computer

हिरा कामगार, शिपाई ते चार वेबसाईट तयार करून चालवणारा युवक!! ही प्रेरणादायी गोष्ट तुम्ही वाचलीच पाहिजे..

आपल्या प्रत्येकाला कुठल्याना कुठल्या गोष्टीबद्दल प्रचंड उत्सुकता असते. ते शिकण्याची,  त्यात काहीतरी नवनिर्मिती करायची प्रेरणा असते. काहीजण त्यात यशस्वी होतात तर काही अर्ध्यावर हिंमत हरतात. आज बोभाटाचा एक वाचक घेऊन आलाय अशाच एका हिंमत न हरलेल्या तरुणाची गोष्ट! शून्यातून या मुलाने त्याचं पूर्ण विश्व कसं उभं केलं हे वाचताना तुम्हांलाही यातून नक्कीच प्रेरणा मिळेल! ही गोष्ट आहे नंदुरबार जिल्हयातल्या ध्येयवेडा तरुणाची- मनोज पाटीलची! 

तर,या तरुणाला  कॉम्प्युटरचे प्रचंड आकर्षण होते. पण दुर्दैवाने त्याच्या घरी कॉम्प्युटर घेण्याएवढीही परिस्थिती नव्हती. परिस्थितीच्या रेटयामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्याच्या आजूबाजूला तेव्हा घरच्यांना हातभार लावायचा असेल तर सर्वात चांगला पर्याय हा सुरतला हिऱ्यांच्या कारखान्यात जाणे हा समजला जायचा. अर्थातच मग  हा मुलगाही  सुरतेला हिरा कारखान्यात गेला. खरंतर हिऱ्यांच्या कारखान्यात काम करत असलेला तरुण आणि कॉम्प्युटर म्हणजे दोन विरुद्ध टोकं!!  पण  म्हणतात ना,  इच्छा तेथे मार्ग!  मनोजला नंतर एका शाळेत शिपाई म्हणून नोकरी लागली. शाळेतच नोकरी लागल्याने तिथे कॉम्प्युटर्स होते. तिथे याने  फावल्या वेळेत जेवढे शिकता येईल तेवढे कॉम्प्युटर शिकुन घेतले आणि एकवेळ अशी आली की जी कामं तिथल्या कॉम्पुटर ऑपरेटर्सना जमायची नाहीत,  ते हा पठ्ठ्या करुन द्यायला लागला.

मनोजच्या या कष्टाचे चीज झाले आणि  प्रभावित होऊन संस्था चालकांनी त्याची बढती क्लर्क म्हणून केली.  पूर्वी पैशांअभावी मनोजला काँप्युटर घेता आला नव्हता आणि आता नोकरीमुळे  काँप्युटर पूर्णवेळ त्याच्या  हातात आला होता. दिवसभर शाळेचे काम करुन झाल्यावर मनोज बराच वेळ कॉम्पुटरवर नवीन काही शिकत असे. तो इतरांची बरीच अडकलेली कामे मग सहजपणे करून द्यायचा. त्यानंतर मग संस्थेत सगळीकडे कॉम्पुटर तज्ञ म्हणुन त्याची ख्याती झाली.

मुळातच चळवळ्या स्वभाव असल्याने तेच तेच काम करून मनोज बोर व्हायचा आणि नवीन काहीतरी करता येतं का यासाठी धपपड करत राहायचा. अशातच तो क्लर्क असल्याने विद्यार्थी आणि पालक वारंवार ॲडमिशन, स्कॉलरशिप वगैरेसाठी नेहमी त्याला प्रश्न विचारत असत. यातूनच मनोजला अशा सगळ्या कामासाठी  एक स्वतंत्र शिक्षणविषयक वेबसाईट तयार करण्याची कल्पना आली. पण ते कसे काय करायचे याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हती. मग हा पठ्ठ्या परत शोधमार्गाला लागला.  निरंतरपणे त्याने स्वतःला त्यात झोकुन देऊन शेवटी कुणाचीही मदत न घेता कुठलेही प्रशिक्षण न घेता वेबसाईट डेव्हलप करून टाकली.

२०१७ च्या मध्यावर सुरू झालेली hindimepadhe.com ही वेबसाइट आज तुम्ही कुठल्याही स्कॉलरशिप, वेगवेगळ्या विद्याशाखांच्या प्रवेशासाठी गुगल केली की सर्वात आधी वर येते. हॉलतिकीट, परीक्षांची माहिती,निकाल वगैरे सगळी माहिती त्या वेबसाईटवर मिळते.  दिवसेंदिवस त्या वेबसाईटचा पसारा वाढत गेला. काही दिवसांनी मनोनच्या लक्षात आले की ह्याच प्रकारची शैक्षणिक माहिती इंग्लिशमध्ये दिली तर आणखी जास्त लोकांना याचा फायदा होईल. पण त्याला  इंग्लिशच मुळात येत नव्हतं. त्यातच वेबसाईट आणि जॉबच्या कामातून वेळ काढून इंग्लिशचं शिवधनुष्य त्याला उचलावं लागणार होतं.  पण हा मागे हटेल तो मनोज  कसला??  त्याने परत रात्रंदिवस एक करून इंग्लिश भाषा शिकून घेतली आणि educationhint.com नावाची इंग्लिश वेबसाइट सुरु केली. आज त्याच्या अगदी समर्पित करुन देण्याच्या स्वभावामुळे त्याने इंग्लिश वेबसाइटला सुध्दा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

आता वेळ आली होती बैंकिंग संबंधी माहिती देणाऱ्या वेबसाइटची. या वेबसाइटची कल्पना सुचण्यामागे गोष्ट अशी होती कि बँकेत गेल्यावर चांगली शिक्षित मुलेसुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टी याला त्याला विचारत फिरत असताना मनोजला दिसायची. मग त्याला एकाच छताखाली बँकिंगसंबंधी सगळी माहिती देणाऱ्या वेबसाइटची कल्पना सुचली.  पण वेबसाइट सुरु करायची म्हणजे तुटपुंज्या माहितीवर भागणार नाही.  मग हा अवलिया नेहमीप्रमाणे तुटून पडला आणि बँकिंगची सगळी माहिती गोळा करुन सखोल अभ्यास करुन Ebankinghome.com ची निर्मिती केली. त्यात ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग सारखी कामे असतील किंवा मग बँकेत दैनंदिन येणाऱ्या अडचणी असतील,  सर्वांवर मुद्देसूद माहिती द्यायला सुरुवात केली. बँकेतलं काही काम निघाले तरी जीवावर येणारी लोकं आपण आजूबाजूला बघतो. पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देणारी वेबसाईट सुरू झाल्याने अनेकांनी इ-मेल करून या मुलाचे व्यक्तिगतरित्या आभार व्यक्त केले आहेत. करणाऱ्या माणसाला आयडिया नेहमीच येत असतात.

अशातच मग जे आपण वेबसाईटवर लिहितो तेच अजुन जास्त कंटेंट टाकुन युट्युब चॅनलच्या माध्यमातून सांगितले तर अजुन जास्त लोकांना फायदा होईल हीमनोजला आयडिया सुचली.  या विचाराने मग hindiedusupport नावाच्या चॅनलची सुरुवात केली.  त्यातून मग ग्राफिक्स आणि प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून अत्यंत सोप्या शब्दात सर्व माहिती लोकांपर्यंत पोचवायला सुरुवात केली. चॅनलला पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळू लागला. एज्युकेशनवरती हिंदी-इंग्रजी वेबसाईट, बँकिग वेबसाईट आणि युट्यूब चॅनेल यांच्याव्यतिरिक्त अजूनही त्यांच्या 3-4 वेबसाईट्स आहेत. या साऱ्या वेबसाईट्स  blogspot आणि wordpress.com सारख्या फ्री प्लेटफॉर्म्स वर डेव्हलप केल्या आहेत. त्याच्या या indianhindireaders.blogspot.com आणि hindiedusupport.wordpress.com या वेबसाईटसना  तुम्ही नक्कीच भेट द्या. 

मनोज पाटीलची जिद्द तर खरीच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व आव्हाने तो एकटा पार पाडत होता. त्याला याबाबतीत मदत करू शकेल असा जवळपास कुणीही नसल्याने त्याने सर्व आव्हाने स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केली. मनावर घेतले ते पूर्ण झाल्याशिवाय शांत बसायचं नाही हा स्वभाव घेऊन काम करत असणारा हा पठ्ठ्या नेहमी कार्यरत असतो. जी पोरं नेहमी कॉम्पुटरमध्ये घुसलेला असतो म्हणुन त्याला हिणवायची ती आज कुठे काही ऍडमिशन वगैरे करायचे असते तेव्हा त्याच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेत असतात. एवढ्यावर न थांबता होइल तेवढे सर्जनशील आणि सकारात्मक काम करायचे या ध्येयाने मनोजची वाटचाल सुरु आहे.  एवढे सर्व उभे करणे हे दुर्दम्य  जिद्द आणि अभ्यासू पिंड असलेल्या माणसालाच शक्य होतं. हाती जे काम घेतले ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचे नाही, या प्रेरणेने मनोज अजूनही काम करत आहे. जिथे डिजिटल मार्केटिंगमध्ये तज्ञ समजले जाणारे MBA करून या क्षेत्रात येणारे गटांगळ्या खात असतात तिथे कुठलेही प्रशिक्षण नसताना फक्त आवड आणि जिद्दीच्या जोरावर मनोजच्या वेबसाईट गुगल रँकिंगमध्ये टॉपवर असतात.

 

 

आणखी वाचा :

नागपूरच्या महिलांची गरुडझेप....अशी ही क्रांतीज्योती महिला बचत गटाची यशोगाथा !!

चहाची किंमत १० आणि कमाई तब्बल १२ लाख....पुण्याच्या चहावाल्याची यशोगाथा वाचली का ??

सबस्क्राईब करा

* indicates required