक भाषा ती सहज बोलते. नुसती बोलत नाही, तर थेट त्या ॲक्सेंटमध्ये बोलते.  फक्त १४ वर्षाची ही वंडर गर्ल आतापर्यंत ८ राज्यांतल्या १२ आयएएस अधिकाऱ्यांना व्याख्यान देऊन आली आहे. फक्त एका वर्षात तीने १० वी आणि १२ वी दोन्ही इयत्ता पास केल्या आहेत.

जान्हवी एवढी हुशार कशी झाली?

हा प्रश्न सगळ्यांना पडतो आणि साहजिक आहे. तर जान्हवीचे वडील तिला लहानपणापासून इंग्लिश शिकवत होते. प्राथमिक शिक्षक असलेले बृहमोहन पनवार यांना आपल्या मुलीने खूप शिकावे असे वाटत होते. म्हणुन त्यांनी तिला घरातच शिकवायला सुरुवात केली. भाज्यांची नावे, फळांची नावे पाठ करणे अशी तिची सुरुवात होती. नंतर ती घरी आलेल्या लोकांसोबत इंग्लिश बोलत होती. हळूहळू ती इंग्लिश व्यवस्थित शिकली.

ती म्हणते, "लोक म्हणाले, इंज्रजी शिकली. त्यात काय एवढं?" हे तिनं एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि ती इतरही भाषा शिकत गेली. त्यासाठी तिनं युट्यूबवर वेगवेगळ्या भाषेतल्या क्लिप्स पाह्यल्या आणि त्यातून ती हळूहळू करत एकेक भाषा शिकली. पुढे जाऊन आयएएस व्हायचे तिचे स्वप्न आहे. सध्या ती मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ठिकठिकाणी व्याख्याने देते..

लेखक : वैभव पाटील